Join us

Women’ Day 2022 : अजय देवगणच्या महिला दिन शुभेच्छांवर नेटिझन्स फिदा, अजय म्हणतो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 15:39 IST

Women’ Day 2022 : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या आयुष्यातील महिलांना शुभेच्छा देताना अजयने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे.

ठळक मुद्देही पोस्ट अवघ्या एका दिवसात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून आतापर्यंत जवळपास ३.५ लाख लोकांनी ती लाईक केली आहे. त्यामुळे अजयच्या आयुष्यातील महिलांप्रती त्याला असणारा आदर या पोस्टमधून दिसून येतो. 

प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण याची बॉलिवूडमधील कारकिर्द आपल्याला माहितच आहे. पण उत्तम अभिनेता असताना अजय एक उत्तम मुलगा, भाऊ नवरा आणि बाप आहे हेही आपण अनेकदा पाहतो. प्रसिद्ध अभिनेत्री काजोल हिच्याशी लग्न केल्यानंतर या दोघांच्या नात्याचे अनेक पदर आपल्यासमोर आले आहेत. पण आपल्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांच्या प्रती आदरभाव असणं आणि त्यांच्यामुळे आज आपण इथवर आलो आहोत हे मान्य करणे वाटते तितके सोपे नाही. पण अजय देवगणने हे करुन दाखवले आहे. जागतिक महिला दिनाच्या (International Women’ Day 2022) निमित्ताने आपल्या आयुष्यातील महिलांना शुभेच्छा देताना अजयने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडिओमुळे सोशल मीडियात त्याची जोरदार चर्चा सुरु असून महिलावर्ग त्याच्यावर खूश झाला आहे. 

जागतिक महिला दिन म्हणजे आपल्या आयुष्यातील महिलांप्रती कृतज्ञता व्यक्त कऱण्याचा दिवस. त्यांच्या असण्यामुळे आपलं आयुष्य सुकर आहे याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्याची ही अनोखी संधी. हीच संधी लक्षात घेऊन अजय देवगणने आपल्या आयुष्यातील महिलांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. अजयने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याविषयीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये सुरुवातीला अजय देवगण असे नाव येते. पण नंतर त्या नावावर रेघ मारली जाते आणि खाली वीणाचा मुलगा, कविता आणि निलमचा भाऊ, काजोलचा नवरा आणि न्यासाचे वडिल असा मेसेज येतो. म्हणजेच या सगळ्या महिलांशिवाय मी अपूर्ण आहे असं अजय सांगतो. यांच्यासोबत असलेला मी हिच माझी ओळख आहे असंच एकाअर्थी त्याला म्हणायचं असल्याचं दिसतं. 

आपल्या पोस्टला कॅप्शन देताना तो म्हणतो, “थँक यू फॉर शेपिंग मी इन मोस्ट वंडरफूल वे.” अजयने आपल्या आयुष्यातील महिलांना अशाप्रकारे दिलेल्या शुभेच्छांनी नेटीझन्स त्याच्यावर विशेष खुश झाले आहेत. त्याची ही पोस्ट अवघ्या एका दिवसात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून आतापर्यंत जवळपास ३.५ लाख लोकांनी ती लाईक केली आहे. अनेकांनी त्याच्या या शुभेच्छा देण्याच्या पद्धतीचे कौतुक केले आहे. तर कित्येकांनी त्याला जेंटलमन असल्याचे म्हटत महिला दिनाच्या शुभेच्छा देण्याची ही सर्वात छान पद्धत असल्याचे म्हटले आहे. खिलाडी अक्षय कुमारने त्याच्या या मेसेजवर हार्ट पाठवत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यामुळे अजयच्या आयुष्यातील महिलांप्रती त्याला असणारा आदर या पोस्टमधून दिसून येतो.  

टॅग्स :सोशल व्हायरलजागतिक महिला दिनअजय देवगणकाजोल