विमा कंपनीचा खोटारडेपणा यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगात दाखल एका प्रकरणात उघड झाला. दोन म्हशीच्या मृत्यू प्रकरणात भरपाई मिळाली नसल्याने दाखल तक्रारीवर ही पोलखोल झाली. आयोगाने विचारलेल्या प्रश्नावर निरुत्तर झालेल्या कंपनीला चपराक बसली.
तिवसा (ता. यवतमाळ) येथील राधा तुकाराम जाधव यांनी शासनाच्या योजनेअंतर्गत म्हशी खरेदी केल्या होत्या. पंजाब नॅशनल बँकेच्या यवतमाळ शाखेच्या माध्यमातून अनुदानावर हे पशुधन घेण्यात आले होते. खरेदी करण्यात आलेल्या म्हशीपैकी दोन म्हशींचा मृत्यू झाला.
या पशुधनाचा विमा असल्याने त्यांनी भरपाईसाठी दावा केला. परंतु म्हशीचा विमाच काढला नव्हता, असे सांगत दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीच्या यवतमाळ शाखेने भरपाई नाकारली होती.
असा आहे आदेश
दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीने राधा जाधव यांना दोन म्हशीच्या नुकसान भरपाईपोटी प्रत्येकी ४० हजार रुपये, शारीरिक व मानसिक त्रासाकरिता १५ हजार आणि तक्रार खर्चाचे दहा हजार रुपये द्यावे, असा आदेश दिला आहे. विशेष म्हणजे, पंचायत समितीने सात हजार ५९२ रुपये एवढ्या रकमेचा विमा हप्ता कंपनीला दिला होता.
विमा रकमेचा भरणा
• शासनाच्या योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या पशुधनाचा विमा काढला जातो. त्याशिवाय बिल्लाच दिला जात नाही.
• राधा जाधव यांच्या मृत्यू पावलेल्या म्हशीलाही बिल्ला प्राप्त झाला होता. यानंतरही विमा कंपनीने भरपाई नाकारली होती. हीच बाब आयोगाने या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान प्रामुख्याने नमूद केली.
• विमा नव्हता तर म्हशीला बिल्ला मिळालाच कसा, असे नमूद करत भरपाई देण्याचा आदेश विमा कंपनीला देण्यात आला. या प्रकरणातून पंजाब नॅशनल बँकेला मात्र मुक्त करण्यात आले.
ग्राहक आयोगात धाव
दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीने भरपाई नाकारल्यानंतर राधा तुकाराम जाधव यांनी यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगात धाव घेतली. पंजाब नॅशनल बँक, दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली. आयोगाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र उल्हास मराठे आणि सदस्य अमृता वैद्य यांच्या उपस्थितीत या प्रकरणावर सुनावणी झाली.
हेही वाचा : पशुपालकांनो आवर्जून तयार करत चला 'गो'धनाची जन्मकुंडली; दूध व्यवसायात मिळवा आर्थिक वृद्धी