सीना नदीला महापूर आल्याने नदी काठावरील गावातून चाऱ्याचा प्रश्न बिकट बनल्याने शेतीला जोड धंदा असलेला दुग्ध व्यवसाय कोलमडला आहे. सोलापूर जिल्ह्याच्या करमाला या तालुक्यात प्रामुख्याने १२ गावांमध्ये दररोज ५० हजार लिटर दूध उत्पादन व्हायचे ते आता निम्म्यावर आले आहे.
सीनानदीला मिळणाऱ्या कन्होळा नदीला पूर आल्यामुळे सीनेचे रूपांतर महापुरात झाले. या पुराचा फटका सीना नदीपलीकडे असलेल्या नीलज, बोरगाव, बाळेवाडी, पोटेगाव, खांबेवाडी, दिलमेश्वर, तरटगाव, खडकी, आळजापूर, करंजे, बिटरगाव (श्री) वाघाचीवाडी, पाडळी, घारगाव येथे शेतीला पूरक म्हणून घरोघरी शेतकरी दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात.
गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्ये १५ दिवसांत सीना नदीला तीनदा महापूर आल्याने नदी काठावरील शेती पाण्याखाली गेली. अनेकांची दुधाळ जनावरे मृत्युमुखी पडली. जनावरांचा हिरवा चारा वाहून गेला.
सीना नदी पलीकडील या १२ गावातून वेगवेगळ्या दूध केंद्रांना तब्बल ५० हजार लिटर दुधाचा पुरवठा होतो. यातून प्रत्येक १० दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल होते. अतिवृष्टी व महापुरामुळे दुग्ध व्यवसायाला मोठा फटका बसला असल्याचे दिसून येत आहे.
महापुरामुळे दुग्धव्यवसाय अडचणीत आला आहे. जनावरांसाठी चारा उपलब्ध नाही. जो थोडाबहुत चारा होता तो भिजून निरुपयोगी झाला आहे. माळरानावर चराईचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जनावरांचे आरोग्य ही धोक्यात आले आहे. एक गाय एक वेळेस वीस लिटर दूध देत होती, ती आता फक्त दहा लिटरच देत आहे. अशाप्रकारे दुधाचे उत्पन्न अर्ध्यावर आल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. - रामभाऊ गायकवाड, चेअरमन आदिनाथ दूध संस्था, निलज जि. सोलापूर.