1000 days periods experience : एका वयानंतर महिलांना मासिक पाळी येणं ही एक नैसर्गिक क्रिया आहे. सामान्यपणे 5 ते 6 दिवस मासिक पाळी येते. ज्यात असह्य वेदना, मूड स्वींग, कंबरदुखी, डोकेदुखी अशा अनेक गोष्टींचा सामना त्यांना करावा लागतो. पण एका महिलेनं असा दावा केला आहे की, तिला मासिक पाळी केवळ 5 ते 6 दिवसांसाठी नाही तर तब्बल 1 हजार दिवस सुरू होती. मग विचार करा की, 5 ते 6 दिवसात महिलांना इतका त्रास होतो तर 1 हजार दिवस तिनं काय अनुभवलं असेल. अमेरिकेतील टिकटॉक यूजर असलेल्या पोपी नावाच्या महिलेनं तिच्या मासिक पाळीबाबत केलेला हा धक्कादायक खुलासा चर्चेचा विषय ठरत आहे.
महिलेनं टिकटॉकवर खुलासा केला की, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरही तिला या समस्येचं कारण समजू शकलेलं नाही. आतापर्यंत ही समस्या तिच्यासाठी रहस्यच बनून होती. पोपी असं या महिलेचं नाव असून तिनं अलिकडेच खुलासा केला की, 'माझ्या पहिल्या अल्ट्रासाउंडमध्ये याबाबत समजलं होतं. पण कुणीही मला याबाबत काही सांगण्याची तसदी घेतली नाही'.
पहिले दोन दिवस सतत स्त्राव
पोपची 1 हजार दिवसांची मासिक पाळी सुरू राहण्याची धक्कादायक कहाणी दोन आठवडे सतत रक्तस्त्रावापासून सुरू झाली होती. ज्यानंतर तिनं डॉक्टरांचा सल्ला घेतला. अनेक डॉक्टरांचे सल्ले, टेस्ट आणि औषधोपचार केल्यावरही तिचा रक्ताचा स्त्राव सुरूच होता. पोपीच्या अंडाशयामध्ये सिस्ट आढळून आले, पण याचं कारण स्पष्ट नव्हतं.
पोपीही थकली आणि डॉक्टरही
पोपीच्या पीसीओएस टेस्टनंतर तिची मासिक पाळी तब्बल तीन महिने सुरूच होती. डॉक्टरांनी हिस्टेरोस्कोपी केली, पण कोणतंही स्पष्ट कारण समोर आलं नाही. सतत वेगवेगळे डॉक्टर वेगवेगळे उपचार करत राहीले आणि एक वर्षापेक्षा अधिक सतत रक्तस्राव होत असल्यानं तिची चिंता आणखी वाढली. आयुष्यभराची कमाई तिनं पॅड्स आणि नवीन ट्राउजर, नवीन अंतर्वस्त्र, नवीन चादरी आणि औषधांमध्ये घालवली.
नंतर डॉक्टरांनी तिचा एमआरआय आणि अल्ट्रासाउंडही केला. सतत मासिक पाळी सुरू असल्यानं तिच्या आरोग्यावरही मोठा नकारात्मक प्रभाव पडणं सहाजिक आहे. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर 950 व्या दिवशी तिची मासिक पाळी बंद झाली. पोपीनं सांगितलं की, इतर टिकटॉक यूजरच्या मदतीनं तिला या गंभीर आजाराबाबत समजलं की, याला बायकॉर्नुएट गर्भाशय म्हटलं जातं. ज्याला हृदयाच्या आकाराचं गर्भाशय असंही म्हणतात. या स्थितीत गर्भाशय दोन भागांमध्ये विभागलं जातं.
काय होईल उपचार?
ही समस्या दूर करण्यासाठी पोपी वेगवेगळे प्लान करत आहे. पोपीची हार्मोन लेव्हल चेक करण्यासाठी आणि तिचे आययूडी हटवण्यासाठी एक व्यापक हार्मोनल पॅनल असेल. कदाचित डॉक्टर तिच्या गर्भाशयाच्या थरातून असामान्य टिश्यूही काढू शकतात.