Join us  

महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी केलेला दहीभात तुम्हालाही आवडतो? पण कधी, कसा आणि का खावा दहीभात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 12:53 PM

महालक्ष्मी विसर्जनासाठी घरोघरी बनविण्यात येणारा दहीभात म्हणजे वेटलॉससाठी उत्तम आहार आहे. पण दहीभात कधी आणि कसा खावा, याचीही योग्य माहिती हवी.

ठळक मुद्देदहीभात जर योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने खाल्ल्या गेला, तरच त्याचे लाभ शरीराला मिळू शकतात. 

दहीभात हा अनेक जणांचा आवडीचा पदार्थ. करायला देखील अतिशय सोपा. महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतात अनेक सणावारांना देवाला दहीभाताचा नैवेद्य हमखास दाखविला जातो. महाराष्ट्रात तर गौरी- गणपतींना देखील खीर- कानोला केला जातो आणि सोबत दही- भात असतो. जेवण झाल्यावर सगळ्यात शेवटी दहीभात खाऊन जेवण संपविण्याची प्रथाही महाराष्ट्रात अनेक घरांमध्ये दिसून येते. दहीभात खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पण दहीभात जर योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने खाल्ल्या गेला तरच त्याचे लाभ शरीराला मिळू शकतात. 

 

दहीभात खाण्याचे फायदे१. अपचनाचा त्रास कमी होतोपोट बिघडलं असेल, अतिजेवण झाल्यामुळे पोट गुबारल्यासारखे वाटत असेल किंव मग जुलाब होत असतील, तर दहीभात खावा. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि अपचनाचा त्रास कमी हाेतो.

२. उत्तम वेटलॉस डाएटज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांनी दुपारच्या जेवणात नियमितपणे दहीभात खावा. दही भात थोडा जरी खाल्ला तरी पोट भरल्यासारखे वाटते आणि बराच वेळपर्यंत भूक लागत नाही. याशिवाय दही- भात खाल्ल्याने खूप कमी कॅलरीज पोटात जातात आणि पुरेशी उर्जा देखील मिळते. त्यामुळे दिवसातून एकदा दही- भात खाल्ला, तर वजन नियंत्रित ठेवण्यास निश्चितच मदत होते. दह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीन्स असतात. 

३. रोगप्रतिकारशक्ती वाढते रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आजारी व्यक्तीला दही भात खाण्याचा सल्ला दिला जातो. दह्यामध्ये खूप जास्त ॲण्टी ऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्यापासून आपले संरक्षण होते.  

 

दहीभात कधी खावा आणि कधी टाळावा?- दहीभात खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पण दहीभात कधीही रात्रीच्या वेळी खाऊ नये. दहीभात रात्री खाल्ला तर कफ वाढतो. अनेक जणांना रात्री दहीभात खाल्ल्याने सर्दी आणि अपचनाचा त्रासही होतो. तसेच सांधेदुखीचा त्रासही वाढू शकतो. - दही भात खाण्याची योग्य वेळ ही सकाळचा नाश्ता किंवा दुपारचे जेवण ही आहे. संध्याकाळनंतर दहीभात किंवा नुसते दही खाणेदेखील टाळायला हवे.- फ्रिजमधून काढलेले थंडगार दही कधीही भातावर घेऊ नये. सामान्य तापामानातले दही टाकून दहीभात खावा.- शिळा भात असेल तर तो दह्यासोबत कधीही खाऊ नये. 

 

कसा बनवायचा दहीभात?- मऊ आणि काेमट भातात दही आणि चवीपुरते मीठ टाकून दहीभात खायचा, ही दहीभात खाण्याची पद्धत अगदी झटपट होणारी आणि सोपी आहे. त्यामुळे या पद्धतीनेही तुम्ही दहीभात खाऊ शकता. - दही भात बनविण्याच्या दुसऱ्या पद्धतीनुसार एका भांड्यात दही आणि भात एकत्र करून घ्या. छोटी कढई तापायला ठेवा. त्यामध्ये तूप टाका. तूप गरम झाले की त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता, कापलेल्या मिरच्या, अर्धा टेबलस्पून उडदाची डाळ आणि चुटकीभर हिंग टाकून फोडणी करून घ्यावी.

 

ही फोडणी आता कालवलेल्या दहीभातामध्ये टाकावी. चवीनुसार मीठ टाकावे आणि मिश्रण चांगले हलवून घ्यावे. त्यावर सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना घालावा. अशा पद्धतीने केलेला दहीभात अतिशय चवदार लागतो. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सअन्न