सातारा : आखाती देशामधील युद्धामुळे रासायनिक खतांची टंचाई निर्माण झाली असून किमतीही कडाडल्या आहेत.
त्यामुळे शेतकऱ्याची मोठी पंचायत झाली आहे. अधिकचे पैसे मोजूनही खते उपलब्ध होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
तर दुसरीकडे, बरेच शेतकरी रासायनिक खताच्या ऐवजी जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी शेणखताकडे वळत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपसून शेणखतांच्या किमतींमध्येही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
वाहतूक, मजुरीचा खर्च वेगळा
◼️ शेणखतांचा भाव हा ट्रॉलीमागे ५ ते ८ हजार असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडून शेणखत भरण्यासाठी व जागेवर उतरण्यासाठी वेगळी मजुरी द्यावी लागत आहे.
◼️ शिवाय चालकाकडूनही वाहतूक भाडे वेगळे आकारले जात असल्याने ट्रॉलीमागे हा भाव ७ ते १० हजारांवर पोहोचत असल्याचे दिसून येत आहे.
शेणखतही महाग, एका ट्रॉलीमागे ५ ते ८ हजार
◼️ रासायनिक खतांचा जमिनीवर होणारा परिणाम लक्षात आल्याने आज अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत.
◼️ बाजारातील रासायनिक खतांचा वापर न करता त्यांच्याकडून पारंपरिक पद्धतीने शेणखतालाच पसंती दिली जात आहे.
◼️ सातारा जिल्ह्यात एका ट्रॉलीचा भाव हा ५ ते ८ हजारांवर पोहोचला आहे.
कशामुळे वाढले भाव?
◼️ गेल्या काही दिवसांपासून शासनस्तरावर होत असलेल्या सेंद्रिय शेतीच्या जनजागृतीमुळे अनेक शेतकरी सध्या सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत.
◼️ त्यांनी रासायनिक खतांचा वापर टाळत पारंपरिक शेणखतालाच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे शेणखतांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे.
◼️ तसेच वाढता पशुपालनाचा खर्च, पशुंची घटती संख्या आदी कारणांमुळे शेणखतही प्रचंड महागले आहे.
शेणखत ठरतेय जमिनीसाठी संजीवनी
◼️ शेणखत हे खऱ्या अर्थाने जमिनीसाठी संजीवनी आहे. कारण ते मातीची सुपीकता, रचना आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारते.
◼️ रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे खराब झालेल्या जमिनींना पुन्हा जिवंत करण्यासाठी शेणखत अत्यंत महत्त्वाचे आहे.
◼️ शेणखताच्या वापरामुळे पिकांच्या पांढऱ्या मुळीची वाढ जोमदार होते. जमिनीच्या सामूमध्येही बदल होतात.
रासायनिक खतांचा वापर करून पिकवलेली पिके आरोग्याला हानिकारक असल्याने आम्ही सेंद्रिय शेतीकडे वळलो. यामुळे जमिनीचा पोतही सुधारला असून शेणखताच्या वापरामुळे उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. फळांची चवही वाढलेली आहे. - नीलेश साळुंखे, शेतकरी, सातारा
अधिक वाचा: एप्रिल ते सप्टेंबर महिन्याच्या लाईट बिलात अजून १५ टक्के सवलत; वाचा कुणाला मिळणार लाभ?
