शेळीपालन व्यवसाय यशस्वी होण्यासाठी योग्य प्रशिक्षण व व्यवस्थापन आवश्यक असते. व्यवसायाविषयी तांत्रिक ज्ञान व बारकावे समजून घेणे गरजेचे आहे.
स्थानिक वातावरणाशी सुसंगत अशा जातींची निवड, खाद्य व चारा पिकांची निर्मिती, आरोग्य व्यवस्थापन, प्रजनन, बाजारपेठ आणि दैनंदिन व्यवस्थापन यांची सांगड घालणे महत्त्वाचे आहे.
महाराष्ट्राच्या वातावरणाशी जुळवून घेणाऱ्या सर्वोत्तम शेळ्यांच्या जाती
१) उस्मानाबादी शेळी
महाराष्ट्राच्या विविध वातावरणाशी जुळवून घेणारी सर्वोत्तम शेळीची जात. रुचकर मांस आणि दुधासाठी असा दुहेरी फायदा देते.
वैशिष्ट्ये
• दिसायला काळीभोर, मध्यम शरीर बांधा तर काही शेळ्यांच्या कानावर पांढरे ठिपके दिसून येतात.
• वर्षातून दोन वेळा पिले देण्याची तसेच सातत्याने एकापेक्षा अधिक पिले देण्याची क्षमता.
• जुळे व तिळे देण्याचे प्रमाण अधिक. जुळ्यांचे प्रमाण ६१ टक्के, तिळ्याचे प्रमाण १७ टक्के, एका पिलाचे प्रमाण २१ टक्के, तर ४ ते ६ पिले देण्याचे प्रमाण १ टक्का इतके आहे.
• प्रत्येक वेतामध्ये पिलांना पुरेल एवढे दूध देण्याची क्षमता.
• उच्चतम रोग प्रतिकारशक्ती तसेच उष्ण हवामानास सक्षमपणे तोंड देण्याची क्षमता.
• साधारणपणे ६ महिन्यांचे बोकड २२ ते २५ किलो, तर १२ महिन्यांचे बोकड ३० ते ३५ किलोपर्यंत वजन भरते. एक वर्ष वयाच्या शेळीचे वजन ३० ते ३५ किलोपर्यंत मिळते.
२) संगमनेरी शेळी
संगमनेरी शेळी ही जात मांस व दूध उत्पादनासाठी वापरली जाते. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर हे या जातीचे मूळ स्थान असल्याने तिला संगमनेरी हे नाव पडले आहे. सोबतच ही शेळी पुणे जिल्ह्याच्या इतरही काही भागात आढळून येते.
वैशिष्ट्ये
• या शेळीची शिंगे पातळ, टोकदार व मागे वळालेली आणि वरच्या दिशेने असतात. ८ ते १२ टक्के शेळ्यांना शिंगेच नसतात.
• ही शेळी पांढऱ्या, तपकिरी अशा रंगामध्ये आढळून येते.
• कान मध्यम व लोंबकळणारे असतात. कपाळ बहिर्वक्र आणि सपाट असते.
• या शेळ्यांमध्ये दाढीच प्रमाण कमी असते.
• व्यायल्यानंतर ही शेळी अर्धा ते दीड लिटरपर्यंत दूध देते.
• एका वेतातील दूध उत्पादन साधारणपणे ८० लिटर इतके असते.
• दूध देण्याचा कालावधी हा सरासरी १८० दिवसांचा असतो.
• दोन वेतातील अंतर ३३३ दिवस असते.
• आठ महिने वय असताना शेळी प्रथम वयात येत असते. पहिल्यांदा गाभण राहण्याचे वय हे १४ महिने असते.
• या शेळीचा माजाचा कालावधी ४१ तासांचा असतो.
• दोन माजामधील अंतर साधारणपणे १७ दिवसांचे असते.
• मादीचे वजन ३२ किलोपर्यंत तर नराचे वजन ३९ किलोपर्यंत असते. जन्माच्या वेळी करडांचे वजन १ ते १.५ किलोच्या जवळपास असते.
• एक करडू देण्याचे प्रमाण ७५ टक्के, जुळी करडे देण्याचे प्रमाण २५ टक्के, तिळ्याचे प्रमाण ४ टक्के असते.
३) बेरारी शेळी
सध्याचा अमरावती विभाग हा बेरार प्रांत म्हणून ओळखला जात असे. म्हणूनच या प्रांतात आढळणाऱ्या शेळ्यांना बेरारी असे संबोधले जाते. बेरारी शेळीचा (Berari Goat) विस्तार विदर्भातील ११ जिल्ह्यांत आहे. नागपूर, वर्धा, अमरावती व अकोला जिल्ह्यांत जास्त प्रमाणात या शेळ्यांची संख्या आहे. बेरारी शेळीला स्थानिक भागात लाखी किंवा गावरानी या नावाने सुद्धा ओळखले जाते.
वैशिष्ट्ये
• बेरारी शेळी मध्यम आकाराची असून प्रामुख्याने मांसासाठी पाळली जाते.
• पूर्ण वाढ झालेल्या बेरारी बोकडाचे सरासरी वजन ३६ किलो तर शेळीचे वजन ३० किलोपर्यंत असते.
• जन्मतः नर करडाचे वजन २.४६ किलो तर मादी करडाचे वजन २.३६ किलो असते.
• एका वर्षामध्ये या जातीच्या नराचे सरासरी वजन २३ किलो, तर मादीचे सरासरी वजन २० किलो असते.
• या शेळीमध्ये एका वेतात करडू देण्याचे प्रमाण ४५.५६ टक्के, जुळे देण्याचे प्रमाण ५६.४५ टक्के, तिळे देण्याचे प्रमाण १.८७ टक्के, तर चार पिले देण्याचे प्रमाण ०.१२ टक्का असते.
अधिक वाचा: उन्हाळ्यात तापमान नियंत्रणासाठी कसे कराल जनावरांच्या गोठ्याचे नियोजन? वाचा सविस्तर