आजकाल प्रत्येकाच्या आयुष्यात टेन्शनची एक मोठी लिस्ट असते, काहींना नोकरीचं, काहींना लोन फेडण्याचं. काहींना नात्यातील वादाचं टेन्शन असतं. अशा परिस्थितीत, चीनमधील लोकांनी तणाव कमी करण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे. ज्याची आता चर्चा रंगली आहे. बाळाला शांत करण्यासाठी तोंडात चुपणी म्हणजे पॅसिफायर दिला जातो, तो आता मोठी माणसं देखील टेन्शन कमी करण्यासाठी वापरत आहेत.
चीनमध्ये हा ट्रेंड इतका प्रसिद्ध झाला आहे की, हजारो लोक ऑनलाईन वेबसाइटवरून आपल्यासाठी खास पॅसिफायर खरेदी करत आहेत. त्यांची किंमत देखील १० युआन ते ५०० युआन म्हणजेच १२० ते ६००० रुपयांपर्यंत आहे. पॅसिफायर विकणाऱ्यांनी दावा केला आहे की, यामुळे लोकांना चांगली झोप लागण्यास मदत होते, टेन्शन कमी होतं आणि मनाला शांती मिळते. काही लोक सोशल मीडियावर लिहितात याबद्दल प्रतिक्रिया देत आहेत.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जर ही सवय दीर्घकाळ चालू राहिली तर नुकसान निश्चितच होत आहे. हे खतरनाक असून आरोग्यासाठी घातक आहे. सिचुआन विद्यापीठाचे डॉ. तांग काओमिन यांनी स्थानिक माध्यमांना सांगितलं की, मोठ्या माणसांचं तोंड हे लहान मुलांपेक्षा पूर्णपणे वेगळं असतं. जर पॅसिफायर बराच काळ तोंडात ठेवला तर जबड्यात वेदना होतात आणि तोंड नीट उघडता न येणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
सोशल मीडियावर ही बाब वेगाने व्हायरल होताच लाखो लोकांनी ते पाहिलं आणि अनेकांनी त्याबद्दल आपला अनुभव शेअर केला आहे. काही लोक हे फायद्याचं असल्याचं म्हणत आहेत. तर काहींनी खिल्ली उडवली आहे. "हे मूर्खपणाचं कृत्य आहे, टेन्शन कमी करण्याचे अनेक मार्ग आहेत. अशा गोष्टींवर बंदी घातली पाहिजे ज्यामुळे टेन्शन निर्माण होतं" असं म्हणत आहेत.