Join us  

बेलाचे सरबत प्यायल्याने कमी होतो उन्हाळी लागण्याचा धोका, 8 फायदे-सरबतही सुरेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2022 4:05 PM

बेलाच्या सरबतानं टळतो ऊन लागण्याचा धोका.. उन्हाळ्यात थंडावा देणारं बेल सरबत पिण्याचे 8 फायदे

ठळक मुद्देबेलाच्या सरबतानं शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होत नाही. बेलाचं सरबत प्याल्यानं वजन झपाट्यानं कमी होतं. चहा काॅफी पिल्यानंतर लगेच बेलाचं सरबत पिऊ नये.

कडक उन्हाळ्यात उन्हाळी लागण्याचा धोका असतो. बेलाचं सरबत प्याल्यास हा धोका कमी होतो. बेलाचं सरबत हा उन्हाळी लागण्यावरचा रामबाण इलाज समजला जातो. बेलाचं सरबत हा चविष्ट आणि औषधी सरबतांमधला प्रकार असून हे सरबत उन्हाळ्यात अवश्य पिण्याचा सल्ला दिला जातो. 

Image: Google

बेलाचं सरबत का प्यावं?

1. उन्हाळ्यात बेलाचं सरबत नियमित प्याल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. बेलाच्या सरबतामधून शरीरास प्रथिनं, बीटा केरोटीन, थायमीन, राइबोफ्लेविन आणि क जीवनसत्व हे पोषक घटक मिळतात. 

2. बेलाच्या सरबतातील गुणधर्मांमुळे रक्त शुध्द होतं. रक्त शुध्द करणारा नैसर्गिक उपाय म्हणून बेलाचं सरबत प्यालं जातं .

3.  बेलाच्या सरबतानं उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेराॅलची पातळी नियंत्रणात राहाते. त्यामुळे बेलाचं सरबत हदय सुदृढ राहाण्यासाठी फायदेशीर असतं. बेलाचं सरबत हदयासाठी आणखी फायदेशीर होण्यासाठी बेलाच्या सरबतात थोडं साजूक तूप घालून पिण्याचा सल्ला दिला जातो. 

4. महिलांच्या आरोग्यासाठी बेलाचं सरबत जास्त गुणकारी मानलं जातं. बेलाच्या सरबतानं कर्करोगाचा धोका कमी होतो. स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी बेलाचं सरबत दूध वाढण्यासाठी म्हणून फायदेशीर असतं. 

Image: Google

5.वजन कमी करण्यासाठी बेलाचं सरबत पिणं हा उत्तम उपाय आहे. बेलाच्या सरबतात फायबरचं प्रमाण जास्त असतं. बेलाचं सरबत प्याल्यानं पोट भरपूर वेळ भरलेलं राहातं. त्यामुळे वजन लवकर कमी होण्यास मदत होते. 

6. उन्हाळ्यात नियमित बेल सरबत प्याल्यानं शरीरातील पाणी कमी होत नाही. डिहायड्रेशनचा, उन्हाळी लागण्याचा धोका टळतो.

7. बेलामध्ये लॅक्सेटिव्ह हा घटक रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतो. म्हणूनच बेलाचं सरबत प्याल्यानं मधुमेहाचा धोका टळतो.

8. बेलाच्या सरबतानं बुरशी आणि विषाणू संसर्ग नियंत्रणात येतो.

Image: Google 

बेलाचं सरबत कसं करावं?

बेलाचं सरबत करण्यासाठी 2 बेलफळं, 4 कप पाणी, 5 छोटे चमचे साखर, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि 1 चमचा सैंधव मीठ घ्यावं. बेलाचं सरबत करताना बेलफळ धुवन घ्यावं. ते चिरुन त्यातला गर काढावा. एका मोठ्या भांड्यात बेलफळाचा गर घ्यावा. गरामध्ये थंडगार पाणी घालावं. एक तास गर पाण्यात राहू द्यावा. तासाभरानं गर हातानं चोळून घ्यावा. मिश्रण ब्लेण्डरनं फिरवून घ्यावं. हे मिश्रण गाळून घ्यावं. गाळलेलं पाणी साखर, सैंधव मीठ, जिऱ्याची पूड घालून चांगलं हलवून घ्यावं. सरबत थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवावं. थंड झालं की प्यावं.

बेलाचं सरबत कधी प्यावं

उन्हाळ्यात बेलाचं सरबत सकाळी रिकाम्या पोटी किंवा दुपारी प्यावं. चहा काॅफी पिल्यानंतर लगेच बेलाचं सरबत पिऊ नये. यामुळे फायद्याच्या ऐवजी तोटा होण्याचाच धोका असतो. 

 

टॅग्स :आहार योजनाअन्नपाककृती