सोलापूर : दूध उत्पादक शेतकऱ्यांचे साधारण दोन कोटी, दूध वाहतूक गाड्यांचे ८० लाख, तर कर्मचाऱ्यांचे दीड वर्षाचे वेतन थांबले असून, थकलेल्या दूध संघासमोर यासाठी पैसे कसे उपलब्ध करायचे? हा प्रश्न आहे.
दुग्धजन्य उत्पादने तर केव्हाच बंद झाली असताना पॅकिंग पिशवीसाठी आवश्यक दुधाची जमवाजमव करण्यासाठी कसरत सुरू आहे. सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मोठ्या आर्थिक अडचणीत असल्याचे दिसत आहे.
कारण दूध संकलन पाच हजार लिटरपेक्षा कमी झाले होते. शिवाय दूध उत्पादकांची देणी मोठ्या प्रमाणावर थकली आहेत. आता अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील दूध संकलन करण्यासाठी बंद पडलेला वाहतूक मार्ग सुरू करण्यात आला आहे.
अधिक वाचा: Janavrantil Gochid Tap : जनावरांतील गोचीड ताप वेळीच ओळखा आणि अशा करा उपाययोजना
त्यामुळे या दोन दिवसांत दूध संकलन प्रतिदिन आठ हजार लिटर इतके होत असल्याचे सांगण्यात आले. मार्च २०२२ मध्ये विद्यमान संचालक मंडळाचा कारभार सुरू झाल्यानंतर दूध संघाला चांगले दिवस येतील, असे वाटत होते.
मात्र, तसे न होता दूध संघाचे पाय अधिकच खोलात गेल्याचे दिसत आहे. हे संचालक मंडळ अस्तित्वात येण्याअगोदरची काही देणी बाकी असतानाच नव्या संचालक मंडळाने मार्च २०२२ पासून नवी देणी करून ठेवली आहेत.
पूर्वीच्या संचालक मंडळाच्या कालावधीतील दूध उत्पादकांचे जवळपास ६० लाख रुपये तसेच वाहतुकीचे देणे असल्याचे सांगण्यात आले. या संचालक मंडळाच्या कालावधीतही दूध उत्पादकांचे जवळपास दीड कोटी रुपये अडकले असल्याचे सांगण्यात आले.
दूध वाहतूक वाहनांचे ७० ते ८० लाख देणे आहेच. शिवाय कर्मचाऱ्यांचे जुने-नवे असे दीड वर्षाचे वेतन देणे देय असल्याचे सांगण्यात आले.
दूध विक्रीचे ८० लाख येईनात
दूध संघाचे पॅकिंग पिशवीतील दूध विक्री केलेले ७० ते ८० लाख रुपये एजंटकडे अडकले असून, दूध संघाची एवढी मोठी रक्कम अडकून पडली आहे. नावाजलेला पेढा व इतर उत्पादने बंद करण्यात आली आहेत. यावर संचालक मंडळाने कधी विचार केलेला दिसत नाही.
आर्थिक चणचण हे महत्त्वाचे कारण असले तरी मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. आवश्यक तेवढेच दूध खरेदी केले जाते. शेतकऱ्यांचे अधिक दूध घेऊन काय तोटा वाढवू का? संचालक मंडळाची लवकरच बैठक होईल त्यामध्ये निर्णय होतील. - सुजित पाटील, कार्यकारी संचालक, सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघ