सोलापूर : अनुदानाच्या पहिल्या टप्प्यासाठी पुणे, अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्यांतील १२४ दूध संस्थांचेच प्रस्ताव होते तर दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यांच्या अनुदानासाठी संस्थांची संख्या तब्बल ३७६ इतकी झाली.
अनेक संस्थांनी सुरुवातीला अनुदान मागणी करताना नाके मुरडली. मात्र, नंतर मोठ्या प्रमाणावर संस्था अनुदान मागणीसाठी पुढे आल्या.
हे करीत असताना काही संस्थांनी हात धुऊन घेण्याचा प्रयत्न केला. त्या संशयामुळेच सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांतील दूध संस्थांची तपासणी सुरू झाली आहे.
सरकारने कितीही शुद्ध भावनेने योजना राबविण्याचा प्रयत्न केला तरी त्यात हात मारण्यासाठी डोके चालविणारे महाराष्ट्रात कमी नाहीत.
मग शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट अनुदान देण्यासाठी गायींना टॅगिंग करूनही वेगळ्या वाटा काढणारेही आहेत. हेच काय शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीकविम्यासारखी महत्त्वाकांक्षी योजना आणली तरी त्यात गडबड झाली आहे.
दूध अनुदानातही असा प्रकार घडल्याचे लक्षात आल्याने सोलापूर जिल्ह्यातील १० दूध संस्थांचे प्रस्ताव राज्याच्या दूग्ध विकास आयुक्त कार्यालयाने अपात्र केले आहेत.
या १० संस्थांशिवाय इतरही दूध संस्थांमध्ये गडबड असल्याने पुणे, अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्यांतील २५८ दूध संस्थांची तपासणी मंत्रालयासह राज्यातील इतर विभागांच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.
११ जानेवारी २०२४ ते १० मार्च २४ या कालावधीचे प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्यासाठी दूध संस्थांना लॉगिन आयडी देऊन प्रस्ताव मागविले होते.
दूध खरेदी दरात सुधारणा न झाल्याने जुलै ते सप्टेंबर २४ या कालावधीसाठीही अनुदान देण्यात आले तर ऑक्टोबर व नोव्हेंबर २४ महिन्यांसाठी पुन्हा अनुदान देण्यात आले.
जानेवारी ते मार्च या कालावधीच्या अनुदानासाठी सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांतील १२४ दूध संस्था व संघांचे प्रस्ताव आले होते.
दुसऱ्या (जुलै ते सप्टेंबर) या टप्प्यातील अनुदानासाठी संस्था, गाई व दुधात वाढ झाली. तिसऱ्या टप्प्यातील प्रतिलिटर सात रुपये अनुदान देण्यासाठी संस्थांच्या संख्येत वाढ झाली.
जिल्हा | पहिला टप्पा | नंतरचे टप्पे |
सोलापूर | १७ | १०७ |
पुणे | ३३ | १०९ |
अहिल्यानगर | ७४ | १६१ |
एकूण | १२४ | ३७७ |
१० संस्थांचे प्रस्ताव अपात्र◼️ सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक तपासणीत १० दूध संस्थांचे प्रस्ताव अपात्र करण्यात आले आहेत. या १० दूध संस्थांच्या गाई व दूध किती दाखविले शिवाय त्यासाठीच्या अनुदानाची रक्कम समजली नाही.◼️ सध्या तपासणी सुरू असलेल्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील १२, मोहोळच्या ११, सांगोल्याच्या ९, पंढरपूरच्या ८, करमाळ्याच्या ६, सोलापूरच्या चार, माळशिरसच्या तीन, मंगळवेढ्याच्या दोन तर बार्शी तालुक्यातील एका संस्थेचा समावेश आहे.
अधिक वाचा: मान्सून लवकरच सक्रीय : पुढील तीन-चार दिवसांत या जिल्ह्यांत अतिवृष्टीच्या इशारा