सध्या ग्रामीण भागातील एक मोठी समस्या म्हणजे स्थानिक तरुणांमध्ये वाढती बेरोजगारी आणि त्यातून निर्माण होणारी उदासीनता. शहरी भागात नोकरी मिळवण्यासाठी चाललेली धडपड अनेकदा फसते आणि शेतीतून मिळणारे उत्पन्न पुरेसे नसल्यानं तरुणांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते.
मात्र आपल्या परिसरात नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या स्रोतांचा योग्य वापर केला तर ग्रामीण स्तरावरच उद्योग उभारणे शक्य आहे.
फणस (कटहल) हे असंच एक फळ आहे जे बहुसंख्येने ग्रामीण भागात उपलब्ध असते. यावर प्रक्रिया करून घरगुती आणि औद्योगिक दोन्ही पातळ्यांवर चालणारा शेतीपूरक उद्योग सुरू करता येतो. फणसावर प्रक्रिया करून त्याचे विविध खाद्य उत्पादने तयार केली तर त्यांना बाजारात खूप मागणी असून त्यातून उत्पन्नाचे शाश्वत स्रोत निर्माण करता येतात.
फणसाचे पोषणमूल्य
फणस हे केवळ चविष्ट फळ नाही तर ते अनेक पोषकतत्त्वांनी परिपूर्ण आहे. त्यात प्रथिने, फायबर्स, जीवनसत्त्वे A, C आणि B-complex, तसेच खनिजे (कॅल्शियम, फॉस्फरस, लोह) भरपूर प्रमाणात असतात. फायबर्समुळे पचन सुधारते, कोलेस्टेरॉल कमी होतो आणि जीवनसत्त्वे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. त्यामुळे फणस आरोग्यासाठी फायदेशीर असतो.
फणसावर आधारित प्रक्रिया उत्पादने आणि त्यांच्या प्रक्रिया!
१) फणसाची भाजी (शिजवलेला फणस)
साहित्य : फणस - ५०० ग्रॅम (छाटलेला), १ कांदा (मध्यम आकाराचा), १ टोमॅटो (मध्यम आकाराचा), २ हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट १ चमचा, हळद अर्धा चमचा, लाल तिखट १ चमचा, धने पूड १ चमचा, मीठ (चवीनुसार), तेल २ चमचे, कोथिंबीर (सजावटसाठी).
कृती
• फणसाची भाजी स्वच्छ धुवून ४-५ मिनिटे उकळवा आणि बाजूला ठेवा.
• कढईत तेल गरम करून त्यात कांदा आणि आले-लसूण पेस्ट परतून घ्या व नंतर टोमॅटो आणि मिरची घालून नीट शिजवा.
• हळद, लाल तिखट, धने पूड आणि मीठ घालून मसाला तयार करा.
• फणसाचे तुकडे घालून चांगले मिसळा आणि झाकण ठेवून मध्यम आचेवर १०-१५ मिनिटे शिजवा.
• कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
२)फणसाचे पापड
साहित्य : सुकवलेला फणस – २५० ग्रॅम, लाल तिखट – १ चमचा, मीठ – चवीनुसार, गूळ – १ टेबलस्पून (ऐच्छिक), जिरे पूड, धने पूड – थोडेसे, तेल – थोडेसे (मळताना).
कृती
• सुकवलेला फणस बारीक वाटून घ्या.
• त्यात लाल तिखट, मीठ, गूळ आणि इतर मसाले घालून चांगले मळा.
• थोडे तेल घालून लहान लाटलेल्या पापड तयार करा.
• पापड उन्हात किंवा डिहायड्रेटरमध्ये पूर्ण वाळवा.
• थंड झाल्यावर साठवून ठेवा व गरजेनुसार वापरा.
