मागील काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे थंडीचे प्रमाण अधिकच वाढले आहे. अशावेळी पशुपालकांनी आपल्याकडील जनावरांची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा व परिसरात अलीकडे एका आठवड्यापासून थंडी प्रचंड वाढली आहे. वाढत्या थंडीचा परिणाम जनावरांच्या आरोग्यावर होऊ शकतो. अशावेळी जनावरांना उघड्यावर न बांधता गोठ्यात बांधावे. जेणेकरून जनावरांना थंडी वाजून ती आजारी पडणार नाहीत.
तसेच जनावरांची काळजी घेतांना त्यांच्या आहारात सुका चारा, ओला चारा, खनिज मिश्रण आदी योग्य प्रमाणात देणे ही जबाबदारी देखील पशुपालकांची आहे. यासोबतच जनावरे आजार पडल्यास वेळीच उपचार करुन घेणे आवश्यक आहे.
मोठ्या जनावरांबरोबर वासरांचीही काळजी घ्यावी
आठ दिवसांपासून थंडीत वाढ झाली असून, दिवसभर गारवा जाणवत आहे. शेतात तर अधिक प्रमाणात थंडगार वातावरण राहात आहे. माणसासारखी जनावरांचीदेखील काळजी घेण्याची गरज आहे. जनावरांना गोठ्यात आणि उबदार जागी बांधावे. तसेच नवजात वासरांची काळजी घ्यावी. थंडी अधिक वाढली असल्यामुळे सुती पोते जनावरांच्या अंगावर टाकावे. हिरवा चारा, सुका चारा वेळेवर खाऊ घालावा. तसेच पाणी वेळेवर पाजावे. - डॉ. एस. एस. इंगोले, पशुवैद्यकीय अधिकारी, कुरुंदा.
हेही वाचा : Animal Care In Winter : हिवाळ्यात पशुधनाला होऊ शकते आजारांची बाधा 'अशी' घ्या काळजी