Join us

Viral Video : नऊवारी साडी नेसून आजीबाई करताहेत मेनिक्युअर, उत्साह असा की पाहतच राहावे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2022 13:07 IST

Viral Video : या व्हिडिओला अनेकांनी पसंती दिली असून त्यावर बऱ्याच जणांनी आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. पण मौजेला वय नसते हेच यातून दिसून येते.

ठळक मुद्देमाझा सगळ्यात महत्त्वाचा क्लायंट असे म्हणत या पोस्टला कॅप्शन देण्यात आली आहे.अगदी साधी दिसणारी ही आजीबाई अतिशय आपल्या हातांवर होणारी ही ट्रिटमेंट अतिशय आनंदाने करुन घेत असल्याचे दिसते. 

पार्लरच्या ट्रिटमेंट म्हणजे तरुण मुलींचे काम असा आपला समज असतो. मग ते साधे थ्रेडींग असो किंवा व्हॅक्सिंग तरुण मुली नियमितपणे आपण सुंदर दिसावे यासाठी पार्लरच्या वेगवेगळ्या ट्रिटमेंटस करताना दिसतात. यासाठी त्या आयुष्यातील बराच वेळ आणि पैसाही त्यासाठी खर्च करताना दिसतात. बाई कितीही वयस्कर झाली तरी आपण कायम सुंदर दिसावे असे तिला वाटत असते. पण वाढलेल्या वयाच्या खुणा तिच्या चेहऱ्यावरुन लपत नाहीत. अशावेळी कधी चेहऱ्यावरच्या सुरकुत्या झाकण्यासाठी तर कधी पांढरे झालेले केस लपवण्यासाठी महिला आवर्जून पार्लरमध्ये जाताना दिसतात. गेल्या काही वर्षात सौंदर्याच्या व्याख्येत बराच बदल झाला असून आपण वयाच्या कोणत्याही टप्प्यावर कायम प्रेझेंटेबल असले पाहिजे. मग तरुण वयातच स्वत:चे लाड करायचे असतात असं थोडीच आहे असा अॅपरोच असणाऱ्या एका आजीचा मेनिक्यूअर करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.   

(Image : Google)

हाताची नखे आणि बोटे सुंदर दिसण्यासाठी केली जाणारी मेनिक्यूअर ही पार्लरमध्ये केली जाणारी एक ट्रीटमेंट. आपली नखं, त्यांच्या आजुबाजूचा भाग आणि बोटे स्वच्छ आणि आकर्षक दिसावीत यासाठी ही ट्रीटमेंट केली जाते. अनेकदा नखांचा आकार, त्यांच्या बाजूची डेड स्कीन यांमुळे आपली बोटे दिसायला हवीत तितकी सुंदर दिसत नाहीत. मग मेनिक्यूअरच्या साह्याने या नखांचे सौंदर्य वाढवले जाते. गावाकडच्या नऊवारी नेसणाऱ्या आजीने मोठ्या पार्लरमध्ये जाऊन ही ट्रीटमेंट घेतली तर? आपल्या सगळ्यांनाच याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. विशेष म्हणजे अगदी साधी दिसणारी ही आजीबाई अतिशय आपल्या हातांवर होणारी ही ट्रिटमेंट अतिशय आनंदाने करुन घेत असल्याचे दिसते. या व्हिडिओला 'ए दिल लाया ये बहार, अपनोंका प्यार....' हे गाणंही लावण्यात आल्याने त्यातील मजा आणखी वाढली आहे. 

ग्लॅम्स मेकअप स्टुडिओ या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. एक वयस्कर आजी जांभळ्या रंगाची नऊवारी साडी, डोक्यावर अंबाडा, हातात हिरव्या काचेच्या बांगड्या अशा महाराष्ट्रीयन वेशात या स्टुडिओमधील खुर्चीत बसल्या आहेत. तर पार्लरमधील मुलगी त्यांच्या नखांना साफ करणे, शेप देणे, वाफ देणे आणि छानशी नेलपेंट लावणे असे सगळे अतिशय प्रेमाने करत असल्याचे दिसते. या आजींच्या चेहऱ्यावरही या आगळ्यावेगळ्या गोष्टीबाबत उत्सुकता आणि आनंद असल्याचे पाहायला मिळते. माझा सगळ्यात महत्त्वाचा क्लायंट असे म्हणत या पोस्टला कॅप्शन देण्यात आली आहे. शेवटी आजींच्या नखांना लाल रंगाची छान नेलपेंट लावल्यावर आजींचे हात एकदम छान दिसत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसते. या व्हिडिओला अनेकांनी पसंती दिली असून त्यावर बऱ्याच जणांनी आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. पण मौजेला वय नसते हेच यातून दिसून येते.

टॅग्स :सोशल व्हायरलब्यूटी टिप्सइन्स्टाग्राम