Join us  

वहीदा रहमान यांच्या व्हायरल व्हिडिओमागचे सत्य; कोण आहे व्हिडिओमध्ये ग्रेसफुल डान्स करणारी महिला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2023 5:25 PM

Waheeda Rehman Viral Dance Video Fact Check: खात्री न करता सोशल मीडियावर चुकीच्या पोस्ट अपलोड करणाऱ्यांना नेटीझन्सची चांगलेच सुनावले...

ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रहमान यांना 'दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार' जाहीर झाला आणि सर्वच स्तरातून त्यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आलं. इतकंच नाही तर वहीदाजींचे अगदी जुन्या काळापासून आतापर्यंतचे विविध फोटो आणि व्हिडिओही काही क्षणांत सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामध्ये वयाच्या ८५व्या वर्षी वहीदाजी करत असलेला ग्रेसफुल डान्स असं म्हणत एक डान्स व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. वहीदा आपल्या आवडत्या अभिनेत्री आहेत असे सांगत अनेकांनी आपल्या अकाऊंटवरुन स्टेटस किंवा स्टोरीवर हा व्हिडिओ अपलोडही केला. मात्र तो खरंच वहीदा यांचा आहे का याची खातरजमा करायला मात्र नेटीझन्स विसरले. वहीदा यांच्यासारखीच दिसणारी महिला असल्याने वहीदा यांचे चाहते सपशेल फसले आणि आपल्या आवडीच्या हिरोईनचा व्हिडिओ म्हणत शेअर करुन मोकळे झाले. मात्र हा व्हिडिओ त्यांचा नसून वेगळ्याच एका महिलेचा असल्याचे लक्षात आल्यावर अनेकांनी अशाप्रकारे खात्री न करता सोशल मीडियावर वावरणाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले (Waheeda Rehman Viral Dance Video Fact Check). 

अभिनेत्री वहीदा रहमान यांनी आपल्या दमदार अभिनयाने आणि बहारदार नृत्यशैलीने नेहमीच प्रेक्षकांचे मन मोहवून टाकले आहे. सोशल मीडियावर अगदी प्रत्येक क्षणाला काही ना काही व्हायरल होत असते, तसाच हा व्हिडिओ. या व्हिडीओमध्ये एक महिला ‘गाईड’ चित्रपटातील ‘आज फिर जीने की तमन्ना है’ या गाण्यावर अतिशय सुंदर नृत्य करताना दिसत आहे. व्हिडीओमधील ही महिला म्हणजे खुद्द वहीदा रहमान असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता या व्हिडीओमागचं सत्य समोर आलं आहे. पांढऱ्या रंगाचा घोळदार ड्रेस आणि मरुन किंवा चॉकलेटी रंगाची ओढणी घातलेली ही महिला बंगल्याच्या आवारात डान्स करत असल्याचा हा व्हिडिओ आहे. मात्र त्या वहीदाजी नसून वेगळीच महिला असल्याची पोलखोल नेटीझन्सनीच काही वेळाने केली. 

 सोशल मीडियावर फॉरवर्ड केल्या जाणाऱ्या या व्हिडीओमध्ये वहीदा रहमान यांच्यासारख्या दिसणाऱ्या या महिलेचे नाव आहे सुनीला अशोक. नृत्याची आवड असणाऱ्या सुनीला अशोका यांचे स्वतःचे युट्यूब चॅनल देखील आहे. त्या आपल्या या चॅनलवर नेहमीच असे  नृत्याचे व्हिडीओ शेअर करत असतात. ‘मायुखा’असे त्यांच्या या युट्युब चॅनलचे नाव आहे. सुनीला यांचा ‘गाईड’ चित्रपटातील ‘आज फिर जीने की तमन्ना है’ गाण्यावरचा डान्स व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी स्वतः एक पोस्ट शेअर केली आहे. सुनीला अशोका यांनी आपल्या या पोस्टमध्ये लिहिले की, ‘आज सकाळी माझ्या कुटुंबाच्या आणि मित्र-परिवाराच्या मेसेजेसमुळे मला जाग आली. ‘आज फिर जीने की तमन्ना है’या गाण्यावरचा माझा व्हिडीओ वहीदा रहमान यांचा डान्स म्हणून व्हायरल झालेला दिसला! त्यांच्याशी तुलना झाल्याने मला आज खूप सन्मानित झाल्यासारखे वाटत आहे. चाहत्यांकडून मला जे प्रेम आणि कौतुक मिळत आहे, त्यामुळे मी अक्षरशः भारावून गेले आहे.’यासोबतच आपल्या वयाची पर्वा न करता बिनधास्त डान्स करा, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियानृत्यवहिदा रहमान