दुग्धव्यवसायात यशस्वी होण्यासाठी फक्त गाय-म्हशींपर्यंत मर्यादित राहून चालत नाही तर त्यांच्या पुढचं पिढीचं आरोग्य व उत्पादकता यावरही लक्ष द्यावं लागतं. त्यामुळेच वासराचं संगोपन आणि त्या संदर्भातील योग्य व अचूक नोंदी ठेवणं अत्यावश्यक आहे.
वासराच्या जन्मापासून ते गाभण होईपर्यंतचा प्रवास जणू मनुष्याच्या एका ‘जन्म कुंडली’ सारखा असतो. या ‘कुंडली’ मध्ये खालील महत्त्वाच्या गोष्टी नमूद असाव्यात. जेणेकरून पशुपालकांचा आर्थिक फायदा तर वाढतोच तसेच खरेदी विक्री करतांना सुलभता निर्माण होते.
वासरांच्या करावयाच्या महत्वाच्या नोंदी
• जन्म दिनांक व वजन : जन्मवेळेची नोंद व वजनाची माहिती वासराच्या वाढीचा मागोवा घेण्यासाठी उपयुक्त असते.
• माजावर येण्याचे वय आणि वजन : संगोपन चांगलं झाल्यास कालवड १२–१४ महिन्यांत माजावर येते. त्यावेळी वजन योग्य असेल तर पुढील रेतनही यशस्वी होते. तसेच दीर्घ काळ संगोपन खर्चात बचत होते.
• कृत्रिम रेतनाचा दिनांक : पहिल्या व पुढील रेतनाच्या नोंदींमुळे गाभण कालावधीतील पोषण व निगा नीट राखता येते.
• प्रसूतिचा दिनांक :गाय/म्हैस व्याल्याची नोंद विक्रीवेळी उपयोगी पडते आणि वेतातील अंतर समजतं.
• दूध उत्पादन : दररोज व एकूण वेतातील सरासरी दूध उत्पादनाची माहिती पुढील वेतातील अपेक्षित दूध वाढ समजण्यासाठी आवश्यक आहे.
• वंशावळ : वडीलधाऱ्यांची दूध उत्पादन क्षमता, वंश, आरोग्य यांची नोंद म्हणजे भविष्याच्या गुणवत्तेची दिशा ठरवणारा आरसा.
वरील सर्व माहिती नियमित आणि अचूक पद्धतीने नोंदवून ठेवली तर ही ‘जन्म कुंडली’ फक्त एका वासराची नोंद नसून भविष्याच्या आरोग्यदायी आणि उत्पादक गायीची परिपूर्ण माहिती पत्रिका ठरते.
"आजची कालवड उद्याची गाय असते" म्हणून प्रत्येक वासराचं हेल्थ कार्ड म्हणजेच त्याची 'जन्म कुंडली' तयार करून ठेवणे गरजेचे आणि पशुपालकांच्या फायद्याचे देखील आहे.