Join us  

भाज्यांचे-फळांचे ज्यूस, स्मुदी डाएट म्हणून रोज पिताय? - पचनाचे गंभीर आजार छळतील..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 3:33 PM

भाज्या, फळं, तृणरस असं सगळं सरसकट पिणं म्हणजेच डाएट असं अनेकांना वाटतं, मात्र ते आपल्याला पचतंय की नाही हे कोण कसं ठरवणार?

ठळक मुद्देकोणतेही आहारीय द्रव्य योग्य प्रमाणात,योग्यवेळी आणि योग्य त्या पदार्थांसोबतच खावे.

वैद्य राजश्री कुलकर्णी ( एम.डी.  आयुर्वेद)

नो चाय-कॉफी, ओन्ली ज्यूस, असं आता अनेकजण म्हणतात. तसं डाएटही करतात.  तरुण किंवा मध्यवयीन महिलांच्या ( आणि पुरुषांच्याही) डोक्यात बसलेला आहे तो म्हणजे वजनाचा! आपण फार जाड आहोत किंवा आपलं वजन फार अफाट वाढलंय आणि ते कमी करणं अतिशय गरजेचं आहे असं शंभरपैकी निदान नव्वद व्यक्तींना वाटत असत .त्यासाठी मग आपोआपच अनेक प्रकारचे पर्याय शोधले जातात . कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींना झिरो फिगरची क्रेझ आहे,मुलांना सिक्स पॅक्स हवे आहेत,मोठ्या माणसांना आजारांपासून दूर राहायचे आहे ,अशा विविध कारणांसाठी लोक सतत काहीतरी उपाय शोधात असतात . यासाठी असंख्य प्रकारचे डाएट अवलंबिले जातात. ज्याला जे क्लिक होईल ,तो ते करत राहतो. डाएटबद्दल इतकी पुस्तकं, इंटरनेटवर इतका माहितीचा पूर आहे की विचारायची सोय नाही. शिवाय न मागता सल्ले देणारे अवतीभोवती असतातच. ते जे करतात ते डाएट आपल्याला चालेल की नाही याचा काहीही विचार न करता ,पर्वा न करता ,केवळ अंधानुकरण करून आपल्यापैकी ८० टक्के लोकं ते डाएट सुरु करतात.  दिवसातून एकदाच जेवणे,दिवसातून सहा वेळा थोडे थोडे खाणे इथपासून तर केवळ फलाहार,रसाहार असे अनेक प्रकार मंडळी करत असतात. रसाहार किंवा केवळ फळांचा ज्यूस पिणं हे फॅड मागच्या काही वर्षांत आपल्याकडे जास्त आलं आहे.

पण ते फॅड जुनंच आहे तसं.  साधारण १९३० पासून अमेरिकेत हळूहळू पसरत होतं. तिथेही मागच्या काही दशकात ते अमाप पसरलं कारण चुकीच्या आहारपद्धतीमुळे तिथे कमी वयात स्थूलतेची समस्या भेडसावू लागली आणि त्यासाठी उपाय शोधले जाऊ लागले. घन आहार घेतल्याने वजन अधिक वाढते आणि तेच रस स्वरुपात घेतलं तर अधिक हेल्दी आहे असा समज दृढ झाल्याने हे रसाहाराचं लोण चांगलंच पसरलं. मग हे रस मिळवण्यासाठी भाज्या,फळे यांचा वापर होऊ लागला .चव वाढवण्यासाठी साखर,दही ,मध,ड्राय फ्रूट्स,चोकलेट इ. गोष्टींचा वापर वाढला.हेल्दी म्हणून प्रोटीन पावडर,कृत्रिम स्वीटनर्स मिसळली जाऊ लागली. पिताना गार वाटावं म्हणून बर्फाचा चुरा ,आईस्क्रीम हेही आले आणि हळूहळू फळांचे रस हे केवळ एकेकटे किंवा मिश्र फळांचे न राहता त्यात अशा अनेक गोष्टी मिसळल्या जाऊ लागल्या.त्यातही मध्यंतरी ग्रीन ज्यूस नावाचा रस फारच लोकप्रिय झाला .यात साधारण ५० % हिरव्या पालेभाज्यांचा वापर केला जातो. पण बऱ्याच भाज्यांची मूळ चव ही कडसर,तुरट असल्यामुळे मग त्यात फळांचा समावेश झाला. मग ज्यूसला गोडसर चव येईल,छान सॉफ्ट होईल आणि शिवाय पोटभरीचा होईल म्हणून आंबा,केळ,अननस किंवा परदेशी पद्धतीनुसार अनेक प्रकारच्या बेरीज ,जसं की स्ट्रॉबेरी,ब्लू बेरी,रास्पबेरी अशी फळे त्यात टाकली जातात. कधी बदल म्हणून काजू,बदाम वगैरे सुका मेवा घातला जातो आणि मग शक्यतो उपाशीपोटी घन आहार किंवा नाश्ता न करता केवळ ग्लास/ दोन ग्लास जशी गरज वाटेल त्यानुसार हा रस किंवा स्मूदी प्यायची अशी बरेच जणांची सध्या आहारपद्धती आहे.

