Join us

पेनाच्या शाईमुळे पांढरा शर्ट खराब झालाय? 'या' ५ गोष्टी मुळापासून घालवतील डाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 19:17 IST

कपड्यांवर शाईचा डाग लागल्याचं लक्षात आल्यावर तो जास्त पसरणार नाही ना याची काळजी घ्या.

पांढरा शर्ट हा ऑफिस आणि शाळेच्या युनिफॉर्मचा एक महत्त्वाचा भाग आहे. अशा परिस्थितीत, त्यावर शाईचे डाग येणं ही एक सामान्य समस्या आहे. पेनाची शाई असो किंवा प्रिंटरची शाई, हे डाग बऱ्याचदा धुतल्यानंतरही जात नाहीत. पण काळजी करण्यासारखं काही नाही. कारण आता काही सोप्या घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही हे डाग सहज काढू शकता.

कपड्यांवर शाईचा डाग लागल्याचं लक्षात आल्यावर तो जास्त पसरणार नाही ना याची काळजी घ्या. डाग पसरू नये म्हणून, सर्वप्रथम स्वच्छ, कोरड्या कापडाने शाई थोडी पुसून टाका. शाईचा डाग घासण्याची चूक करू नका. यामुळे डाग आणखी गडद होऊ शकतो.

दूध

पांढऱ्या कपड्यांसाठी हा एक प्रभावी उपाय आहे. डाग पडलेला शर्टाचा भाग रात्रभर दुधात भिजत ठेवा. सकाळी धुण्यापूर्वी शर्ट दूधातून बाहेर काढा, थोडं डिटर्जंट लावा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.

मीठ आणि लिंबू

शर्टवर थोडं मीठ टाका आणि नंतर त्यावर लिंबाचा रस पिळा. १५ मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. ही पद्धत कॉटनच्या कपड्यांसाठी चांगली आहे.

बेकिंग सोडा आणि व्हिनेगर

पेस्ट बनवण्यासाठी बेकिंग सोड्यात थोडं व्हिनेगर मिसळा. ही पेस्ट डागावर लावा आणि १० मिनिटांनी टूथब्रशने हलक्या हाताने घासून घ्या. नंतर थंड पाण्याने धुवा. ही पद्धत कॉटन आणि लिननच्या कपड्यांवर प्रभावी आहे.

हेअर स्प्रे किंवा शेव्हिंग क्रीम

शाईच्या डागावर हेअर स्प्रे मारा किंवा शेव्हिंग क्रीम लावा. काही वेळाने, ते टूथब्रशने घासून थंड पाण्याने धुवा.

टूथपेस्ट (पांढऱ्या रंगाची)

शाईच्या डागावर पांढरा रंगाची टूथपेस्ट लावा आणि ती सुकू द्या. ते सुकल्यानंतर, ब्रशने घासून थंड पाण्याने धुवा. ही पद्धत कॉटनच्या कपड्यांसाठी चांगली आहे.