... म्हणून मनसेची शिवजयंती तिथीनुसार साजरी, ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 02:53 PM2022-02-19T14:53:16+5:302022-02-19T15:08:34+5:30

राज ठाकरेंनी शिवजयंतीबद्दल बोलताना मनसेकडून तिथीनुसार शिवजयंती का साजरी केली जाते, याचे संदर्भासहीत स्पष्टीकरण दिले. शिवजयंती तिथीनं साजरी करायचं कारण आहे.

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आज चांदीवली आणि गोरेगाव येथे मनसेच्या नव्या पक्ष कार्यालयाचं उदघाटन आज राज ठाकरे यांच्या हस्ते झालं.

राज ठाकरेंनी शिवजयंतीबद्दल बोलताना मनसेकडून तिथीनुसार शिवजयंती का साजरी केली जाते, याचे संदर्भासहीत स्पष्टीकरण दिले. शिवजयंती तिथीनं साजरी करायचं कारण आहे.

आपल्याकडे जेवढे सण येतात, दिवाळी येते, गणपती येतात, जेवढे काही सण आपण साजरे करतो. ते सर्व सण तिथीनुसार आपण साजरे करतो.

आपण, ते सण तारखेनं साजरे करत नाही. गेल्यावर्षी दिवाळी कोणत्या तारखेला होती, यावर्षी त्याच तारखेला नसते. मागच्यावर्षी गणपती कोणत्या तारखेला होते, यावर्षी वेगळ्याच तारखेला येतात.

जन्मदिवस, वाढदिवस हे आपले असतात. महापुरुषांचा, तोही छत्रपतींचा जन्मदिवस हा आपल्यासाठी सण आहे. म्हणून तो तिथीनुसार साजरा करायचा. याचा अर्थ आज साजरी करू नये असा नाही.

कारण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 365 दिवस साजरी केली पाहिजे. त्यामुळेच, तिथीनं साजरी होणारी शिवजयंती ही यापेक्षाही जल्लोषात साजरी केली पाहिजे, असे राज ठाकरेंनी म्हटले.

राज ठाकरे यांना पाहण्यासाठी यावेळी कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. चांदीवली येथील कार्यालयाचं उदघाटन करुन झाल्यानंतर राज ठाकरे गोरेगाव येथील कार्यालयाचं उदघाटन करण्यासाठी रवाना झाले होते.

गोरेगाव येथील कार्यालयाचं उदघाटन करताना कार्यकर्त्यांची तुफान गर्दी झाली होती. राज यांच्या हस्ते उदघाटन झाल्यानंतर कार्यालयाच्या शेजारीच एक स्टेज उभारण्यात आला होता.

राज ठाकरे, बाळा नांदगावकर यांच्यासह मनसेचे इतर नेते आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. पण, स्टेजवर क्षमतेपेक्षा अधिक कार्यकर्ते आल्यानं स्टेजचा पुढील भाग कोसळला.

सुदैवाने राज ठाकरे यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. राज ठाकरे यांचे सुरक्षारक्षक, पोलीस आणि कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे ते सुखरूप राहिले. तर, कार्यकर्त्यांनाही कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.