महिलांचे कपडे असोत किंवा रोजच्या वापराचे सामान पुरूषांपेक्षा त्याची किंमत जास्त असते. (Women's items are more expensive than men's, women's monthly expenses increase due to paying pink tax)बाजारात महिलांसाठी जेवढी व्हरायटी आहे तेवढी पुरुषांसाठी नाही असे ही म्हटले जाते आणि ते खरे ही आहे. रोजच्या वापराचे सामान असो किंवा इतर काहीही महिलांसाठी भरपूर पर्याय असतात. महिला खरेदी करायला गेल्या की भरपूर खर्च करतात असे आपणही आई ताईला चिडवतोच. मात्र महिलांचा खर्च जास्त होतो यातील मज्जेचा भाग सोडला तर त्याला आणखी एक पैलू आहे.
महिलांचे सामान पुरुषांच्या सामानापेक्षा जास्त महाग असते. अगदी सारखे प्रॉडक्ट्स असले तरी ते खास महिलांसाठी असल्याच्या दाव्याखाली जास्त महाग खपवले जातात. (Women's items are more expensive than men's, women's monthly expenses increase due to paying pink tax)महिलांना सारख्याच वस्तूसाठी पुरुषांपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतात. या विषयी कधी विचार केला आहे का? केला नसेल तर आता करा नक्की काय भानगड आहे ते जाणून घ्या. कारण प्रत्येक महिला हे जास्तीचे पैसे देत असते आणि देत राहील.
पिंक टॅक्स हा प्रकार कधी ऐकला आहे का? समाजात राहणारा प्रत्येक व्यक्ती टॅक्स भरत असतोच. मात्र त्याचा हिशोब ठेवता येतो त्या टॅक्सचे नियम असतात. मात्र एक टॅक्स असा आहे जो फक्त महिला भरतात आणि ते ही अप्रत्येक्षपणे. त्या टॅक्सला पिंक टॅक्स असे संबोधले जाते. विविध कंपन्या महिलांसाठी खास डिझाइन केलेल्या किंवा विक्रीसाठी ठेवलेल्या उत्पादनांवर किंवा सेवांवर पुरुषांच्या तुलनेत अधिक किंमत आकारतात. स्त्रियांना त्यांच्या रोजच्या गरजांच्या वस्तूंवर अधिक पैसे मोजावे लागतात.
गुणवत्ता व डिझाइन सारखे असलेले कपडे महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्या किंमतीत विकले जातात. फक्त वस्तूच नाही तर साधे केस कापायला गेल्यावरही महिलांना दुप्पट तिप्पट पैसे द्यावे लागतात. लहान मुलींसाठी मिळणाऱ्या खेळण्यांची किंमतही मुलांच्या खेळण्यांपेक्षा वेगळी असते. फक्त गुलाबी रंग दिला की ती वस्तू महिलांसाठी खास या टॅगखाली विकली जाते. गुलाबी रंगावर या टॅक्सचा खेळ चालतो, म्हणून त्याला पिंक टॅक्स असे म्हटले जाते. हा टॅक्स देणे महिलांना चुकवता येणे तसे कठीणच आहे. मात्र त्याची माहिती प्रत्येकीला असायला हवी.