बरेचजण मग दोनवेळा जेवण आणि सकाळी हा ज्यूस असा आहार घेणं पसंत करतात. बरेचदा घरात असतील त्या भाज्या , फळ यांचा वापर केला जातो. अनेकजण सकाळी जॉगिंग ट्रॅकवर फिरायला ,व्यायामाला जातात, तिथे बरेच जण अनेक प्रकारचे ज्यूस बनवून विकायचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे अगदी गव्हाचा तृणरोपरस पासून तर कारले,भोपळा,अगदी कडूनिंब ,शतावरी,जांभूळ इ .अनेक भाज्या,फळे यांचे स्वतंत्र आणि मिश्र रस उपलब्ध असतात .बरेच जण अगदी नियमितपणे व्यायाम झाल्यावर हौशीने या मंडळींकडून हे रस घेऊन पीत असतात. कोणताही रस पिणं म्हणजे चांगलं या भाबड्या भावनेनं ते तो पीत असतात बरेचदा ! पण यापैकी कडूनिंब,शतावरी यासारख्या वनस्पती या औषधी गुणधर्म असणाऱ्या आहेत ,त्याचे शरीरावर होणारे परिणाम हे व्यक्तिपरत्वे विभिन्न असू शकतात आणि त्याचा कोणाला त्रास देखील होऊ शकतो हे आपल्याला माहितच नसते.आपण जी धान्ये,भाज्या ,फळे खातो त्याच्या अनेक विभिन्न जाती ,प्रजाती असतात आणि त्यानुसार वेगवेगळे गुणधर्मही असतात. योग्य प्रमाणात,योग्यवेळी त्या त्या गोष्टी खाल्ल्या तर त्या आरोग्यादायीही असतात पण क्वचित कधीतरी यापैकी एखादी आपल्या मानवी पचनसंस्थेला न चालणारी गोष्ट आपल्या आहारात येते आणि त्याचे गंभीर दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होतात.मग बातमी येते मधूनच की अमूक ज्यूस प्याल्यानं त्रास झाला, त्यात अमूक कुणी दगावले. यात दोन गोष्टी महत्वाच्या आहेत.पहिली म्हणजे ,आपण जे काही मिश्रण बनवतो आहोत ,त्यातील घटक स्वतंत्रपणे अतिशय हेल्दी असतीलही ,पण त्यांचा संयोग तसाच राहील का ? याचा विचार व्हायला हवा. त्यांच्या एकमेकांशी असणाऱ्या प्रमाणावरही हे गुणधर्म अवलंबून आहेत.दुसरं म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे ,जेव्हा शेतात या भाज्या लावल्या जातात तेव्हा क्वचित एखादं बियाणं आपल्याला न चालणारं, पचणारं, विषारी असू शकतं. बाह्यरूपात काहीही फरक कदाचित दिसूनही येणार नाही पण चवीत,गुणात मात्र नक्कीच फरक असतो. काकडी,दोडका ,दुधी भोपळा या भाज्यांच्या बाबतीत आपल्याला बरेचदा हा अनुभव येतो. त्यामुळेच खरंतर चिरताना निदान या भाज्या तरी चव घेऊन मग पुढे चिरायची आपल्याकडे पद्धत आहे. शेवटी आपण जे पदार्थ खातो,पितो त्यांचं पचन होऊ लागलं की ते सगळं रक्तात प्रवेशित होतं आणि मग पुढे पोषणाचा विषय येतो. जसं हितकारक द्रव्यांचं आहे तसंच विषारी गोष्टींचं देखील आहे. तेही रक्तात प्रवेशित होऊन आपले परिणाम दाखवू लागतात.आपण प्रत्येक जण एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. आपलं वय,वजन, लिंग ,कामाचं स्वरूप जसं भिन्न आहे,तसं आपली शरीराची जडणघडण म्हणजेच प्रकृतीही वेगळी आहे.त्यानुसार आपल्या शरीराची गरजही विभिन्न असते. आपला शेजारी ,ओळखीचा किंवा अगदी नातेवाईक ,इतकंच काय अगदी बहिण भाऊ जरी असेल तरी जे एकाला चालेल,मानवेल ते आपल्याला चालेलच असं नाही .

