Join us

वजन कमी करण्यासाठी जास्त सॅलेड खाण्याचे गंभीर दुष्परिणाम, पोटाचं तंत्र बिघडण्याचा मोठा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2022 15:56 IST

सॅलेड आहारात असावेच पण त्याचं योग्य प्रमाण असावं, नुसते सॅलेड खाल तर?

राजश्री कुलकर्णी ( एम.डी. आयुर्वेद)

सॅलेड खाण्याचे भरपूर फायदे आहेतच. पण फक्त कच्ची फळं, भाज्या, फळांचे, पालेभाज्यांचे रस हेच सगळं खाल्लं तर तर पचनशक्तीवर अतिरेकी ताण येतो. वजन कमी करायचं म्हणून सॅलेड डाएट करताना हे लक्षात ठेवायला हवं. 

सॅलेड खूप प्रमाणात खाण्याचे दुष्परिणाम काय?

१. जास्त प्रमाणात कच्चं अन्न, भाज्या खाल्ल्यानं पोट गुबारतं. गॅसेस होतात. जणांना त्यातील जास्त प्रमाणात असणाऱ्या तंतुमय पदार्थामुळे पचन बिघडून नेहमी काही कारण नसताना जुलाब होत राहातात.२. बरेचदा किती प्रमाणात सॅलड्स खावीत हे लक्षात न आल्यानं लोकं एक तर खूप जास्त प्रमाणात प्रथिनं, स्निग्ध पदार्थ त्यात टाकतात किंवा नुसतं सॅलेड खात राहिल्यानं पोषण व्यवस्थित मिळत नाही. आपल्या शरीराच्या सर्व प्रक्रिया चांगल्या पद्धतीनं सुरु राहायच्या असतील तर सगळ्या प्रकारचे आहार घटक घेतलेच पाहिजेत. ज्यात धान्यांच्या स्वरूपात कार्ब, डाळीच्या रूपात प्रथिनं, गायीचं / म्हशीच तूप फॅट्स म्हणून, थोडं मीठ, थोडी शिजलेली भाजी, एखादी लोणच्याची फोड,लिंबाची फोड आणि थोड्या प्रमाणात चटणी,कोशिंबीर हे घटक आवश्यक असतात.

(Image : google)

३. सॅलड्स खायला हरकत नाही पण त्यांचं प्रमाण कमी असावं. एका वेळी खूप किंवा पोटभर केवळ सॅलेड असं खाऊ नये.४. ज्यांना वजन कमी करायचं आहे आणि त्यासाठी सॅलेड खायचं असेल तरत्यांनी त्याचा समतोल साधला पाहिजे. थोड्या हिरव्या भाज्या, त्यात थोडे शिजलेले मूग किंवा शेंगदाणे, थोडं तेल,थोडा लिंबाचा रस घालून आहार समतोल करता येतो.

(Image : google)

५. सॅलेड बनवलं की लगेच खावं. खूप वेळ मध्ये गेल्यास त्याचा रंग,चव आणि गुणधर्म सगळंच बदलतं.६. जेवणात सॅलड्स किंवा कोशिंबिरी वापरायच्या असतील तर कमी प्रमाणात म्हणजे एकूण आहाराच्या २५ टक्के इतपतच खाव्या.७. शक्यतो विकतचं,पॅकबंद सॅलेड वापरु नयेत. कारण त्यात जंतुसंसर्ग होण्याची किंवा आधीच झालेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.८. एकदा सॅलेड खाल्लं की नंतर कमीतकमी दोन तास तरी काही खाऊ नये म्हणजे त्याचं पचन चांगल्या पद्धतीनं होईल . जेवणात कार्बचं प्रमाण कमी करावं पण पूर्ण बंद करु नये. त्याच त्याच भाज्या न वापरता त्यात वारंवार बदल करावा. अशा पद्धतीनं सॅलड्स मॅनेज केल्यास त्यांचा पूर्ण फायदा आपण मिळवू शकतो. (लेखिका आयुर्वेद तज्ज्ञ आहेत.)

टॅग्स :अन्नआरोग्य