'या' अर्थमंत्र्यांनी सर्वाधिक 10 वेळा सादर केलाय अर्थसंकल्प, नंतर देशाचे पंतप्रधानही बनले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 06:02 PM2023-01-19T18:02:52+5:302023-01-19T18:09:16+5:30

Budget 2023: न‍िर्मला सीतारमण यावर्षी पाचव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

Union Budget 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारामन यावेळी पाचव्यांदा अर्थसंकल्प सादर करतील.

लोकसभा निवडणुकीपूर्वी सादर होणाऱ्या सर्वसाधारण अर्थसंकल्पाकडून नोकरदार वर्गापासून व्यावसायिक आणि शेतकऱ्यांपर्यंत अनेकांच्या अपेक्षा आहेत. पण स्वतंत्र भारतात आतापर्यंत सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम कोणत्या अर्थमंत्र्यांच्या नावावर आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?

अंतरिम अर्थसंकल्प दोनदा सादर केला- माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावावर 1947 पासून सर्वाधिक वेळा देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम आहे. देशाचे अर्थमंत्री असताना त्यांनी 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला होता.

ते 13 मार्च 1958 ते 29 ऑगस्ट 1963 पर्यंत पहिल्यांदा देशाचे अर्थमंत्री झाले. यानंतर 1967 ते 1969 या काळातही ते अर्थमंत्री होते. यावेळी त्यांनी एकूण 10 अर्थसंकल्प सादर केले. मोरारजी देसाई यांनीही दोनदा अंतरिम अर्थसंकल्पही सादर केला होता.

वाढदिवसाला दोनदा अर्थसंकल्प सादर केला- मोरारजी देसाई यांचा जन्म 29 फेब्रुवारीला झाला होता. या कारणास्तव त्यांचा वाढदिवस चार वर्षांतून एकदा यायचा. 1964 आणि 1968 मध्ये त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी अर्थसंकल्प सादर केला.

वाढदिवसाला अर्थसंकल्प सादर करणे हा देखील एक विक्रमच आहे. (पूर्वी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या तारखेला सादर केला जात होता.) अर्थमंत्री असताना त्यांनी 6 वेळा आणि उपपंतप्रधान असताना 4 वेळा अर्थसंकल्प सादर केला होता.

अर्थमंत्री झाल्यानंतर मोरारजी देसाई देशाचे पंतप्रधानही झाले. त्यांच्यानंतर माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी सर्वाधिक 9 वेळा देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. 1996 ते 21 एप्रिल 1997 या काळात त्यांनी पहिल्यांदा अर्थमंत्रीपद भूषवले.

मे 1997 ते 19 मार्च 1998 पर्यंत ते इंद्रकुमार गुजराल यांच्या काळातही अर्थमंत्री होते. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली 2004 आणि 2009 मध्ये स्थापन झालेल्या UPA-1 आणि UPA-2 मध्येही त्यांना हेच मंत्रालय देण्यात आले होते.