Krushi Samruddhi Yojana : दुग्ध व्यवसाय करणाऱ्या पशुपालक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून मोठी आनंदाची बातमी आहे. कृषी समृद्धी योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय नावीन्यपूर्ण योजनेमधून डेअरीवर दूध घालणाऱ्या पात्र पशुपालकांना ५० टक्के अनुदानावर मिल्किंग मशीन दिले जाणार आहे. (Krushi Samruddhi Yojana)
ही योजना २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी राबविण्यात येणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ नोव्हेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे. (Krushi Samruddhi Yojana)
कृषी समृद्धी योजनेचा उद्देश कृषी आणि संबंधित व्यवसायांमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून शेतकऱ्यांना आधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून देणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढविणे आणि हवामान बदलाशी सुसंगत शेती व पशुपालनाला प्रोत्साहन देणे हा आहे. (Krushi Samruddhi Yojana)
पात्रता अटी
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय आहेत अटी जाणून घेऊयात
* अर्जदार पशुपालकाकडे किमान सहा दुधाळ जनावरे (गायी किंवा म्हशी) असावीत.
* जनावरांच्या कानात एनडीएलएम अंतर्गत बिल्ला (टॅग) असणे आवश्यक आहे.
* संबंधित जनावरे भारत पशुधन ॲपवर नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे.
* अर्जदाराने शासनाच्या किंवा खासगी दूध संघाकडे सलग तीन महिने दूध पुरवठा केल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया
इच्छुक पशुपालकांना अर्जाचा नमुना तालुक्यातील पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकाऱ्यांकडे उपलब्ध करून दिला आहे. अर्जदारांनी आवश्यक माहिती परिपूर्ण भरून २२ नोव्हेंबरपर्यंत संबंधित तालुक्याकडे अर्ज सादर करावेत.
जिल्ह्यातील पात्र पशुपालकांनी जास्तीत जास्त प्रमाणात अर्ज करावा, असे आवाहन बीड जिल्हा पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे उपसंचालक आर. डी. कदम यांनी केले आहे.
अनुदानाचे स्वरूप काय?
मिल्किंग मशीन खरेदीसाठी पात्र शेतकऱ्यांना खरेदी पावतीवरील किंमतीच्या ५० टक्के रक्कम किंवा २०,००० रुपये (जे कमी असेल तेवढे) अनुदान देण्यात येणार आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर ही रक्कम डीबीटी (Direct Benefit Transfer) पद्धतीने थेट जमा केली जाईल.
लाभार्थी निवड प्रक्रिया
लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया कॉम्प्युटराइज्ड रँडमायझेशन पद्धतीने केली जाणार आहे, म्हणजेच पारदर्शक आणि संगणकीकृत पद्धतीने लाभार्थ्यांची निवड होईल.
स्वच्छ दूध उत्पादनाचा उद्देश
या योजनेमागचा मुख्य हेतू म्हणजे दुग्ध व्यवसायात आधुनिक पद्धतीचा वापर करून स्वच्छ व गुणवत्तापूर्ण दूध उत्पादनास प्रोत्साहन देणे. मिल्किंग मशीनमुळे श्रमाची बचत होऊन दूध काढण्याची प्रक्रिया स्वच्छ, जलद आणि संसर्गमुक्त होईल.
अर्ज सादरीकरणाची शेवटची तारीख : २२ नोव्हेंबर २०२५
अधिक माहितीसाठी तालुकास्तरीय पंचायत समिती, पशुधन विकास अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा
