'गोकुळ'दूध संघाला वर्षाला कोट्यवधी रुपयांची वीज लागते. संघाने सौरऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून हळूहळू विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यास सुरुवात केली आहे. पाच प्रकल्पांच्या माध्यमातून ८ मेगावॅट वीज निर्मिती केली असून, या माध्यमातून वर्षाला आठ कोटी रुपयांची बचत वीज बिलात झाली आहे.
'गोकुळ'च्या गोकुळ शिरगाव दूध प्रकल्पासह पशुखाद्य कारखाने, मुंबई येथील पॅकिंग सेंटर यासाठी मोठ्या प्रमाणात वीज लागते. केंद्र सरकारने सौरऊर्जेला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला असून, अनुदानावर सौरऊर्जा प्रकल्प उभे होत आहेत.
'गोकुळ'ने सर्व प्रथम २०१७ ला चिलिंग सेंटरवर ४५ किलोवॅटचे रूपटॉप यूनिट बसवले. त्यानंतर बल्क कूलर, गडमुडशिंगी पशुखाद्य कारखाना कागल, पशुखाद्य कारखान्यात युनिट बसवले. या सगळ्या प्रकल्पातून वर्षाला दोन कोटी रुपयांची वीज निर्मिती होते.
संघाला याबाबतचा अंदाज आल्यानंतर करमाळा (जि. सोलापूर) येथील मोकळ्या जागेत तब्बल ६.५ मेगावॅटचा प्रकल्प मार्च २०२५ मध्ये कार्यान्वित केला आहे. त्यातून सहा कोटी रुपयांची वीज निर्मिती होणार आहे.
'गोकुळ'च्या सौरऊर्जा प्रकल्पातून वीज बिलांमध्ये चांगली बचत होत असून, आगामी काळात संघ विजेबाबत स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. या बचतीतून दूध उत्पादकांच्या हातात चार पैसे जादा देण्याचा प्रयत्न राहणार आहे. - नविद मुश्रीफ, अध्यक्ष, गोकुळ.
'सीएसटी' प्रकल्पातून इंधनाची बचत
गोकुळ प्रकल्प व लिंगनूर, गोगवे, बोरवडे, तावरेवाडी चिलिंग सेंटर तसेच सॅटेलाईट डेअरी शिरोळ येथे सौर उष्णता प्रणालीमधून दूध संघातील बॉयलरसाठी वडेरीमध्ये इतर ठिकाणी लागणाऱ्या गरम पाण्यासाठी 'सीएसटी' प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. यातून दुग्ध प्रक्रिया केंद्रामध्ये पारंपरिक इंधनांचा वापर कमी झाला आहे.
'गोकुळ'ची स्वमालकीची युनिट
प्रकल्पाचे ठिकाण | क्षमता | वार्षिक बचत |
करमाळा | ६.५ मेगावॅट | ६ कोटी |
कागल | ९९५ किलोवॅट | ९४ लाख |
पशुखाद्य कारखाना गडमुडशिंगी | ३२५ किलोवॅट | ४० लाख |
पशुखाद्या कारखाना बल्क कूलर | १४१ किलोवॅट | १५ लाख |
चिलिंग सेंटर | ४५ किलोवॅट | ५० लाख |