चीनमधील (China) सुझोऊ मेट्रो ट्रेनमध्ये (Suzhou Metro) नुकताच घडलेला एक प्रसंग सध्या जागतिक स्तरावर कौतुक आणि चर्चाचा विषय ठरला आहे. हा प्रसंग म्हणजे वैयक्तिक जबाबदारी आणि सार्वजनिक मालमत्तेबद्दलचा आदर जपणारं एक मूर्तिमंत उदाहरण बनला आहे. या घटनेत एका महिलेच्या हातून चुकून ‘बबल टी’ जमिनीवर सांडला आणि ट्रेनच्या डब्यात पूर्ण पसरला.
तिच्याकडे टिश्यू पेपर संपले होते पण या महिलेने क्षणाचाही विलंब न लावता एक अत्यंत प्रेरणादायी पाऊल उचललं. तिने कोणतीही वैयक्तिक गैरसोय न पाहता आपला स्वत:चा स्कार्फ काढला आणि तो संपूर्ण सांडलेला चहा व्यवस्थित पुसून काढला.
तिच्या या कृतीचं व्हिडिओ फुटेज त्वरित सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि नेटकऱ्यांनी (Netizens) तिचं तोंड भरून कौतुक केलं. ही कृती म्हणजे सार्वजनिक मालमत्तेचा आदर करण्याची आणि सार्वजनिक जागेलाही स्वतःच्या घरासारखं महत्त्व देण्याच्या मानसिकतेचं एक उत्तम उदाहरण आहे, असं सांगत अनेकांनी या महिलेचं अभिनंदन केलं. केवळ काही सेकंदांतच हा क्षण जगभरात वैयक्तिक जबाबदारीचं प्रतीक म्हणून पाहिला जाऊ लागला.
हा प्रकार इतका हृदयस्पर्शी आणि अनुकरणीय होता की, सुझोऊ मेट्रो कंपनीने याची दखल घेतली. महिलेचा हा आदर्शवत व्यवहार पाहून मेट्रो प्रशासनाने तिला शोधून काढलं आणि तिच्या या उदात्त वागणुकीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिला नवा स्कार्फ आणि काही भेटवस्तू देऊन सन्मानित केलं.
एका साध्या घटनेतून, या महिलेने संपूर्ण जगाला एक मोठा आणि महत्त्वाचा संदेश दिला आहे. तो म्हणजे, सार्वजनिक जागांची काळजी घेणे आणि आपल्या कृतीची जबाबदारी घेणे, हे कोणत्याही मोठ्या उपदेशापेक्षा अधिक प्रभावी असू शकते.
