हायड्रोपोनिक्स पद्धतीचा अवलंब करून कमी जागेमध्ये, कमी पाण्यामध्ये, कमी वेळेत अत्यंत लुसलुशीत हिरवा पौष्टिक चारा जनावरांना उपलब्ध होऊ शकतो. चारा टंचाईच्या काळात हा चारा वापरल्यास उत्पादनात घट होत नाही व जनावरांचे आरोग्य उत्कृष्ट राहते.
हायड्रोपोनिक्स चारा तयार करण्याची पद्धत■ हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाने प्रामुख्याने मका, गहू, बार्ली, ओट व बाजरी या तृणधान्यांची वाढ करून चारा निर्मिती करता येते.■ या पद्धतीद्वारे ज्वारी पिकाची निर्मिती करू नये. कारण कोवळ्या ज्वारीच्या ताटामध्ये हायड्रोसायनिक अॅसिड असल्यामुळे जनावरांना विषबाधा होण्याचा संभव असतो.■ बियाणे निवडताना बियाणे चांगले व उत्तम प्रतिचे असावे. टपोरे दाणे, किमान ८०% उगवण क्षमता, रोगमुक्त व बुरशीमुक्त असावे.■ बियाणे कोणतीही बीजप्रक्रिया केलेले नसावे, असे केल्यामुळे जनावरांना होणाऱ्या विषबाधेचा धोका टळू शकतो. ■ सर्वप्रथम बियाणे स्वच्छ पाण्याने दोन-तीन वेळेस त्यानंतर ते बियाणे मोड येण्यासाठी १२ ते २४ तास कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवावे. (एक किलो बियाण्यासाठी दोन लिटर कोमट पाणी द्यावे)■ त्यानंतर पाणी काढून ते बियाणे ओल्या गोणपाटात गुंडाळून ठेवावे. यामुळे बियाण्यात मोड येण्यास मदत होते. गोणपाटावर सकाळ, संध्याकाळ पाणी शिंपडून सतत ओलसर ठेवावे. ■ मोड येण्यास सुरुवात झाल्यावर बियाण्यांवर ५% मिठाचे द्रावण शिंपडावे. त्यामुळे ओलसर वातावरणात वाढणाऱ्या बुरशीची वाढ होत नाही. ■ बुरशीच्या प्रतिबंधासाठी ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाचा वापर करता येतो. ■ यानंतर प्लॅस्टिकचे ट्रे घ्यावेत. हे ट्रे स्वच्छ पाण्याने धुऊन चांगले वाळवून घ्यावेत. ■ पूर्णपणे मोड आलेले तृणधान्य एक किलो प्रति ट्रे याप्रमाणे पसरवून घ्यावे व असे ट्रे शेडमध्ये रॅकवर ठेवावेत. ■ शेडमध्ये आर्द्रता कायम टिकून राहावी म्हणून फॉगर्स किंवा मायक्रो स्पिंकलरचा वापर करा. ■ एका ट्रेला २ लिटर पेक्षा जास्त पाणी लागत नाही. पंधरा दिवसात चारा तयार होईपर्यंत प्रति ट्रेसाठी सुमारे ३० लिटर पाण्याची गरज असते. ■ अशा पद्धतीने १२ ते १५ दिवसात २५ ते ३० सेमी उंचीचा हिरवा चारा तयार होतो. ■ एक किलो बियाण्यापासून सुमारे १० ते १२ किलो हिरवा पौष्टिक चारा तयार होतो.
हायड्रोपोनिक्स चारा देण्याची पद्धत■ हा चारा जास्त पचनीय असल्यामुळे जनावरे आवडीने खातात.■ पूर्णपणे वाढ झालेला हायड्रोपोनिक्स चारा एक प्रकारे चटईसारखा दिसतो.■ ट्रेमधून चारा काढायला सोपा जातो व हा चारा जसेच्या तसे किंवा तुकडे करून देता येतो.■ जनावरांना फक्त हायड्रोपोनिक्स चारा दिल्यास अपचन, पोटफुगी होण्याची शक्यता असते, म्हणून हा चारा सुक्या चाऱ्यासोबत द्यावा.■ दुभत्या जनावरांना १५ ते २० किलो चारा प्रति दिवस द्यावा व भाकड जनावरांना ६ किलो प्रति दिवस द्यावा.■ आपल्याकडील असलेल्या एकूण जनावरांच्या संख्येनुसार ट्रे चे नियोजन करावे.
अधिक वाचा: गायी-म्हैशी पान्हा का चोरतात? यावर काय कराल उपाय? वाचा सविस्तर