Join us

इंजिनिअरचे १४ लाखांचे पॅकेज सोडून धनराज पाटलांनी सुरु केले पशुपालन; मिळविले १ तोळे सोन्याचे बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 12:56 IST

आजच्या काळात बहुतेक तरुणांचे स्वप्न असतं मोठ्या शहरात नोकरी करून चांगलं पॅकेज मिळवण्याचं. पण काही तरुण असे असतात जे पैशांपेक्षा समाधानाला महत्त्व देतात. अशाच तरुणाचं नाव आहे धनराज पाटील.

संतोष कनमुसेआजच्या काळात बहुतेक तरुणांचे स्वप्न असतं मोठ्या शहरात नोकरी करून चांगलं पॅकेज मिळवण्याचं. पण काही तरुण असे असतात जे पैशांपेक्षा समाधानाला महत्त्व देतात. अशाच तरुणाचं नाव आहे धनराज पाटील.

धनराज पाटील हे सांगली जिल्ह्यातील ऐतवडे खुर्द येथील आहेत. त्यांनी बी.टेक. ऑटोमोबाइल (इंजिनिअरिंग) सेल्स अँड मार्केटिंगमध्ये एमबीए हे शिक्षण पूर्ण केले आहे.

त्याच्या मेहनतीमुळे आणि गुणांमुळे त्याला गुजरातमधील एका नामांकित कंपनीत तब्बल १४ लाखांचे वार्षिक पॅकेज असलेली नोकरी मिळाली. कुटुंबाला अभिमान वाटला, गावात कौतुक झालं.

काही महिने तो त्या नोकरीत रमला पण हळूहळू त्याच्या मनात एकच विचार घोळू लागला, हे खरंच माझं स्वप्न आहे का? शहरातील गजबज, ऑफिसमधील चारचौघांचे वातावरण, मोठ्या पगाराचा आकडा सगळं असूनही त्याच्या मनात समाधान नव्हतं.

कारण त्याचं मन ओढ घेत होतं आपल्या गावाकडे, आपल्या मातीकडे. शेती आणि पशुपालन हे त्याच्या बालपणापासूनच आवडते क्षेत्र होतं. शेवटी, एक दिवस त्याने ठाम निर्णय घेतला कॉर्पोरेट नोकरी सोडून शेतीकडे परतण्याचा.

सुरुवातीला सगळ्यांनी त्याला वेड्यात काढलं. काहींनी म्हटलं, १४ लाखांची नोकरी सोडून शेतीत काय मिळणार? पण धनराजने टीकेकडे दुर्लक्ष केलं. त्याने आधुनिक तंत्रज्ञान आणि शिक्षणाचा वापर करून शेती आणि पशुपालन दोन्ही क्षेत्रात प्रयोग सुरू केले.

त्याने म्हशींचा गोठा उभारला. उत्तम जातीच्या म्हशी विकत घेतल्या, त्यांची देखभाल, आहार, आरोग्य आणि व्यवस्थापन यावर विशेष लक्ष दिलं.

सुरुवातीचे काही महिने कठीण गेले. आर्थिक संकट, अनुभवाचा अभाव, आणि रोजचे कष्ट. पण त्याने हार मानली नाही. हळूहळू त्याच्या गोठ्यातील म्हशींनी चांगलं दूध द्यायला सुरुवात केली.

धनराजने आपल्या गोठ्यातून मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन करायला सुरुवात केली. आज त्याचं दूध उत्पादन इतकं वाढलं आहे की त्याचं नाव परिसरात चर्चेत आलं आहे. स्थानिक दूध संघ आणि सहकारी संस्था त्याच्या गोठ्यातून नियमितपणे दूध घेतात.

त्याच्या मेहनतीचा आणि समर्पणाचा परिणाम असा झाला की, सांगली जिल्ह्यातील ऐतवडे खुर्द येथील सत्यशोधक दूध संस्थेने धनराज पाटील यांना “सर्वोत्कृष्ट दुग्धोत्पादक” हा पुरस्कार दिला आणि १ तोळा सोन्याचे बक्षीस दिले. 

