Join us  

रोज प्या 1 ग्लास गाजर-बीट ज्यूस, एक दोन नाही तर मिळतील 14 फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2021 5:04 PM

अनेक आरोग्यविषयक समस्यांवर सोपं आणि स्वस्त उत्तर म्हणजे बीट गाजराचं ज्यूस. महागडी सौंदर्य उत्पादनं जे काम करु शकत नाही ते थंडीत रोज एक ग्लास बीट गाजराचं ज्यूस पिल्यानं सहज होतं. बीट गाजराच्या ज्यूसचे फायदे सविस्तर वाचलेत तर चव आवडत नाही म्हणून नाक मुरडणारेही आवडीने हे ज्यूस प्यायला लागतील, तेही रोज!

ठळक मुद्देबीट आणि गाजर हे दोन्हीही सूपरफूड असून त्यांच्या एकत्र सेवनानं एक दोन नाही 14 फायदे मिळतात.शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यासाठी हे ज्यूस आहे प्रभावी.वजन कमी करणे आणि सौंदर्य वाढवणे हे या ज्यूसचं वैशिष्टय!

बीटाला सूपरफूड म्हटलं जातं. रोजच्या आहारात सलाड, कोशिंबीर या स्वरुपात बीटाचा समावेश असणं गरजेचं आहे असं आहारतज्ज्ञ सांगतात. हिवाळ्यात बीट खाण्यासोबतच बीट आणि गाजराचा ज्यूस पिणं हे लाभदायक मानलं जातं. नुसतं बीटाचं ज्यूसही करतात पण अनेकांना केवळ बीटाच्या ज्यूसची चव आवडत नसल्याने तज्ज्ञ बीटाचं ज्यूस करतान त्यात गाजर घालण्यास सांगतात. गाजरातही पोषक मूल्यं भरपूर असल्यानं या दोघांचं एक ग्लास ज्यूस पिल्यानं आरोग्यास एकाच वेळी अनेक फायदे मिळतात. थंडीत तर बीट गाजराचं ज्यूस रोज पिण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देतात. सौंदर्यापासून हदयाच्या आरोग्यापर्यंत अनेक लाभ या ज्यूसद्वारे मिळतात. अनेक आरोग्यविषयक समस्यांवर सोपं आणि स्वस्त उत्तर म्हणजे बीट गाजराचं ज्यूस. महागडी सौंदर्य उत्पादनं जे काम करु शकत नाही ते थंडीत रोज एक ग्लास बीट गाजराचं ज्यूस पिल्यानं सहज होतं. बीट गाजराच्या ज्यूसचे फायदे सविस्तर वाचलेत तर चव आवडत नाही म्हणून नाक मुरडणारेही आवडीने हे ज्यूस प्यायला लागतील, तेही रोज!

Image: Google

बीट गाजराचं ज्यूस का प्यावं?

1. बीटात असलेल्या बीटाइन या घटकामुळे बीट हे उत्तम डिटॉक्सिफायर मानलं जातं. तसेच लिव्हरचं काम उत्तम रित्या चालण्यासाठी आवश्यक असलेली पोषण मदत बीटातून मिळते. तर गाजराक्या रसामुळे शरीरातील विषारी पदार्थ सहज बाहेर पडतात.

2. बीट आणि गाजर हे दोन्हीही सूपरफूड असून त्यांच्या एकत्र सेवनानं शरीरावरील सूज कमी होते. बीट आणि गाजरात पोषक घटक आणि अँण्टिऑक्सिडण्टस भरपूर असल्यानं शरीरावरील सूज कमी करण्यास बीट गाजराचं ज्यूस परिणामकारक ठरतं.

3. बीट आणि गाजरामधे चयापचय क्रियेला उत्तेजन देणारे घटक असतात. या ज्यूसमुळे बध्दकोष्ठतेची समस्या दूर होते. या दोन्ही गोष्टींमधील फायटो न्यूट्रीएण्टसमुळे पचन क्रिया सुधारते. या ज्यूसमुळे रक्तातील साखर नियंत्रित राहाते, आतड्यांचं आरोग्य सुरक्षित राहातं.

Image: Google

4. बीटामधे नायट्रेट तत्त्वं असतात. नायट्रिक तत्त्वं पोटात गेल्यावर त्याचं नायट्रिक ऑक्साइडमधे परिवर्तन होतं. यामुळे रक्तवाहिन्यांवरील ताण कमी होतो. रक्तप्रवाह सुधारतो. मेंदूतील रक्तपुरवठा सुधारतो आणि ऑक्सिजनची पातळी वाढते.

