कोकण आणि पारंपरिकता यांचा विचार करत असताना सहजच कोकणातील एका फळाची आठवण झाली ते फळ म्हणजे फणस! सध्या मराठी पौष महिना सुरू आहे.
या पौष महिन्यामध्ये थंडीही चांगली पडत आहे. ही थंडी आंबा, काजू, फणस या पिकांच्या मोहरासाठी अनुकूल असते. या महिन्यात आणखी एक कोकणी भाजीची लज्जत काही वेगळी असते ती म्हणजे 'पुस भाजी'
आपण म्हणाल, पुस भाजी म्हणजे काय? पूर्वीच्या काळी पौष महिन्याला 'पुस महिना' असे म्हटले जायचे. तर या मराठी पौष महिन्यात ही भाजी होते म्हणून याला 'पुस भाजी' असे म्हणतात.
फणस तयार होण्यापूर्वी म्हणजेच फणसात गरे येण्यापूर्वी फणसाचे जे फळ असते, कोवळा फणस त्याला कोकणात 'कुयरी' किंवा 'कुवरी' असे म्हणतात.
याच्या वरच्या साली काढून त्याला उकडले जाते व त्याची भाजी केली जाते त्याला 'कुयरीची भाजी' किंवा 'पुस भाजी' असे म्हणतात.
ही भाजी हिवाळ्यात केली जाते.
फणस, खोबरे, गोड, तिखट, मटार, शेंगदाणे, तेलात मोहरी, हळद, हिंग, मेथीचे दाणे, सुखी लाल मिरची याची फोडणी देऊन त्यावर कोथिंबीर टाकून भाजी छान सजवता येते.
ही भाजी जर आपण खाल्ली तर प्रत्येकाची करण्याची पद्धत व चव ही वेगळीच असते. चाकरमानी मुंबईकर किंवा बाहेर गावी राहत असणाऱ्या व्यक्ती यांना या भाजीची निश्चितच आठवण येते. ही भाजी खायला नाही मिळाली.
तर सध्या पार्सल करून कुयऱ्या पाठवल्या जातात. तो फणस कापल्यानंतर त्याच्या चिकाची व हात चिकटण्याची कोणालाही तमा नसते कारण ही भाजी आपल्याला अप्रूप म्हणून खायची असते.
पर्यटकांसाठी 'पुस भाजी डिश' आकर्षण
◼️ कोकणातील पर्यटनासाठी 'पुस भाजी डिश' हे खास आकर्षण ठरत आहे.
◼️ पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांना असे नाविन्यपूर्ण पदार्थ तयार करून दिल्यास आपल्या अर्थव्यवस्थेला निश्चितच चालना मिळेल.
◼️ सध्या ही भाजी विविध पॅकिंगमध्ये उपलब्ध झाली आहे. पण त्याची करण्याची पद्धत यावर त्याची चव अवलंबून असते.
◼️ 'पुस भाजी' विचार जरी छोटा असला तरी त्याची प्रसिद्धी करणे आपल्या हातात आहे.
◼️ आपल्या फणसाच्या या फळाला त्यामुळे चांगलीच बाजारपेठ उपलब्ध होईल असे निश्चित म्हणता येईल!
राजेंद्र जयवंत रांगणकर
गणेशगुळे, रत्नागिरी
अधिक वाचा: शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी 'हा' कारखाना देणार उसाला सरसकट १०० रुपये अनुदान
