Join us

देशासाठी लढणाऱ्या नवऱ्याला भेटायचं म्हणून लेकराबाळांना घेऊन ‘ती’ त्याला भेटायला जाते आणि..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2024 16:50 IST

देशासाठी लढणाऱ्या नवऱ्याला काही क्षण भेटण्यासाठी साहसी प्रवास करणाऱ्या बायकांची गोष्ट

ठळक मुद्देप्रश्न फक्त इतकाच आहे की हे युद्ध संपेल कधी?

-माधुरी पेठकरवर्षानुवर्षे नवरा बायको एकमेकांना भेटलेच नाही तर ते नातं पुढे कसं टिकेल? वडिलांशिवाय वाढणारी मुलं वडिलांना कधी भेटलीच नाही तर त्यांना वडील आठवतील तरी का? अशी भीती युक्रेनमधल्या डॅमिना सर्बन, कापुत्सिना, युलिया, येव्हेनिया यांच्यासोबत हजारो महिलांना वाटते आहे. या भीतीवर त्यांनी तोडगा काढला. डॅमिना सर्बन सध्या घरात एकटीच राहते. रोमनसोबत तिचं नुकतंच लग्न झालं होतं आणि त्याला लगेच रशियाविरुद्ध लढण्यासाठी जावं लागलं.अडीच वर्षे झाली तरी अजून रोमन आपल्या घरी परत आलेला नाही. घरी बसून नवरा कधी येईल याची वाट पाहण्याची सर्बनची तयारी नव्हती. म्हणून तिनं ठरवलं की आपण त्याला भेटायला जायचं.

आता ती दर पंधरा दिवसांनी रात्री ट्रेनचा लांबचा प्रवास करत त्याला भेटायला जाते; पण ती एकटीच असं करत नाही. तिच्यासोबत तिच्यासारख्या अनेक युक्रेनियन महिला असतात. त्याही आपल्या मुलाबाळांना घेऊन नवऱ्याला भेटण्यासाठी धोकादायक प्रवास करत जातात. या प्रवासात डोक्यावर अखंड क्षेपणास्त्र आणि ड्रोनचे हल्ले सुरू असतात.कापुत्सिना ही युद्धावर गेलेल्या आपल्या नवऱ्याला भेटायला जाताना आपल्या नऊ वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन जाते. युलिव्हा ही चार महिन्यांची गरोदर होती तेव्हा तिचा नवरा लढाईवर गेला. मूल झाल्यानंतर युलिव्हा आपल्या लहानग्या बाळाला घेऊन आता नवऱ्याला भेटायला जाते. नवरा जिथे राहतो तिथे त्याच्या सोबत राहते. तिथल्या स्वयंपाकघरात जे शक्य आहे ते तयार करून नवऱ्याला खाऊ घालते.

काहीक्षण का होईना ती नवरा, मुलासह एकत्रित कौटुंबिक जीवनाचा आनंद घेते.येव्होनिया ही ४७ वर्षांची महिला. तिला जेव्हा नवऱ्याला भेटायला जायचं असतं त्याच्या आदल्या दिवशी ती अख्खा दिवस स्वयंपाकघरात राबते आणि नवऱ्याला जे जे आवडतं ते सर्व स्वत: तयार करून घेऊन जाते.नवरा-बायकोतलं नातं घट्ट करण्यासाठी, मुलांचे त्यांच्या वडिलांशी असलेले बंध घट्ट करण्यासाठी, त्यांच्या आयुष्यात वडिलांसोबत राहण्याच्या आठवणी पेरण्यासाठी युक्रेनमधील सैनिकांच्या पत्नी जीव धोक्यात घालून प्रवास करतात. काही क्षणांच्या भेटीमुळे आनंदून जातात.

आपल्या बायका-मुलांना पाहून युक्रेनच्या सैनिकांनाही ऊर्जा मिळते.युद्ध संपेल, सरकार घरी जाण्याची परवानगी देईल, घरी बायको-मुलांसह निवांत राहायला मिळेल अशी आशा सैनिकांनाही वाटते आहे. प्रश्न फक्त इतकाच आहे की हे युद्ध संपेल कधी? 

टॅग्स :युद्धरशियायुक्रेन आणि रशियामहिलाआंतरराष्ट्रीय