Join us

Viral Video : डोसाची पार वाट लावली! व्हायरल होतोय तंदूरी फ्रूट मसाला डोसा, पाहा व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2022 16:42 IST

Viral Video :व्हिडिओ पाहून तुम्हीही कदाचित चिडाल, साऊथ इंडियन पदार्थाची पुरती वाट लावली...

ठळक मुद्देकाहींनी हा प्रयोग चांगला असल्याचे म्हणत त्याचे कौतुक केले आहे तर काहींनी अशाप्रकारे डोशाची वाट लावल्याबद्दल या व्हिडिओवर शिव्याही घातल्या आहेत. नेहमीच असे प्रकार करुन मूळ पदार्थाची, त्याच्या चवीची वाट लावल्याने हा पदार्थ करणाऱ्यांना अनेकदा नावेही ठेवली जातात

डोसा म्हणजे अस्सल साऊथ इंडियन पदार्थ. झटपट होणारा पोटभरीचा आणि घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा डोसा अनेकांकडे नेहमी केला जातो. तर कधी बाहेरही पटकन हेल्दी काहीतरी खायचे असेल की अनेकदा आपण डोसा खायला पसंती देतो. यामध्ये मसाला डोसा, मैसूर मसाला डोसा, चीज डोसा, घी डोसा किंवा आणखी रवा डोसा वगैरे प्रकार आपण पाहिले असतील. हे प्रकार आपण हॉटेलमध्ये गेल्यावर ट्रायही करतो. पण हल्ली पदार्थांमध्ये काही ना काही भन्नाट प्रयोग करण्याचे प्रमाण वाढले असून दर काही दिवसांनी सोशल मीडियावर एकाहून एक भन्नाट रेसिपी शेअर केल्या जातात. या रेसिपींचे हे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरलही होतात. काही दिवसांपूर्वी मटका डोसाचा व्हिडिओ बराच व्हायरल (Viral Video) झाला होता.

कधी लोक गुलाबजाम सामोसा करतात तर कधी जिलेबी सामोसा, कधी चॉकलेट पाणीपुरी तर कधी मॅगी भेळ. अशाप्रकारचे प्रयोग सोशल मीडियामुळे काही क्षणात जगभरात पसरतात आणि त्यांच्यावर एकाहून एक कमेंटसचा अक्षरश: पाऊस पडतो. एखादवेळी वेगळा प्रयोग करणे ठिक आहे पण नेहमीच असे प्रकार करुन मूळ पदार्थाची, त्याच्या चवीची वाट लावल्याने हा पदार्थ करणाऱ्यांना अनेकदा नावेही ठेवली जातात. नुकताच असाच एक डोशाचा प्रकार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये हा व्यक्ती तव्यावर डोसा टाकतो आणि त्यामध्ये भाजी किंवा इतर काही लावण्याऐवजी थेट सफरचंद, द्राक्षे यांसारखी फळे घालतो. यामध्ये सॉस, पनीर, चीज, लाल रंगाची चटणी आणि इतरही काही पदार्थ घालून हे सगळे शिजण्यासाठी हा व्यक्ती त्या डोशावरील मिश्रणावर काही मिनीटे ताटलीही ठेवतो. 

त्यानंतर हे मिश्रण सगळीकडे पसरुन झाल्यावर डोसा फोल्ड करुन त्याचे कटींग करुन त्यावर पुन्हा चीज आणि डाळींबाचे दाणे घालतो. त्यामुळे या डोशाला डोसा आणि फ्रूट असे म्हटले जात आहे. एका इन्स्टाग्राम पेजवर या डोसाचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून त्यावर एकाहून एक कमेंटस येत आहेत. काहींनी हा प्रयोग चांगला असल्याचे म्हणत त्याचे कौतुक केले आहे तर काहींनी अशाप्रकारे डोशाची वाट लावल्याबद्दल या व्हिडिओवर शिव्याही घातल्या आहेत. अनेकांनी या व्हिडिओला लाइक केले आहे.  

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाअन्न