मोहिते पाटलांचं ठरलं, पण माढ्यातील पुढचा अंक अजून बाकी?; रामराजे अजित पवारांच्या भेटीला 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 12:27 PM2024-04-12T12:27:37+5:302024-04-12T12:30:38+5:30

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे नाईक निंबाळकर हेदेखील माढ्यातील महायुतीचे उमेदवार व विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर नाराज असून ते शरद पवारांच्या पक्षात घरवापसी करण्याचा निर्णय घेऊ शकतात.

Madha Lok Sabha Constituency Ramraje Naik Nimbalkar meets Ajit Pawar and Sunil Tatkare | मोहिते पाटलांचं ठरलं, पण माढ्यातील पुढचा अंक अजून बाकी?; रामराजे अजित पवारांच्या भेटीला 

मोहिते पाटलांचं ठरलं, पण माढ्यातील पुढचा अंक अजून बाकी?; रामराजे अजित पवारांच्या भेटीला 

Madha Lok Sabha ( Marathi News ) :माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला असून धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मोहिते पाटील लवकरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असून त्यांची उमेदवारीही निश्चित झाली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर हेदेखील माढ्यातील महायुतीचे उमेदवार व विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर नाराज असून रामराजेही शरद पवारांच्या पक्षात घरवापसी करण्याचा निर्णय घेऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर रामराजेंची समजूत काढण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू असून काही वेळापूर्वी रामराजे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासोबत बैठक झाली आहे.

रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील आणि रामराजेंचा विरोध होता. मात्र हा विरोध डावलून भाजप नेतृत्वाने पुन्हा एकदा रणजीतसिंह निंबाळकरांवर विश्वास टाकत त्यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे मोहिते पाटील आणि रामराजेंची अस्वस्थता वाढली आणि दोघांनी मिळून नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू केली. या नाराज गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू होती. मात्र अनेक दिवस लोटल्यानंतरही भाजपने आपला उमेदवार बदलण्यास तयारी न दर्शवल्याने अखेर आता धैर्यशील मोहिते पाटील यांनी हातात तुतारी घेण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकरही शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या भेटीत अजित पवार हे रामराजेंची समजूत काढण्यात यशस्वी ठरतात का, हे पाहावं लागेल.

राजीनामा देताना धैर्यशील मोहिते काय म्हणाले?

धैर्यशील मोहिते पाटील यांनी काल रात्री भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहीत पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. "मी भारतीय जनता पार्टी, सोलापूर जिल्हा, संघटन सरचिटणीसपदाची जबाबदारी सांभाळली आहे. तसेच माळशिरस विधानसभा निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी माझ्याकडे आहे. या कार्यकाळात जिल्हा, मंडल कार्यकारणी, मोर्चा, प्रकोष्ठ इत्यादी संघटनात्मक रचना गठीत करून कार्यान्वित करण्याचे कार्य केले. तसेच शक्तीकेंद्र, सुपर बॉरीयर, बूथ रचनाही पूर्ण करून सक्रिय केल्या. वेळोवेळी पक्षाचे विविध कार्यक्रम आयोजीत करून संघटना व बूथच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले आहे. आपण माझ्यावर दाखविलेला विश्वास व दिलेल्या संधीबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपणास कळवू इच्छितो की, मी माझ्या वैयक्तिक कारणास्तव, भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदांचा, तसेच भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा देत आहे, त्याचा स्वीकार व्हावा, ही विनंती," असं मोहिते पाटील यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, आतापर्यंत मोहिते पाटील आणि फलटणच्या राजे गटात अनेक बैठका झाल्या आहेत. त्यामुळे रामराजेंनी पक्षांतर केलं नाही तरी ते आतून धैर्यशील मोहिते पाटलांचीच मदत करण्याची शक्यता आहे.

माढ्यासाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात 

सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्याची सोय करण्यात आली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे १८ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते १६ एप्रिल रोजी अर्ज दाखल करणार आहेत. 

Web Title: Madha Lok Sabha Constituency Ramraje Naik Nimbalkar meets Ajit Pawar and Sunil Tatkare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.