३) फणसाचा सुक्का (Dry Stir Fry)
साहित्य : फणस – ४०० ग्रॅम (छाटलेला), तेल – २ टेबलस्पून, मोहरी – १ चमचा, हिंग – चिमूटभर, कढीपत्ता – काही पाने, हिरव्या मिरच्या – २-३, हळद, तिखट, मीठ – चवीनुसार, खोबरे – २ टेबलस्पून (किसलेले), लिंबाचा रस – १ टेबलस्पून.
कृती
• फणस धुऊन चिरून ठेवा.
• कढईत तेल गरम करून मोहरी, हिंग आणि कढीपत्ता फोडणी द्या.
• मिरच्यांचे तुकडे टाका व परतून घ्या.
• फणसाचे तुकडे व मसाले घालून मध्यम आचेवर शिजवा.
• गरज असल्यास थोडे पाणी घालून झाकण ठेवा.
• शिजल्यावर खोबरे व लिंबाचा रस घालून मिसळा.
• गरम गरम सर्व्ह करा.
४)फणसाचे लोणचे (अचार)
साहित्य : फणस – ५०० ग्रॅम (छोटे तुकडे), मीठ – २ टेबलस्पून, लाल तिखट – २ टेबलस्पून, हळद – ½ टेबलस्पून, मोहरी पावडर – १ टेबलस्पून, तेल – १ कप, लसूण – १०-१२ पाकळ्या (किसलेले), ५-६ सुकलेल्या मिरच्या.
कृती
• फणस उकळून उन्हात वाळवा.
• सर्व मसाले व मीठ फणसावर नीट लावा.
• तेल गरम करून त्यात मोहरी व लसूण फोडणी द्या.
• फोडणी व गरम तेल अचार मिश्रणात मिसळा.
• नीट ढवळून स्वच्छ बाटलीत भरा.
• ५-६ दिवस उन्हात ठेवा.
• लोणचे तयार आहे जेवणात साठवून वापरा.
५)फणसाचे चिप्स
साहित्य : फणस – १ मध्यम (काटलेला), मीठ – चवीनुसार, लाल तिखट – १ चमचा (ऐच्छिक), हळद – ½ चमचा (ऐच्छिक), तेल/तूप – तळण्यासाठी.
कृती
• फणसाचे तुकडे बारीक कापून १०-१५ मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा.
• स्वच्छ पाण्यातून काढून सुकवा.
• त्यावर मीठ, तिखट, हळद लावून मिक्स करा.
• गरम तेलात थोडे थोडे तुकडे तळा.
• पेपर टॉवेलवर काढा व थंड झाल्यावर साठवून ठेवा.
६)फणसाचा जॅम
साहित्य : फणस – ५०० ग्रॅम (गोडसर भाग), साखर – ३०० ग्रॅम (चवीनुसार), लिंबाचा रस – २ टेबलस्पून, पाणी – १ कप, (वेलची पूड – ऐच्छिक).
कृती
• फणसाचे लहान तुकडे करा.
• एका पातेल्यात फणस, साखर, पाणी घालून मध्यम आचेवर शिजवा.
• सतत ढवळा, मिश्रण घट्ट होईपर्यंत (३०-४० मिनिटे).
• लिंबाचा रस आणि वेलची पूड घाला.
• थंड झाल्यावर स्वच्छ जारमध्ये भरून ठेवा.
• फ्रिजमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकतो.
फणस हे फळ चविष्ट, पौष्टिक आणि सहज उपलब्ध असलेले आहे. ग्रामीण भागातच त्यावर प्रक्रिया करून भाजी, पापड, अचार, चिप्स, जॅम अशा विविध उत्पादनांचे लघुउद्योग उभारता येतात. फणस प्रक्रिया उद्योग हा शाश्वत, कमी भांडवलात सुरू होणारा आणि अधिक नफा देणारा पर्याय ठरू शकतो. यामुळे तरुणांना रोजगार, महिलांना स्वयंरोजगार आणि गावातील अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते.
डॉ. सोनल रा. झंवर
साहाय्यक प्राध्यापक,
एम. जी. एम. अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय,
गांधेली, छ. संभाजीनगर.