शेतीकामात कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि खर्च कमी करण्याच्या उद्देशाने नाशिक जिल्ह्यातील तरुण अभियंत्यांच्या टीमने एक नाविन्यपूर्ण इलेक्ट्रिक शेती उपकरण अर्थात ई-टिलर विकसित केला आहे. या ई-टिलरचे नाव आहे ‘Agrodash E-Tiller’. जो अतिशय लहान असून अल्प शेती धारक शेतकऱ्यांसाठी मोठा फायद्याचा ठरणारा आहे.
नाशिक जिल्ह्याच्या कोटमगाव (ता. येवला) येथील तेजस चव्हाण, तुषार चव्हाण, सागर भोजने, दर्शन बनकर, गौरव गाढवे, अनिकेत पगार, किरण चव्हाण आणि वेंकटेश आहेर आदींची मिळून हा ई-टिलर विकसित केला आहे. या ई-टिलरमध्ये इको-फ्रेंडली बीएलडीसी मोटर, मजबूत गिअरबॉक्स आणि डिफरेंशियल वापरले आहे.
यामुळे मशीनला जास्त टॉर्क, उत्तम नियंत्रण आणि उच्च कार्यक्षमता मिळते. विशेष म्हणजे या टिलरमध्ये वापरलेल्या बॅटरी २ ते २.३० तासांच्या चार्जिंगमध्ये तब्बल ५.५० तास सतत चालू शकते. ज्यामुळे हा दीर्घ कार्यक्षम वेळ शेतकऱ्यांसाठी मोठा फायद्याचा ठरतो. तथापि दिवसातील बहुतेक शेतीकामे एकाच चार्जमध्ये शेतकऱ्यांना सहज पूर्ण करता येतात.
'ऍग्रोडॅश ई-टिलर'ची वैशिष्ट्ये
• तण काढणे, माती भरणे, पेरणी, कोळपणी, फवारणी आणि जमीन भुसभुशीत करणे आदी कामे करता येतात.
• एकाच मशीनमध्ये अनेक शेतीकामे केल्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि खर्च मोठ्या प्रमाणात बचत होतो.
• पेट्रोल किंवा डिझेलची आवश्यकता नसल्यामुळे हे उपकरण पर्यावरणपूरक आणि कमी देखभाल खर्चाचे आहे.
• शेतीला आधुनिकतेकडे नेणारे आणि ग्रामीण शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणारे हे उपकरण भविष्यात शेती क्षेत्रात नवी क्रांती घडवू शकते.