जॉगिंग ट्रॅकजवळ ज्यूस विकणाऱ्या लोकांचा तो व्यवसाय आहे,ते त्यातील तज्ज्ञ व्यक्ती नव्हेत ,त्यामुळे केवळ वैविध्य आणण्यासाठी त्यांनी वेगवेगळी मिश्रणं बनवली आणि त्याचं गुणगान केलं तरी ते आपल्याला चालणार की नाही याचा विचार आपण करायला हवा. अन्यथा दुष्परिणाम होऊ शकतात.त्यातूनही असे काही रस किंवा रसाहार नेहमीसाठी सुरु करायचा असेल तर तज्ज्ञ व्यक्तीचा वैद्यकीय सल्ला घेऊन आपली प्रकृती,वय,वजन यानुसार काय चालेल अथवा नाही ,कोणत्या भाज्या,फळे खाणे हितकर आहे ,काय टाळायला हवे हे जाणून,समजून मगच ती गोष्ट सुरु करावी ,जेणेकरून आरोग्याला धोका कमी होतो.शक्यतो एकाच भाजीचा किंवा फळाचा रस करावा, घरात जे मिळेल ते एकत्र करण्याचा प्रयत्न करू नये कारण त्यांचे एकत्र मिळून काय नवीन गुणधर्म तयार होतील याविषयी आपण अनभिज्ञ असतो.सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे केवळ मजा म्हणून, फॅड म्हणून स्वतःच्या आरोग्याला इजा होईल,धोका पोचेल असं काहीही करू नये.कोणतेही आहारीय द्रव्य योग्य प्रमाणात,योग्यवेळी आणि योग्य त्या पदार्थांसोबतच खावे.वाया जाईल म्हणून किंवा घाई आहे म्हणून नेहमीपेक्षा वेगळ्या चवीचं काही जाणवलं तर लगेच फेकून द्यावे,त्याची परीक्षा घेणं महागात पडू शकतं.घरातील वृद्ध व्यक्ती किंवा सोळा वर्षाखाली मुलं यांना असले कोणतेही डायटचे प्रकार करायची परवानगी देऊ नये.शेवटी कोणताही आहार हा शरीराचं योग्य पोषण व्हावं, शक्ती  मिळावी म्हणून आपण घेत असतो ,त्यामुळे तो हितकारकच असेल याकडे आपण लक्ष पुरवलेच पाहिजे.

(लेखिका आयुर्वेद तज्ज्ञ आहेत.)www.ayushree.com

टॅग्स :फळेअन्नवेट लॉस टिप्स