धनराज पाटील सांगतात, पैसे नोकरीतही मिळतात, पण स्वतःच्या मेहनतीने, आपल्या मातीत उभं केलेलं यश वेगळंच समाधान देतं. शेती आणि पशुपालन हे फक्त पारंपरिक व्यवसाय नाहीत, तर त्यात मोठी संधी आणि अभिमान दडलेला आहे.

आज धनराज पाटील हे नाव ग्रामीण भागातील नव्या पिढीसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. त्याने दाखवून दिलं की, उच्च शिक्षण आणि आधुनिक विचार शेतीत वापरले तर शेतकरीसुद्धा करोडपती होऊ शकतो.

धनराजचा प्रवास आपल्याला सांगतो, “यश फक्त शहरात नाही, ते आपल्या मातीतही सापडतं; फक्त दृष्टिकोन बदलायचा आहे.”

महिन्याला २४०० लिटर दूध◼️ धनराज पाटील हे महिन्याला सुमारे २,४०० लिटर दूध उत्पादन करतात. या दूधाला प्रति लिटर ७० रुपये एवढा दर मिळतो.◼️ त्यामुळे महिन्याचे एकूण उत्पन्न १ लाख ६८ हजार रुपये इतके होते. त्यापैकी सुमारे १ लाख रुपये खाद्य आणि कामगारांवर खर्च होतात.◼️ त्यामुळे पाटील यांना दरमहा ६८ हजार रुपये नफा राहतो. म्हणजेच, वर्षभरात त्यांना सुमारे ८ लाख १६ हजार रुपये इतका नफा मिळतो.

दूध उत्पादकांना सोनं बक्षीस◼️ ऐतवडे खुर्द येथील सत्यशोधक दूध संस्था प्रत्येक वर्षी नवीन उपक्रम राबवत असते. यावर्षी त्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहनासाठी सोन्याचे बक्षीस दिली आहे. यात त्यांनी ३.५ तोळे सोने दिले आहेत.◼️ सर्वाधिक दूध उत्पादकासाठी एक तोळा सोने तर दुसरा नंबर आलेल्या शेतकऱ्याला अर्धा तोळे सोने आणि तिसरा नंबर आलेल्या उत्पादकाला ३ ग्रॅम आणि या सोन्याबरोबर दिवाळीचे साहित्य आणि पैठणी साडी गिफ्ट स्वरुपात देण्यात आले आहे.

ना नफा ना तोटा या तत्वानुसार उत्पादकांना जेवढा फायदा मिळेल तो मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने केला. संस्था स्थापनेपासून आजपर्यंत नेहमीच सर्वापेक्षा जास्त दर, बक्षीस विविध योजना देण्याचा प्रयत्न केला. तरुणांसमोर सध्या रोजगाराची अडचणी आहेत, यामुळे आम्ही दूध उत्पादनातूनही यशस्वी होऊ शकतो यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो. आमच्या संस्थेला दूध पुरवठा करणारे हे उच्चशिक्षित आहेत. - अ‍ॅड. विकास चांदणे, अध्यक्ष, सत्यशोधक दूध संस्था

अधिक वाचा: अवघ्या ४५ मिनिटांत उसाचा एक ट्रेलर भरणार; शेतकरीपुत्राने तयार केले 'हे' ऊस भरणी यंत्र

English
हिंदी सारांश
Web Title : Engineer leaves high-paying job for dairy farming, wins gold.

Web Summary : Engineer Dhanraj Patil quit a lucrative job to pursue dairy farming. He embraced modern techniques, achieved high milk production, and won an award with a gold prize. He inspires rural youth.
टॅग्स :दुग्धव्यवसायशेतकरीशेतीनोकरीदूधव्यवसायसांगलीतंत्रज्ञानसोनंशिक्षण