Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Goat Farming अवकाळी संकटाच्या शेतीला देईल आधार; शेळी पालन हक्काचा रोजगार

Goat Farming अवकाळी संकटाच्या शेतीला देईल आधार; शेळी पालन हक्काचा रोजगार

goat farming are supportive for the unseasonal crisis based farming | Goat Farming अवकाळी संकटाच्या शेतीला देईल आधार; शेळी पालन हक्काचा रोजगार

Goat Farming अवकाळी संकटाच्या शेतीला देईल आधार; शेळी पालन हक्काचा रोजगार

शेळीपालन शेतीला आधार

शेळीपालन शेतीला आधार

शेअर :

Join us
Join usNext

महाराष्ट्र राज्यातील शेतीव्यवसाय हा प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे. त्यातच पूर्वी साधारणतः दहा वर्षांनंतर आपण दुष्काळास सामोरे जात होतो. परंतु मागील सहा ते सात वर्षांपासून मात्र प्रत्येक दोन वर्षांनंतर किंवा कधी-कधी तर सलग दोन वर्ष दुष्काळ सदृश स्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आपण बघतो आहोत. 

अशा परिस्थितीमध्ये शेती व्यवसायातील प्रामुख्याने पीक उत्पादनातील जोखीम कमी करण्यासाठी शेळीपालन यासारखा शेतीपूरक व्यवसाय करणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरते. ग्रामीण युवकांनी शेळीपालन व्यवसायाकडे संधी म्हणून पाहणे आवश्यक आहे.

शेळ्यांच्या विपणनात विशेष अडचणी नसल्याने या व्यवसायाचे वेगळेपण दिसून येते. व्यवसायातील बारकावे शिकून घ्यावेत. शेळ्यांच्या जाती, आहार व रोग व्यवस्थापन, वितांचे व्यवस्थापन आदी गोष्टींकडे काटेकोर लक्ष दिल्यास शेळीपालन व्यवसाय अतिशय फायदेशीर ठरतो. त्यासाठी शेळीपालनात शास्रीय दृष्टिकोन महत्त्वाचा आहे,

शेळीपालनाचा व्यवसाय हा अल्पभूधारक शेतकरी तसेच भूमिहीन कुटुंबाचा देखील आधार ठरत असल्याचे चित्र आपणास पहावयास मिळते. निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांच्या उत्पादनावर मर्यादा येत आहेत. कृषी उत्पादनाच्या बाजारभावाच्या चढउतारामुळे शाश्वत उत्पन्नाची खात्री शेतकऱ्यांना नसते.

एकात्मिक शेती पद्धतीद्वारे शेतीव्यवसायातील जोखीम कमी करणे शक्य आहे. राज्याची भौगोलिक स्थिती पाहता तसेच जमीन, हवामान व त्याचप्रमाणे पावसाचे मागील आठ ते दहा वर्षांचे प्रमाण विचारात घेतले असता राज्यात फक्त १८ टक्के इतके क्षेत्र जलसिंचनाखाली असून उर्वरित ८२ टक्के शेतजमीन ही कोरडवाहू आहे.

शेळीपालनामध्ये भारताची जागतिक पातळीवरील स्थिती

जागतिक स्तरावर शेळयांच्या संख्येबाबत चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. सन १९५५ मध्ये भारतातील शेळ्यांची संख्या ४७.२० दशलक्ष इतकी होती. जी आजमितीला १४८.८८ दशलक्ष इतकी झालेली आहे. भारतातील एकूण दुग्ध उत्पादनापैकी ३.५ टक्के इतका वाटा शेळ्यांपासून मिळणाऱ्या दुधाचा आहे. 

शेळीपालनाचे महत्त्व / फायदे

शेळी हा बहुउद्देशीय प्राणी आहे. शेळी या प्राण्याला गाई- म्हशींच्या तुलनेत खाद्य, जागा आणि भांडवल देखील कमी लागत असल्यामुळे शेळीला भारतात ‘गरीबाची गाय’ असे संबोधले जाते. इतर प्राण्यांच्या तुलनेत काटक असल्याने दुष्काळ सदृश स्थितीमध्ये शेळी फक्त सुक्या चाऱ्यावर देखील तग धरू शकते. ती रोगास कमी प्रमाणात बळी पडते. साधारणत दीड वर्षांत शेळी दोन वेत देते.

सहा महिन्याच्या कालावधीत शेळीची पिल्ले विक्रीस तयार होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या इतर भांडवल उभारणीसाठी तसेच कौटुंबिक खर्चासाठी फिरते चलन शेळी विक्रीतून उपलब्ध होत असते. शेळीपालनातून मिळणारे लेंडी खतदेखील जमिनीचा पोत सुधारण्यासाठी उपयुक्त असल्याने या खताला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. शेळीच्या दुधाला असलेल्या औषधी गुणधर्मामुळे तसेच पचनास सुलभ असल्यामुळे विशेषत लहान बालकांना हे दूध दिले जाते.

शेळी या प्राण्याला सहसा डोंगराळ भागात राहायला आवडते आणि या डोंगराळ भागात उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या वनस्पती, वेली, काटेरी झुडपे यांचा शेळीला खाद्य म्हणून उपयोग होतो. त्यातच महाराष्ट्र राज्याचा बराच भाग डोंगराळ असल्याने शेळीपालन सुलभ होते.

