- प्रवीण खिरटकर
चंद्रपूर : वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Varora Market yard) मोहबाळा रोडलगतच्या राजीव गांधी मार्केट यार्डमध्ये मागील कित्येक वर्षांपासून दर रविवारी गुरांचा बाजार भरतो. या बाजारात चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी गुरे खरेदीकरिता मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे तिन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांकरिता वरोरा येथील रविवारचा गुरांचा बाजार (bail bajar) वरदान ठरत आहे.
दर रविवारी गुरांचा बाजार भरतो. बाजार समितीच्या वतीने गुरांकरिता व सहभागी शेतकऱ्यांकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यासारख्या मूलभूत सुविधा पुरविण्यात येतात. भव्य पटांगण असल्यामुळे गुरांना बांधण्यास अडचण होत नाही. या बाजारात गुरे अदलाबदली करणे, गुरांची खरेदी-विक्री केली जाते.
या बाजारात लहान व्यावसायिक आपली दुकाने थाटून आपली उपजीविका करतात. गुरांच्या सजावटीची दुकाने लावली जातात. प्रत्येक रविवारी ५०० पेक्षा अधिक गुरांची खरेदी-विक्री होत असते. शेतकरी या रविवारी भरणाऱ्या बाजाराची वाट बघत असतात. सकाळी सहा वाजेपासून शेतकरी आपली गुरे बाजारात आणण्यास सुरुवात करीत असतात.
तीन जिल्ह्यातील शेतकरी सहभागी
दुपारी ३ वाजेपर्यंत गुरांची उलाढाल सुरू राहते. या बाजारात यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यांतील शेतकरी गुरे घेऊन सहभागी होत असतात. या परिसरातील सर्वांत मोठा गुरांचा बाजार असल्याची प्रतिक्रिया अनेक शेतकरी आता व्यक्त करू लागले आहेत. या बाजारात शेतकऱ्यांसोबत व्यापारी सहभागी होत असतात. दिवसेंदिवस या बाजाराची प्रसिद्धी वाढत असल्यामुळे हजारो शेतकरी सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे, या पशुबाजारातून दर रविवारी वरोरा येथे लाखोंची उलाढाल होत असते.