सध्या थंडीचे प्रमाण वाढत असून या थंडीच्या लाटेत शेतकरी व पशुपालक यांच्या पशुधनाचे आर्थिकदृष्ट्या नुकसान होऊ नये यासाठी शीत लहरींपासून पशुधनाचा बचाव करणे आवश्यक आहे.
थंडीच्या लाटेत तीव्रतेपासून संरक्षण करणे, अनुषंगिक आजार व मर्तुक नियंत्रीत करण्यासाठी कोणत्या उपाययोजना उपयुक्त आहेत याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
काय करावे
◼️ स्थानिक हवामानाच्या अंदाजाची अद्यावत माहिती ठेवावी.
◼️ वातावरणातील तीव्र बदलापासून पशुधनाचा बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची तयारी करून ठेवावी.
◼️ पशुधनाचा थंड वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी त्याचा निवारा चहू बाजूने आच्छादित करावा, पत्र्याचे छत असल्यास त्यावर वाळलेले गवत अथवा कडब्याचा थर पसरावा.
◼️ पशुधनास निवाऱ्यातील जमिनीतील थंडी पासून बचावासाठी वाळलेल्या चाऱ्याचा थर/बिछाना अंथरावा.
◼️ पशुधनाचा निवारा शीत ऋतुत जास्त सुर्य प्रकाश पुरविणारा व उन्हाळ्यात सुर्य किरणांच्या तिव्रतेपासून बचाव करणारा असावा.
◼️ कडाक्याची थंडी असल्यास निवाऱ्यात कृत्रिम प्रकाश व उष्णता पुरवायची सोय करावी.
◼️ अशक्त व आजारी पशुधनास थंडी पासून बचावाकरीता झाकण्यासाठी पोती/बारदान यासारखी सोय असावी. तसेच रात्री सर्व पशुधन उबदार निवाऱ्यात ठेवावे.
◼️ पशुधनास ओलाव्यापासून दूर ठेवावे, तसेच उष्णतेसाठी शेकोटी पेटविली असेल तर त्यापासून निघणाऱ्या धूरापासून त्यांचा बचाव करावा, ओलसरपणा ओलावा व धूर यामुळे पशुधनास न्युमोनिया होण्याची शक्यता असते.
◼️ पशुधनाच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहावे यासाठी विशेष करून लहान वयाच्या व अशक्त पशुधनास पेंड व गुळ देण्यात यावे. तसेच त्यांना उबदार जागी ठेवण्याची सोय असावी.
◼️ पशुधनासाठी उच्च दर्जाच्या चारा व पशुखाद्याचा मुबलक साठा असावा.
◼️ सुधारीत पशुपोषण पध्दती व पुरक खाद्य वापरावेत.
◼️ पशुधनास जंत/कृमी नाशके देण्यात यावे.
◼️ पशुधनांचा बाह्यपरजीवी किटकांपासून बचाव करण्यासाठी त्यांच्या निवाऱ्यात स्वच्छता ठेवावी.
◼️ निरगुडी, तुळस, लेमन ग्रास यांच्या जुड्या गोठ्यात लटकवाव्या, त्या वासाने बाह्य परजीवीं किटक पशुधनाच्या निवाऱ्यात येण्याची शक्यता कमी होते.
◼️ निवाऱ्याच्या/गोठा स्वच्छतेसाठी कडूनींबाचा तेल असलेले निर्जंतुकीकरण द्रावण वापरता येईल.
◼️ पशुधनाच्या संवर्गानुसार लाळ खुरकुत, घटसर्प, फऱ्या, पीपीआर, आंत्रविषार, इत्यादी रोग प्रतिबंधक लस देण्यात यावी.
◼️ पशुखाद्यातून व पाण्यातून पुरेसे क्षार पुरविण्यात यावेत. दुभत्या पशुधनास संतुलित्त आहार व पुरक स्निग्ध खाद्य पुरविण्यात यावेत.
◼️ पशुधनाच्या पाणी पिण्याची भांडी स्वच्छ असावीत तसेच पशुधनास दिवसातुन ४ वेळेस कोमट पाणी पिण्यास द्यावे.
◼️ सहा महिन्या पुढील गर्भधारणा असलेल्या पशुधनास वाढीव खाद्य द्यावे.
◼️ मृत पशुधनाच्या विल्हेवाटीची जागा ही सार्वजनिक जागा व पाणवठ्यापासून दूर असावी. तसेच ती जागा काटेरी कुंपनाने संरक्षित असावी आणि तेथे फलक लावण्यात यावा.
काय करू नये
◼️ शीत लहरीच्या काळात पशुधनास उघड्यावर बांधू नये, तसेच मोकाट सोडू नये.
◼️ शीत लहरीमध्ये पशु मेळाव्यांचे आयोजन टाळावे.
◼️ पशुधनास पिण्यास थंड पाणी देऊ नये.
◼️ पशुधनाच्या निवाऱ्यात ओलसरपणा व धूर टाळावा.
◼️ रात्री व थंडीत पशुधनास उघड्यावर बांधून ठेऊ नये.
◼️ मृत पशुधनाचे शव कुरणावर अथवा चरावयाच्या मार्गात टाकू नये.
अधिक वाचा: 7/12 Download: सातबारा काढण्यासाठी आता तलाठ्याकडे जायची गरज नाही; डाउनलोड करा तुमच्या मोबाईलवर