शेळ्यांच्या जाती

भारतामध्ये प्रामुख्याने बीटल, जमुनापारी, बारबारी, कच्छी, सुरती, संगमनेरी या शेळ्या दुधासाठी पाळल्या जातात. या शेळ्यांपासून प्रत्येक दिवशी सरासरी एक ते दोन लिटर दूध मिळू शकते. थंड हवामान असलेल्या भागात विशिष्ट जातींपासून पश्मिना व मोहोर नावाची उत्तम प्रकारची लोकर मिळते.

महाराष्ट्रात विविध रंगाच्या व आकाराच्या शेळ्या निरनिराळ्या भागात आढळतात. उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर व अहिल्यानगर जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर उस्मानाबादी शेळी आढळते. त्याचप्रमाणे संगमनेरी जातीच्या शेळ्या अहमदनगर, पुणे व नाशिक या जिल्ह्यांत मोठया प्रमांणावर आहेत. कोकण विभागात प्रामुख्याने जास्त पर्जन्यमान व उष्ण-दमट हवामानाच्या भूप्रदेशासाठी असलेली कोकणकन्या शेळी पाळली जाते. 

शेळीपालन व्यवसाय पुढीलप्रकारे करता येतो

दर्जेदार ताकतवार नर व माद्यांची निवड करून त्यांचेपासून मिळणारी नियमित पिल्ले मिळवत शेळीपालन करता येते. जुळी व तिळी करडे देण्याचे प्रमाण, वेगाने मिळणारी शरीरवाढ आणि कमी कालावधीत जादा वजन देण्याची क्षमता या बाजू अत्यंत महत्त्वाच्या असल्याने या बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे कार्यवाही करणे देखील उचित ठरते.

पैदाशीच्या नराची निवड करताना तो जुळा किंवा तिळा जन्मलेला व वजनदार, बांधेसूद व शुद्ध पैदाशीचा असावा. पैदाशीचा नर दोन वर्षांच्या अंतराने बदलावा म्हणजे अंतर्गत पैदाशीचे तोटे उद्भवत नाहीत.

तसेच प्रत्येक वीस शेळ्यांमागे एक बोकड ठेवावा. मांसासाठीचा शेळ्यांना स्थानिक बाजरपेठेत तसेच निर्यातीसाठी देखील मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने विक्री व्यवस्थापनात शक्यतो अडचणींना सामोरे जावे लागत नाही. या उलट शेतकऱ्यांच्या गोठ्यावर येऊन स्थानिक व्यापारी शेळयांची खरेदी करत असतात.

त्यामुळे शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारपेठेच्या शोधात जाण्याची गरज देखील भासत नाही. परंतु सदर व्यवहार हे जास्तीत जास्त नगावर केले जातात. त्याऐवजी वजनावर विक्री केली असता शेतकऱ्यांना योग्य परतावा मिळू शकतो. 

एकूणच मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्यामुळे विक्री व्यवस्थापनाच्या बाबतीत शेळीपालन हा व्यवसाय असा आहे की काही ठिकाणी खाटिक शेतकऱ्यांच्या घरी येऊन आगाऊ रक्कम अदा करून शेळी बोकड खरेदी करतात.

शेळीपालनातील अडचणी

सध्या चाराबंदीसारख्या निर्णयांमुळे बहुतेक ठिकाणी मुक्त शेळीपालनावर निर्बंध आलेले आहेत. परंतु त्यावर उपाय म्हणून बंदिस्त किंवा अर्धबंदिस्त शेळीपालन हा देखील पर्याय उपलब्ध आहे व त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

शेळीपालनासाठी शासकीय योजना

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेळीपालनासाठी अर्थसहाय्य करण्यासाठी वेगवेगळ्या योजना तालुका स्तरावर पंचायत समितीमार्फत राबविल्या जातात.  तसेच बचत गट किंवा गट शेती या माध्यमातून देखील शासनाच्या काही योजनांचा लाभ शेळीपालनात करून घेता येतो. या सोबतच राष्ट्रीयकृत बँकांकडून देखील शेळीपालनासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. 

पर्यावरणपूरक असा शेतीचा जोडधंदा असल्याने तसेच दुष्काळी स्थितीत देखील शेळी हा प्राणी तग धरू शकतो. शेळीपालन हा कमी जोखमीचा त्याचप्रमाणे इतर शेती व्यवसायांपेक्षा कमी भांडवल गुंतवणुकीवर सुरू करता येऊ शकेल असा एक उत्कृष्ट शेतीपूरक व्यवसाय आहे.

सन १९५५ ते २०२१ या वर्षांच्या कालावधीत भारतातील लोकसंख्या जवळपास साडेतीन पटींनी वाढलेली आहे. त्या तुलनेत शेळ्यांच्या संख्येत झालेली वाढ ही फक्त २.८६ पट इतकी आहे. म्हणजेच शेळी उत्पादनास मोठा वाव पुढील काळात राहणार आहे. एकूणच शेती व्यवसायातील जोखीम कमी करून शाश्वत उत्पन्नासाठी शेळीपालन करणे फायदेशीर वाटते.

लेखक 
प्रा. संजय बाबासाहेब बडे
सहाय्यक प्राध्यापक, कृषी विद्या विभाग, दादासाहेब पाटील कृषि महाविद्यालय दहेगाव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर

हेही वाचा - Goat Farming : शेळी पालनाचे प्रकार व त्यांची माहिती

Web Title: goat farming are supportive for the unseasonal crisis based farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.