राज्यामध्ये २० व्या पशुगणनेनुसार गायवर्गीय पशुधन १.३९,९२,३०४ व म्हैसवर्गीय पशुधन ५६,०३,६९२ असे एकूण १,९५,९५,००० इतके पशुधन आहे. राज्यात पशुपालन व्यवसायापासुन सुमारे ६० लक्ष कुटुंबे अर्थाजन करित आहे.
पशुपालकांच्या उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच राज्याच्या सकल उत्पन्नात पशुसंवर्धन व्यवसायाचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टिकोनातून पशुपालकांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच स्थानिक रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी पशुसंवर्धन व्यवसायास "कृषि समकक्ष दर्जा" देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
सर्वसाधारणपणे १०,००० मांसल पक्षी व २५,००० अंड्यावरील पक्षी क्षमता असलेल्या कुक्कुट उद्योगाला लघु, तर २५,००० मांसल कुक्कुट पक्षी व ५०,००० अंड्यावरील पक्षी क्षमता असलेल्या कुक्कुट उद्योगाला मध्यम स्वरुपाचा व्यवसाय समजण्यात येते.
तसेच ५० दुधाळ जनावरांचा गोठा, २०० शेळी-मेंढी गोठा, १०० पर्यंतच्या वराह पालन व्यवसाय यास लघु स्वरुपाचा व्यवसाय समजण्यात येते. तर १०० दुधाळ जनावरांचा गोठा, ५०० शेळी/मेंढी गोठा आणि २०० पेक्षा जास्त वराह पालन करणे यांस मध्यम स्वरुपाचा व्यवसाय समजण्यात येते.
लघु व मध्यम स्वरुपाचा व्यवसाय करणाऱ्या कुटुबांची संख्या विचारात घेता, जास्तीत जास्त पशुपालकांना फायदा होऊन पशुपालन व्यवसायाकडे इतर लोकांनी आकृष्ट व्हावे.
यादृष्टीने खालील प्रकल्प क्षमतेच्या पशुपालक कृषि समकक्ष दर्जाच्या अनुषंगाने अनुज्ञेय ठरणाऱ्या लाभास पात्र ठरतील.
१) २५,००० पर्यंत मांसल कुक्कुट पक्षी/५०,००० पर्यंत अंड्यावरील कुक्कुट पक्षी क्षमता.
२) ४५,००० पर्यंत क्षमतेच्या हॅचरी युनिट.
३) १०० पर्यंत दुधाळ जनावरांचा गोठा.
४) ५०० पर्यंत मेंढी/शेळी गोठा.
५) २०० पर्यंत वराह.
ब्रिडर कुक्कुटपालन व्यवसाय व पशुजन्य उत्पादनावरील प्रक्रिया उद्योगांना कृषि समकक्ष दर्जाच्या अनुषंगाने अनुज्ञेय ठरणारे लाभ अनुज्ञेय नाही.
पशुसंवर्धन व्यवसायास कृषि समकक्ष दर्जाच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे लाभ अनुज्ञेय राहतील
- २५,००० पर्यत मांसल कुक्कुट पक्षी/५०,००० पर्यंत अंड्यावरील कुक्कुट पक्षी क्षमतेच्या तसेच ४५,००० पर्यत क्षमतेच्या हॅचरी युनिटच्या कुक्कुटपालन व्यवसाय, १०० पर्यंत दुधाळ जनावरे संगोपन, ५०० पर्यत मेंढी/शेळी पालन व २०० पर्यत वराह या पशुसंवर्धन विषयक व्यवसायासाठी वीज दर आकारणी "कृषी इतर" या वर्गवारीनुसार न करता "कृषि" वर्गवारीप्रमाणे वीज आकारणी करण्यात येईल.
- कुक्कुटपालन व इतर पशुसंवर्धन व्यवसायासाठी सौरउर्जा पंप व इतर सौरउर्जा संच उभारण्यास कृषि व्यवसायास देण्यात येणाऱ्या दराने अनुदान/सवलत देण्यात येईल.
- पशुपालन व्यवसायास स्वतंत्र व्यवसाय न समजता शेती व्यवसाय समजून कृषि व्यवसायास ज्या दराने ग्रामपंचायत कर आकारणी केली जाते त्याच दराने व राज्यभरात समान दराने ग्रामपंचायत कर आकारणी करण्यात येईल.
- पशुपालन व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या खेळत्या भागभांडवलासाठी घेण्यात येणाऱ्या कर्जासाठी "पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना" च्या धर्तीवर व इतर प्रयोजनासाठी घेण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याज दरात ४% पर्यंत सवलत देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
- या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी स्वयंस्पष्ट मार्गदर्शक तत्वे व कार्यपध्दती वेगळ्याने विहित करण्यात येतील.
अधिक वाचा: e pik pahani : ई-पीक पाहणीचे मोबाईल अॅप अपडेट झाले; खरीप पीक पाहणीला सुरवात