Join us  

‘नॉटी’ बायकांनी घरातच बसावे! ‘गुड न्यूज’ म्हणत तालिबान मंत्र्यांनी अफगाणी महिलांना का ठरवलं ‘नॉटी’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2022 5:34 PM

अफगाणिस्तानात तालिबान सरकार लवकरच सहावीपर्यंत मुलींना शाळेत शिकू द्यायचा विचार करते आहे..

ठळक मुद्देअफगाणी महिलांचं शिक्षणच नाही तर भवितव्यही अंधारात आहेत आणि ज्यांना सरकार ‘नॉटी’ ठरवायला निघालं आहे.

अफगाणिस्तानातलंतालिबान सरकार म्हणतेय, मुलींसाठी एक गुड न्यूज आहे. लवकरच त्यांचं शिक्षण सुरु होणार आहे. मात्र कितवीपर्यंत? तर फक्त सहावीपर्यंत. तालिबान सत्तेत आले तेव्हा त्यांनी भूमिका घेतली होती की यावेळी उदार भूमिका घेऊन महिलांना शिकू देऊ. मात्र सत्तेत येताच शाळा कॉलेजं बंद झाली, बायकांना घरात डांबण्यात आले. बुरखा-हिजाबची सक्ती नाही म्हणताना तशी सक्ती धाक दपटशा दाखवून सुरुच आहे. आणि आता मात्र तालिबान नेते आणि मंत्री सिराजूद्दीन हक्कानी म्हणतात की, आमचा वायदा आम्ही पूर्ण करणारच, लवकरच गुड न्यूज येईल, मुलींना सहावीरपर्यंत शाळेत जाता येईल? पण ज्या बायका जास्त  प्रश्न विचारतात, सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात, ज्यांना बाह्य देशांची मदत आणि फूस आहे असं सरकारला वाटतं अशा ‘नॉटी’ बायकांना मात्र घरीच बसावं लागेल. महिलांना कोंडून घालताना वरकरणी उदार भूमिका असं अफगाण सरकार घेत आहे, आणि महिलांवरच ‘नॉटी’ शिक्का मारत आहे.मार्च २०२२ मध्ये निदान सहावीपर्यंत मुलींसाठी शाळा सुरु करू अशी भूमिका त्यांनी घेतली होती मात्र ते प्रत्यक्षात आलंच नाही. आता बुरखा-हिजाबही सक्तीचंच आहे. मात्र एकीकडे हक्कानी सांगतात की, सक्ती कसलीच नाही. पण आम्ही त्यांना समजावून सांगतो आहोत की हिजाब महत्त्वाचा आहे. म्हणजे सक्ती नाही पण अदृश बळजबरी आणि जिवाची भीती मात्र आहे. बायका घरातच कोंडल्या गेल्या आहेत आणि आम्ही म्हणतो तसं वागलं नाही तर मराल हे उघड संकेत आहेत.आताही अगदी विनोदाने का होईना मंत्री म्हणत असतील की ‘वी कीप नॉटी वूमन ॲट होम’ तरी त्याचा अर्थच हा होतो की बायकांनी सत्तेपुढे तोंड उघडायचं नाही. घरात बसायचं त्या दुय्यम आहेत. 

(Image : Google)

याच हक्कानींना अमेरिकन सरकारने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. त्यांच्यावर १० बिलिअन डॉलरचं इनामही लावलं आहे.आणि आता तेच सत्तेत बसून बायकांनी कसं जगावं आणि कसं वागू नये हे सांगत आहेत.अफगाणी महिलांचं शिक्षणच नाही तर भवितव्यही अंधारात आहेत आणि ज्यांना सरकार ‘नॉटी’ ठरवायला निघालं आहे, त्या काहीजणी तरी देशात राहून किंवा देशाबाहेर राहून सत्तेशी लढतच आहेत. 

टॅग्स :तालिबानअफगाणिस्तान