Millet Milk : मिलेट मिल्क तयार विविध टप्पे पार करावे लागतात. या आधीच्या भागात आपण भरड धान्याची निवड, स्वच्छता, भिजवणे आणि दळणे आदी चार टप्पे समजून घेतले. यानंतरचे काही टप्पे आहेत, जे आपण या भागातून समजून घेऊयात....
गाळणी
दळून तयार केलेल्या द्रव मिश्रणावर नंतर गाळण्याची प्रक्रिया केली जाते, ज्यामुळे गुळगुळीत आणि एकसंध मिलेट मिल्क मिळते. यासाठी बारीक जाळीचे गाळण, मलमलचा कापड किंवा सिव्ह /फिल्टर वापरले जाते. या प्रक्रियेमध्ये मिश्रण गाळून त्यातील तंतुमय, अर्ध विरघळलेला भाग वेगळा केला जातो.
हे गाळलेले दूध अधिक एकसंध, पिण्यास सोपे आणि सुग्रास बनवते. गाळणीमुळे तयार होणाऱ्या उरलेल्या चोथ्याचा देखील पुनर्वापर करता येतो. अशा प्रकारे गाळणी ही केवळ दुधाच्या गुणवत्तेसाठीच नव्हे तर एकूण शून्य कचरावाली प्रक्रिया (zero-waste) साध्य करण्यासाठीही उपयुक्त ठरते.
उकळवणे किंवा पाश्चरायझेशन (ऐच्छिक)
मिलेट दूध सुरक्षित ठेवण्यासाठी उकळणे किंवा पाश्चरायझेशन आवश्यक असते. घरगुती पद्धतीत ते ५ ते १० मिनिटे उकळले जाते, तर व्यावसायिक स्तरावर पाश्चरायझेशन करून सूक्ष्मजंतू नष्ट केले जातात. UHT (Ultra High Temperature) प्रक्रियेमुळे दूध दीर्घकाळ टिकते. या प्रक्रिया चव, पोत व सुरक्षितता सुधारतात आणि ग्राहकांसाठी मिलेट दूध अधिक विश्वासार्ह बनते.
चव व पोषणमूल्य वाढविणे (ऐच्छिक)
मिलेट मिल्क अधिक स्वादिष्ट व पौष्टिक बनवण्यासाठी त्यामध्ये विविध घटक ऐच्छिक स्वरूपात मिसळले जातात. जसे की खजूर, गूळ, मध यासारखे गोड पदार्थ व व्हॅनिला, दालचिनी, कोकोसारखे चववर्धक घटक मिसळले जातात. फोर्टिफिकेशनद्वारे कॅल्शियम, व्हिटॅमिन डी व प्रथिने यांची भर घालून त्याचे पोषणमूल्य वाढवले जाते. ही प्रक्रिया मिलेट मिल्कला केवळ चविष्टच नव्हे, तर विविध वयोगटांतील ग्राहकांसाठी उपयुक्त आणि संतुलित आहाराचा भाग बनवते.
होमोजेनायझेशन एकजीनसीकरण
मिलेट मिल्कच्या व्यावसायिक उत्पादनात होमोजेनायझेशन ही महत्त्वाची प्रक्रिया असते, ज्यामध्ये उच्च दाबाने दुधातील घन पदार्थ सूक्ष्म करून ते द्रवात एकसंधपणे मिसळले जातात. यामुळे दूध गुठळी विरहीत पोताचे, चवदार व थर न बसणारे बनते. ही प्रक्रिया उत्पादनाची गुणवत्ता, एकसंधता आणि टिकाऊपणा वाढवण्यासाठी वापरली जाते.
पॅकिंग व साठवणूक
घरगुती मिलेट दूध स्वच्छ, निर्जंतुक काचेच्या बाटल्यांमध्ये भरून लगेचच फ्रिजमध्ये ठेवावे. असे केल्यास ते ३ ते ५ दिवस ताजे राहते. वापरण्यापूर्वी हलवून घ्यावे. व्यावसायिक उत्पादनात मिलेट दूध टेट्रापॅक्स किंवा विशेष बाटल्यांत भरले जाते आणि त्यासाठी UHT, पाश्चरायझेशन व होमोजेनायझेशन तंत्रांचा वापर होतो. हे दूध दीर्घकाळ टिकते आणि साठवताना थेट सूर्यप्रकाशापासून दूर व योग्य तापमानात ठेवणे आवश्यक असते.
- श्रीमती काजल नवनाथ तांबवे, पी. हेमाशंकरी, शास्त्रज्ञ, प्रक्रिया आणि मूल्यवर्धन विभाग, भारतीय श्री अन्न अनुसंधान संस्थान, राजेंद्रनगर (हैद्राबाद, तेलंगणा)