कोकणातील निसर्गसौंदर्य पाहा, वेंगुर्ला रॉक्स प्रदेशात सापडल्या ४ गुहा

By सचिन लुंगसे | Published: September 27, 2022 02:24 PM2022-09-27T14:24:49+5:302022-09-27T14:32:05+5:30

सचिन लुंगसे - मॅनग्रोव्ह अँड मरिन बायोडायव्हर्सिटी कन्झर्व्हेशन फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र या संस्थेने कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या वेंगुर्ला रॉक्सचा अभ्यास करण्याचा प्रकल्प कार्यान्वित केला.

मॅनग्रोव्ह अँड मरिन बायोडायव्हर्सिटी कन्झर्व्हेशन फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र या संस्थेने कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या वेंगुर्ला रॉक्सचा अभ्यास करण्याचा प्रकल्प कार्यान्वित केला.

हा अभ्यास करत असताना या भागाचे अधिक चांगले संरक्षण व संवर्धन करण्याचे पर्याय शोधण्यास फाऊंडेशनला प्रवृत्त केले आहे. जानेवारी ते जून २०२० या कालावधीत सलिम अली सेंटर फॉर ऑर्निथोलॉजी अँड नॅचरल हिस्टरी (सॅकॉन) या संस्थेतील संशोधक शिरीष मांची, गोल्डिन क्वाड्रोस आणि धनुषा कावळकर्ते यांनी वेंगुर्ला रॉक्स प्रदेशाचा अभ्यास केला आणि चार गुहा शोधल्या.

त्यापैकी बर्न्ट आयलँडवरील पाखोली ढोल नावाच्या एकाच गुहेपर्यंत ते पोहोचू शकले. गुहेच्या मूळच्या दृश्यमानतेनुसार गुहेची तीन झोनमध्ये विभागणी झाली होती: प्रवेश झोन, संधिप्रकाश झोन आणि अंधार झोन.

वातावरण बदल आणि समुद्राची पातळी वाढल्यामुळे या गुहेच्या नाजूक परिसंस्थेला व त्यांच्या जैवविविधतेला असलेल्या धोक्याकडे या अभ्यासातील एका महत्वाच्या निष्कर्षाने लक्ष वेधले आहे. पाणथळ जागांचे शास्त्रज्ञ गोल्डिन क्वाड्रोस म्हणाले की, वेंगुर्ल्याचा द्वीपसमूह हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातले एक वैशिष्ट्य आहे.

या द्वीपसमूहात २० छोटी बेटे आहेत. त्यापैकी तीन बेटे तुलनेने मोठी आहेत. यात न्यू लाइटहाउस बेट, ओल्ड लाइटहाउस बेट आणि बर्न्ट आयलँड या बेटांचा समावेश होतो. उर्वरितांपैकी नऊ छोटी बेटे आहेत आणि आठ पाण्याखाली असलेले खडक आहेत.

“ही छोटी बेटे समुद्रातील महत्त्वाचे भाग आहेत, जे किनाऱ्यावरील नागरिकांसाठी नैसर्गिकरित्या संरक्षक म्हणून काम करतात. त्याचप्रमाणे वेंगुर्ला समुद्राच्या परिसरात भारतीय पाकोळींचा वावर असल्याने तिथे एक विशिष्ट प्रकारची परिसंस्था तयार झाली आहे.

या परिसंस्थेत आपणास अजूनही अज्ञात असलेल्या व ओळख न पटलेल्या प्रजाती आहेत. वातावरण बदलामुळे समुद्राची पातळी वाढण्याची शक्यता आहे. या वाढलेल्या पातळीचा गुहेतील अपृष्ठवंशीयांच्या विविधतेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे अशा अधिवासांना कोणत्याही प्रकारच्या पर्यटनापासून संरक्षण गरजेचे असते,” असे क्वाड्रोस यांनी स्पष्ट केले.

सॅकोनने केलेल्या अभ्यासात पाकोळी ढोलमध्ये २१ अपृष्ठवंशीयांची नोंद करण्यात आली. यात कोळी, भुंगेरा, खेकडे, पतंग, फुलपाखरे, चतुर, रातकीडा (क्रिकेट), ख्रिसमस ट्री वर्म्स, सिल्व्हरफिश आणि बरनॅकल्स इत्यादी प्रजातींचा समावेश आहे. या अभ्यासात पाच पृष्ठवंशीय सजीवही आढळून आले. यात पाकोळी, कबुतरे आणि मार्टिन हे तीन पक्षी, एक सस्तन प्राणी (घूस) आणि एक सरपटणारा प्राणी (छोटी पाल) यांचा समावेश होता.

संशोधकांना आढळून आले की, भारतीय पाकोळ्यांची घरटी पाकोळी गुहेत असून त्यांची संख्या बरीच असल्याचे दिसून आले. तसेच या गुहेत ४७०० पक्ष्यांची घरटी असल्याचे संशोधकांना आढळून आले. या अभ्यासादरम्यान सॅकॉनने या गुहांचा अभ्यास करताना द्विमिती व त्रिमिती नकाशे विकसित केले. संशोधकांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक शाळा व महाविद्यालयांमध्ये जागरुकता कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांमध्ये त्यांनी स्थानिकांना या गुहांच्या संवर्धनाच्या महत्त्वाविषयी माहिती दिली.

कांदळवन कक्षाचे अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक आणि मॅनग्रोव्ह फाउंडेशनचे कार्यकारी संचालक विरेंद्र तिवारी यांनी सांगितले की, या अभ्यासाच्या निष्कर्षांच्या आधारे कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठान या ठिकाणाच्या अधिक चांगल्या संरक्षणाच्या शक्यतांची पडताळणी आणि स्थानिकांमध्ये जनजागृती करत आहे.

“सध्याचा अभ्यास वेंगुर्ला खडक द्वीपसमूहाच्या गुहेतील प्राणीसृष्टी समजून घेण्यासाठी करण्यात आला होता. या गुहांमधील अधिवास व त्यांना असलेला धोका हा या अभ्यासाचा विषय होता. त्याचप्रमाणे या गुहांमधील परिसंस्था आणि पर्यायी उत्पन्नाच्या माध्यमातून स्थानिक समुदायाच्या शाश्वत विकासासाठी या परिसंस्थेच्या संवर्धनाचे महत्त्व समजून घेण्यास हा अभ्यास सक्षम करेल. त्याचप्रमाणे या ठिकाणाच्या भौगोलिक स्थानामुळे पर्यावरणीय समृद्धीचे दस्तावेजीकरण करणे महत्त्वाचे आहे”, असे तिवारी म्हणाले.