क्रिकेटच्या जगात खेळाडूंच्या कामगिरीबरोबरच त्यांच्या लाईफस्टाईल ट्रेंड्सचीही खूप चर्चा होते. याच दरम्यान भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्यादरम्यान, भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या चेहऱ्यावर एक छोटा, गोलाकार पॅच दिसला. या लहानशा गोष्टीने सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये कुतूहल निर्माण केलं,
आरोग्य आणि लाईफस्टाईल तज्ज्ञांच्या मते, सिराजने लावलेला तो पॅच म्हणजे 'पिंपल पॅच' असण्याची शक्यता आहे. पिंपल्सवर त्वरित आणि प्रभावी उपचार करण्यासाठी Gen Z मध्ये अत्यंत लोकप्रिय ठरलेली ही एक 'स्किनकेअर हॅक' आहे.
'पिंपल पॅच' म्हणजे काय?
पिंपल पॅच म्हणजे एक लहान, चिकट स्टिकर असतो, जो थेट पिंपलवर लावला जातो. हे पॅचेस प्रामुख्याने हायड्रोकोलॉइड नावाच्या जेल-फॉर्मिंग मटेरियलपासून बनलेले असतात, जे मुळात जखमांसाठी वापरलं जात होतं. या पॅचेसचा उपयोग पिंपल्समुळे होणारी जळजळ कमी करणं, त्यातील अशुद्ध गोष्टी शोषून घेणं आणि ते बरं होण्याची प्रक्रिया वेगाने करणं हा आहे.
पिंपल्ससाठी कसं ठरतं फायदेशीर?
- पिंपल पॅच पिंपलमध्ये जमा झालेला द्रव, पू आणि तेल शोषून घेतात. यामुळे पिंपलची सूज कमी होण्यास मदत होते.
- पिंपलवर एक संरक्षक थर तयार करतात. यामुळे धूळ, बॅक्टेरिया आणि जंतूंपासून त्वचेचं संरक्षण होतं.
- लोक पिंपल्सला वारंवार स्पर्श करतात किंवा ते फोडतात. पिंपल फोडल्याने होणारं इन्फेक्शन आणि त्यामुळे पडणारे काळे डाग याचा धोका पिंपल पॅचमुळे कमी होतो.
- अनेक पिंपल पॅचेसमध्ये सॅलिसिलिक एसिड, बेंझोईल पेरॉक्साइड किंवा टी ट्री ऑईल सारखे घटक मिसळलेले असतात, जे पिंपल लवकर सुकण्यास मदत करतात आणि त्वचेला आराम देतात.
एका रिसर्चमध्ये असं दिसून आलं आहे की, हायड्रोकोलॉइड पिंपल पॅचेस साध्या सर्जिकल टेपपेक्षा जास्त प्रभावी आहेत. ते मुरुमांची तीव्रता कमी करतात, लालसरपणा नियंत्रित करतात आणि जखम लवकर भरण्यास मदत करतात. त्यामुळे, अचानक आलेल्या पिंपल्स हा एक लवकर होणारा चांगला आणि आधुनिक उपाय म्हणून सध्या लोकप्रिय आहे. त्वचेच्या गंभीर समस्यांवर उपचार सुरू करण्यापूर्वी, नेहमी Dermatologistचा सल्ला घेणं आवश्यक आहे.