कुत्रा हा माणसाचा सर्वात विश्वासू मित्र आहे असं म्हटलं जातं, म्हणूनच माणसं कुत्रा पाळतात. अनेकांकडे पाळीव प्राणी असतात. पण हल्ली लोकांना मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं असल्याचं चित्र दिसतं. मुलांपेक्षा पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवणं अधिक आनंददायी वाटतं. त्यांच्यावर जास्त प्रेम असतं. कुत्रा, मांजर हे जास्त जवळचे वाटतात. हाच नवा ट्रेंड पाहायला मिळत आहे. सध्या भारतात पेट पॅरेंटिग हे वेगाने वाढत आहे.
पेट पॅरेंटिंग म्हणजे काय?
जर तुम्ही तुमच्या घरात कुत्रा, मांजर, ससा, गाय इत्यादी पाळीव प्राणी आणि तुम्ही त्यांची घरातील सदस्यांप्रमाणे काळजी घेत असाल तर त्याला पेट पॅरेंटिंग म्हणतात. यामध्ये, तुम्ही मालकाऐवजी पालकाची भूमिका बजावता. प्राण्यांना अन्न आणि पाणी पुरवण्यापासून ते त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यापर्यंत, त्यांचा वाढदिवस साजरा करण्यापर्यंत, कपडे, खेळणी आणि त्यांच्यासाठी खास अन्न खरेदी करण्यापर्यंत सर्व काही लहान मुलांसारखं करता.
देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
भारतात पेट पॅरेंटिंग वाढण्याची अनेक कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे मुलांचं संगोपन करण्यासाठी शाळा, महाविद्यालय, वैद्यकीय सेवा आणि इतर खर्च यासारखे मोठे खर्च येतात. म्हणूनच, काही लोकांचा असा विश्वास आहे की, प्राण्यांचं संगोपन आणि देखभालीचा खर्च मुलांच्या संगोपनाच्या खर्चापेक्षा खूपच कमी आहे. दुसरे कारण म्हणजे एकटेपणा आणि इमोशनल सपोर्टचा अभाव. आजकाल, शहरांमधील खूप लोक एकटे राहतात, त्यांची काळजी घेणारं कोणीही नाही.
मुलं त्यांना एकटं सोडत आहेत आणि कामात व्यस्त आहेत. म्हणूनच लोक ही पोकळी भरून काढण्यासाठी प्राण्यांकडे वळतात. तर दुसरीकडे नवीन पिढीला त्यांच्या आयुष्यात कमी ओझं हवं आहे, त्यांना त्यांच्या स्वतःच्या इच्छेनुसार जीवन जगायचं आहे. मुले असणं ही त्यांच्यासाठी गरज नाही, परंतु आनंद आणि मानसिक शांती, समाधान अधिक महत्त्वाचं आहे, म्हणून ते प्राण्यांना निवडतात. मार्स पेटकेअरच्या अहवालानुसार, भारतातील नवीन पाळीव प्राण्यांच्या मालकांपैकी अंदाजे ७० टक्के हे पहिल्यांदाच पाळीव प्राणी पाळत आहेत आणि प्राण्यांना कुटुंब म्हणून पाहण्याचा ट्रेंड वाढत आहे.