- जिजाबराव वाघ
जळगाव : गणपती बाप्पा यंदा जिल्ह्यातील दूध उत्पादकांसाठी "सुखकर्ता" ठरला असून, गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर जिल्हा दूध संघाने गायीच्यादूध दरात प्रतिलिटर एक रुपयाची वाढ करीत ३५ रुपये प्रतिलिटरने दूध खरेदी सुरू केली आहे.
याचा थेट फायदा जिल्ह्यातील ३० हजार गायीच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना होत आहे. राज्यभरातील सहकारी दूध संघाच्या तुलनेत जळगाव जिल्हा दूध संघाचा विद्यमान दर सर्वाधिक आहे, अशी माहिती संघाचे चेअरमन आमदार मंगेश चव्हाण यांनी शनिवारी दिली.
जिल्हा दूध संघात दरदिवशी गायीच्या दुधाचे एक लाख ४० हजार लिटरचे संकलन होते. म्हशीच्या दुधाची धार दरदिवशी ५० हजार लिटरपर्यंत पोहोचते. जिल्हाभरातील ३० हजार गायीचे दूध उत्पादन करणारे पशुपालक व शेतकरी संघाकडे दूध जमा करतात. गेल्या तीन वर्षात संघाने गायीच्या दुधाचा दर ३० रुपये प्रतिलिटरच्या खाली येऊ दिला नाही.
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर प्रतिलिटर एक रुपयाची वाढ झाल्याने हा दर आता ३५ रुपये प्रतिलिटर झाला आहे. राज्यात काही आघाडीचे सहकारी दूध संघ असून, त्यांचा सध्याचा गायीच्या दुधाचा दर प्रतिलिटर ३३ रुपये आहे. त्यातुलनेत संघाकडून प्रतिलिटर दोन रुपये अधिक दिले जात आहेत. यामुळे ३० हजार ३० शेतकऱ्यांना दरदिवशी एक लाख ४० हजार रुपये अधिकचे मिळणार आहेत.
संघाच्या चेअरमनपदावर निवड होऊन दोन वर्षे नऊ महिने झाले आहेत. संघावरील कर्जफेड करून तोटाही भरून काढला आहे. पशुपालक व शेतकऱ्यांसाठी योजना राबविल्या आहेत. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊनच गायीच्या दूध दरात प्रतिलिटर एक रुपयाची वाढ केली आहे. ही गणेशोत्सवाची भेट आहे. संघाचा गायीच्या दुधाचा विद्यमान दर हा राज्यात सर्वाधिक आहे. याचा थेट फायदा जिल्हाभरातील ३० हजार दूध उत्पादकांना होत आहे.
- आमदार मंगेश चव्हाण, चेअरमन, जळगाव जिल्हा सह. दूध संघ
Gauri Ganpati : गौरी गणपतीच्या नैवद्यासाठी लागणाऱ्या 16 भाज्यांचा वाटा किती रुपयांना? वाचा सविस्तर