Join us  

New Marathi Serial : "जिंकणार घराला लागलेला शाप ", झी मराठीवर येतेय ‘चंद्रविलास’ नवी मालिका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 7:00 AM

टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी अनेक वाहिन्या नव्या नव्या मालिका घेऊन येत आहेत. आता आणखी एक नवी मालिका येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येतेय.

टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी अनेक वाहिन्या नव्या नव्या मालिका घेऊन येत आहेत. आता आणखी एक नवी मालिका येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. होय, झी मराठी (Zee Marathi )या वाहिनीवर लवकरच एक मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. येत्या काळात झी मराठीवरील बऱ्याच मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असून नव्या मालिका सुरू झाल्या आहेत आणि यात आणखी एका मालिकेची भर पडणार आहे.

 झी मराठीवर आता ‘चंद्रविलास’ ही नवी मालिका सुरु होणार आहे. ही गोष्ट आहे ‘चंद्रविलास’ या दोनशे वर्षांपूर्वीच्या वास्तूची आणि त्यात अडकलेल्या बाप-लेकीची. अनंत महाजन आणि त्याची मुलगी शर्वरी गावातल्या एका जुन्या वाड्यात जातात आणि तिथे अडकून पडतात. ते दोघं तिथे पोहोचल्यापासून अनाकलनीय घटनांची एक मालिकाच सुरू होते. या घटनांमागे असतं, ते या वास्तूत गेल्या दोनशे वर्षांपासून वास्तव्याला असलेला एक आत्मा. त्या आत्म्याला नेमकं काय हवंय, त्यानं कोणत्या उद्देशानं या दोघा वडील-मुलीला त्या वाड्यात अडकवून ठेवलंय, त्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तो आत्मा कोणकोणत्या गोष्टी घडवून आणणार आहे, या सगळ्या दरम्यान त्यांना आणखी कोण-कोण भेटणार आहे आणि त्या आत्म्याच्या तावडीतून सुटण्यासाठी त्या दोघांना कोणत्या दिव्यातून जावं लागणार आहे, ह्या सगळ्याचा उलगडा या मालिकेतून होणार आहे. 

चंद्रविलासमधला वास्तव्याचा काळ हा अनंत आणि शर्वरी या बाप-लेकीमधल्या प्रेमाची परीक्षा पाहणारा कसोटीचा काळ असणार आहे.

दुष्टशक्तींच्या अचाट सामर्थ्यापुढे वडील-मुलीतल्या प्रेमाचा निभाव लागेल का, अनंत आपल्या लाडक्या मुलीला संकटातून वाचवू शकेल का, हे या उत्कंठावर्धक मालिकेत पाहायला मिळणार आहे. प्रत्येक भागागणिक एक नवा खुलासा आणि दर खुलाशामागे एक नवी कहाणी असलेली ही मालिका प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात नक्कीच यशस्वी होईल, ह्या मालिकेत प्रमुख भूमिकेत वैभव मांगले असणार आहे. वैभव मांगलेचा हा नवीन लुक प्रेक्षकांना नक्कीच भावेल यात शंकाच नाही. मालिकेचं लेखन केलंय समीर गरुड आणि प्रसाद जोशी यांनी. "चंद्रविलास" २७ मार्चपासून रात्री ११ वा. आपल्या झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :झी मराठी