5. बीट आणि गाजरात बीटा कॅरोटीन असतं. याचा उपयोग शरीरात अ जीवनसत्त्वाची निर्मिती करण्यास होतो. यामुळे नजर सुधारते. बीट आणि गाजराचं ज्यूस नियमित आहारात असल्यास वाढत्या वयात मोतिबिंदू होण्याचा धोका कमी होतो.

6. या ज्यूसमधून शरीराला पुरेसं लोह मिळतं. रक्तातील लाल पेशी वाढतात. या ज्यूसमुळे अँनेमियाचा आजार बरा होतो. तसेच मासिक पाळीत होणारे त्रास , रजोनिवृत्तीदरम्यान जाणवणारी लक्षणं हा ज्यूस नियमित पिल्यास कमी होतो.

7. गाजर बीटाच्या ज्यूसमधील नायट्रेटच्या अस्तित्त्वामुळे रक्तादब नियंत्रित राहातो. उच्च रक्तदाबाची समस्या कमी होण्यास मदत होते.

8. गाजर बीटाच्या ज्यूसमधे ताजी पुदिन्याची पानं, एक इंच आल्याचा तुकडा घातल्यास त्याचा उपयोग शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यावरही होतो. मूड सुधारण्यास उत्साह वाटण्यास या ज्यूसची मदत होते.

9. हे ज्यूस पिल्यानं चयापचय आणि पचन व्यवस्था नीट काम करु शकतात, अन्नाचं पचन व्यवस्थित होतं, तसेच शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात, या सर्व गोष्टींचा फायदा वजन कमी होण्यावर आणि वजन नियंत्रित ठेवण्यावर होतं.

10. गाजर बीटाच्य ज्यूसमधून शरीरात जीवनसत्त्व, खनिजं आणि अँण्टिऑक्सिडण्टस जातात. या घटकांचा थेट फायदा त्वचेला मिळतो. हा ज्यूस रोज पिल्यानं चेहर्‍यावरचं तेज वाढतं. केस मजबूत होतात.

11. या ज्यूसमधे अँण्टिएजिंग घटक असल्यानं चेहर्‍यावरच्या सुरकुत्या, मुरुम पुटकुळ्या या समस्या दूर होतात आणि त्यांचा धोकाही टळतो. बीट आणि गाजर एकत्र करुन त्याचं ज्यूस पिल्यानं त्वचेला हानी पोहोचवणार्‍या मूक्त पेशींचा प्रभाव कमी होतो. या ज्यूसमधील अ जीवनसत्त्व, कॅरोटेनॉइडस आणि अँण्टिऑक्सिडण्टसमुळे चेहर्‍याच्या त्वचेखालील रक्तप्रवाह सुधारतो. त्वचा घट्ट होते.

12. गाजर बिटाच्या ज्यूसमधून क जीवनसत्त्व आणि लोह मिळत असल्यानं त्वचेचा पोत सुधारतो. चेहर्‍यावर वांगाचे डाग येत नाहीत. त्वचा मऊ आणि मुलायम राहाते.

13. हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. पण गाजर बीटाचं ज्यूस पिल्यानं त्वचा नैसर्गिकरित्या ओलसर राहाते. त्वचा मऊ होऊन त्वचेवर तेज येतं. तसेच चेहर्‍यावरील मृत त्वचा आणि मृत पेशी निघून जातात. त्वचा तरुण दिसण्यासाठी या ज्यूसचा खूपच उपयोग होतो.

14. या ज्यूसमुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडल्याने चेहर्‍यावर मुरुम पुटकुळ्या येत नाही. असल्यास या समस्या हे ज्यूस नियमित पिल्याने दूर होतात.

Image: Google

कसं करावं गाजर बीटाचं ज्यूस?

गाजर बीटाचं ज्यूस करण्यासाठी 4 गाजर, 1 बीट, थोडी कोथिंबीर, 1 आवळा, 1 टमाटा, एक इंच आल्याचा तुकडा, थोडं काळं मीठ, आवडत असल्यास थोडी पिठी साखर, सात आठ पुदिन्याची ताजी पानं एवढी सामग्री लागते.

गाजर बीटाचं ज्यूस करताना आधी गाजर, बीट, आवळा, टमाटा, आलं, कोथिंबीर बारीक चिरुन घ्यावेत. हे सर्व मिक्सरमधून किंवा ज्यूसरमधून बारीक करुन घ्यावेत. मिक्सरमधून बारीक केल्यास मिश्रण स्वच्छ सुती कपड्यानं किंवा गाळणीनं गाळून घ्यावं. गाळलेल्या रसात काळं मीठ, आवडत असल्यास पिठी साखर घालावी. हा ज्यूस केल्याबरोबर लगेच प्यावा.

टॅग्स :आहार योजनाहेल्थ टिप्स