Join us
Daily Top 2Weekly Top 5

'अजूनही बरसात आहे', मुक्ता बर्वे, उमेश कामत 'या' तारखेपासून रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 08:00 IST

मुक्ता बर्वे आणि उमेश कामत यांनी लग्न पाहावे करून या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. तब्बल ८ वर्षांनी ही जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.

सोनी मराठी वाहिनीवर १२ जुलैपासून सुरू होणाऱ्या 'अजूनही बरसात आहे' या मालिकेत चित्रपटसृष्टीतले लाडके चेहरे, मुक्ता बर्वे आणि उमेश कामत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.  त्यांचे चाहते आणि प्रेक्षक त्या दोघांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत. बऱ्याच कालावधीनंतर मुक्ता आणि उमेश छोट्या पडद्यावर परत आले आहेत. याआधी मुक्ता आणि उमेश यांनी लग्न पाहावे करून या चित्रपटात एकत्र काम केलं होतं.

 

तब्बल ८ वर्षांनी ही जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकदा  पाहायला मिळणार आहे.एवढंच नाही तर उमेश सात वर्षांनंतर छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. मालिकेच्या नावातून आणि जाहिरात पाहून ही एक प्रेमकथा आहे असं वाटतंय. थोडी खुसखुशीत आणि अनेक रंगांनी भरलेली मीरा आणि आदी यांची ही प्रेमकथा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

 

 

सध्याच्या वातावरणात सोनी मराठी वाहिनीने प्रेक्षकांसाठी ही खुसखुशीत मालिका  आणली आहे.  प्रेमाला कुठे असते Expiry Date, असं म्हणणार्‍या मुक्ता आणि उमेश यांची ही एक  परिपूर्ण प्रेमकहाणी असणार आहे. मीरा आणि आदी ही त्यांच्या व्यक्तिरेखांची नावं आहेत. मालिकेच्या दोन्ही प्रोमोंना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या मालिकेतून प्रेक्षकांना  मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. 

 रोहिणी निनावे आणि मुग्धा गोडबोले यांनी मालिकेची कथा, पटकथा आणि संवाद केले आहेत तर केदार वैद्य मालिकेचे दिग्दर्शन करत आहेत. या मालिकेच्या शीर्षकगीतासाठी देवकी पंडित आणि स्वप्नील बांदोडकर यांनी आवाज दिला असून अशोक पत्की यांनी मालिकेचे शीर्षकगीत संगीतबद्ध केले आहे. मालिकेमध्ये राजन भिसे, उमा सरदेशपांडे, समिधा गुरू, सूचिता थत्ते, पल्लवी वैद्य, सचिन देशपांडे अशी कलाकार मंडळीही असणार आहेत.  

 

टॅग्स :मुक्ता बर्वेउमेश कामत