Join us  

सकाळच्या नाश्त्याला कुणी चाट खातं का? हा शेंगदाण्याचा चाट खा, माॅर्निंग प्रोटीन डोस  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 8:22 PM

सकाळच्या वेळी खाता येणारा पौष्टिक आणि चटपटीत चाट म्हणजे शेंगदाणा चाट. महिलांच्या आरोग्यासाठी शेंगदाणा चाट अतिशय फायदेशीर असून तो आठवड्यातून किमान 3 वेळा सकाळी खायलाच हवा असं आहारतज्ज्ञ सांगतात. 

ठळक मुद्देमूठभर शेंगदाणा चाटमुळे ढीगभर पोषक घटक शरीरात जातात.  महिलांच्या आरोग्यासाठी  सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय पौष्टिक पदार्थ. शेंगादाणा पौष्टिक आहे. चटपटीत लागतो, झटपट बनवता येतो आणि पटपट संपतोही.

चाट म्हणजे संध्याकाळचं खाणं. बाहेर गाड्यावर मिळणारा चाट सगळ्यांनाच आवडतो. पण सकाळी नाश्त्याला चाट खा असं म्हटलं तर? एकतर नाश्त्याला सकाळी कोणी चाट खातं का? हा सामान्य ज्ञान तपासणारा प्रश्न उपस्थित होतो. आणि दुसरं म्हणजे घरचा चाटला कुठे गाड्यावरच्या चाटची मजा. हे दोन्ही प्रश्नांचं उत्तर म्हणजे सकाळच्या नाश्त्याला पौष्टिक आणि चटपटीत शेंगदाण्याचा चाट. शेंगदाण्याचा हा आरोग्यदायी चाट बाहेर गाड्यावर मिळणार नाही. हा चाट घरीच बनवून खायचा असतो. सकाळच्या नाश्त्याला शेंगदाणा चाट खाल्ला तर त्याचा फायदा होतो. 

Image: Google

दिल्लीतील फोर्टिस हाॅस्पिटल येथील आहारतज्ज्ञ सिमरन सैनी शेंगदाण्याच्या चाटचं महत्त्वं सांगतात. सिमरन म्हणतात, की एक वाटी किंवा मूठभर शेंगदाण्याचा चाट खाल्ला तरी आरोग्यास पोषक घटक मिळतात. शेंगदाण्याच्या चाटमधून पोटॅशियम, तांबं, कॅल्शियम, लोह आणि सेलेनियम हे महत्त्वाचे घटक  मिळतात. हे घटक कंबरेचं दुखणं, पाठीचं दुखणं, संधिवातामुळे होणाऱ्या वेदना कमी होण्यासाठी, या समस्या उद्भवूच नये यासाठी महत्त्वाचे असतात. सिमरन म्हणतात, की महिलांच्या आरोग्यासाठी शेंगदाणा चाट खूपच फायदेशीर असतात,  आठवड्यातून किमान तीन दिवस सकाळी नाश्त्याला हा चाट आवर्जून खाण्याचा सल्ला सिमरन देतात. हा चाट नुसता पौष्टिक असतो असं नाही तर तो चवीला इतर चाटच्या इतकाच चटपटीत लागतो. फक्त हा चाट तयार करताना लिंबाचा रस आणि टमाटा हे दोन घटक वापरायलाच हवेत. कारण केवळ शेंगदाण्यामुळे बध्दकोष्ठतेचा त्रास होतो. 

Image: Google

कसं करायचा शेंगदाण्याचा चाट?

शेंगदाण्याचा चटपटीत आणि पौष्टिक चाट करण्यासाठी 1 मोठी वाटी खरपूस भाजलेले शेंगदाणे , 1 बारीक चिरलेला कांदा,  1 बारीक चिरलेला टमाटा, 2 बारीक कापलेली हिरवी मिरची, 1 छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 छोटा चमचा काळं मीठ, 1 छोटा चमचा लाल तिखट,  1 छोटा चमचा चाट मसाला आणि  1 चमचा लिंबाचा रस घ्यावा. 

चाट तयार करताना आधी शेंगदाणे खरपूस भाजावेत. एका मोठ्या भांड्यात बारीक चिरलेला कांदा, टमाटा, हिरवी मिरची, कोथिंबीर हे सर्व नीट एकत्र करावं. नंतर यात भाजलेले शेंगदाणे घालावेत. शेंगदाणे नीट मिसळून घ्यावेत. नंतर यात काळं मीठ, लाल तिखट आणि चाट मसाला घालावा. भांड्यातलं जिन्नस चमच्यानं नीट एकत्र करावं.  शेवटी लिंबाचा रस घालून  हे चाट नीट हलवून घ्यावा.

Image: Google

हा चाट शेंगदाणे उकडूनही करता येतो. यासाठी 3 वाट्या शेंगदाणे घ्यावेत. ते निवडावेत. कुकरच्या भांड्यात 3 वाटी शेंगदाणे आणि 5 वाट्या पाणी घालावं. त्यात थोडी हळद आणि मीठ घालावं. कुकरला 5 शिट्या घेवून शेंगदाणे उकडावेत. कुकरची वाफ गेल्यावर शेंगदाणे रोळीत काढून त्यातील पाणी काढून घ्यावं. हे पाणी वाया जाऊ न  देता रश्याच्या भाजीला वापरावं. उकडलेले शेंगदाणे समजा 3 वाटी घेतल्यास 2 मोठे चमचे लिंबाचा रस घालावा. बाकी जिन्नस भाजलेल्या शेंगदाण्याचा चाट करताना वापरलं तितकंच वापरावं.

Image: Google

इतक्या सोप्या पध्दतीने तयार होणारा हा शेंगदाणे चाट घाई असेल तर डब्यात भरुन सोबत न्यावा. वेळ मिळाला की खाऊन टाकावा. चालता-बोलता, काम करता करता खाता येणारा हा पदार्थ आहे. यापेक्षा सोपं आणि पौष्टिक आणखी काय असू शकेल?  

टॅग्स :अन्नआहार योजनाआरोग्य