नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Krushi Bajar Samiti) आवारात दर शुक्रवारी भरणाऱ्या पशुबाजारात मोठ्या प्रमाणावर गायींसह जनावरांची खरेदी-विक्री होते. शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणाऱ्या या बाजारात जर्सी गायींना (Jarsy Cow) चांगला दर मिळत आहे. सद्यस्थितीत जर्सी गायींना ४० ते ५५ हजार रुपयांचा दर मिळताना दिसला.
या आठवड्यात बाजारात जर्सी गाय, एचएफ (होलस्टीन फ्रिजिअन), साहिवाल, गिर, लाल कंधारी, आदी जातींच्या गायी विक्रीसाठी आल्या होत्या. विशेषतः एचएफ गाय, जिच्या अंगावर काळे-पांढरे चट्टे असतात, तिला बाजारात सुमारे ७० हजार रुपयांपर्यंतचा उच्चांकी दर मिळाला. याशिवाय, जर्सी गायींना ४० ते ५५ हजार रुपयांचा दर मिळताना दिसला. प्रामुख्याने दुभत्या जनावरांना (dairy Farm) जास्त मागणी असल्याचे यावेळी दिसून आले.
पावतीमुळे व्यवहार सुरक्षित
गरजेनुसार खरेदी दर शुक्रवारी १०० ते १५० गायींची खरेदी-विक्री येथे केली जाते. बाजारात खरेदीदारांची गर्दी पाहायला मिळते. शेतकरी आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपापल्या गरजेनुसार पशुंची निवड करतात. बाजार समितीच्या अधिकृत पावतीमुळे व्यवहार सुरक्षित राहतो. जर कोणत्याही प्रकारची फसवणूक झाली, तर संबंधित व्यवहार परत घेण्याची सुविधा उपलब्ध आहे, त्यामुळे हा बाजार शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह पर्याय ठरतो.
गायीचे बाजारभाव
गेले काही दिवसातील गाईंचे बाजारभाव पाहिले असता कल्याण बाजारात हायब्रीड गाईला कमीत कमी ५० हजार तर सरासरी ६० हजार रुपये आणि लोकल गाईला कमीत कमी ३५ हजार रुपये तर सरासरी चारही ४० हजार रुपये दर मिळतो आहे. तसेच लाखनी बाजारात लोकल गाईला सर्वाधिक ७५ हजार रुपयांचा दर मिळतो आहे. सर्वसाधारण गाईला खामगाव बाजारात कमीत कमी २० हजार रुपये, तर सरासरी ४५ हजार रुपये दर मिळतो आहे.