Join us  

जुळ्या भावंडांचे अजब वाढदिवस! कुणाची जन्मतारीख वेगळी तर कुणाचा जन्मच दोन वेगळ्या शतकांतला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2022 5:23 PM

कॅलिफोर्नियात ३१ डिसेंबरच्या रात्री जन्मलेल्या दोन जुळ्या भावंडांची अजब गोष्ट, वाढदिवसाचे दोन वेगळे दिवस

ठळक मुद्देजगात अशी जुळी भावंडं अजूनही असतील.. जगणं असं सिनेमा-कादंबऱ्यांपेक्षाही वेगळं असतं.

आयुष्य माणसाच्या कल्पनेपेक्षाही अजब खेळ खेळतं आणि ते खेळ असे की जगण्याची कधी मजा वाढते कधी नव्हे प्रश्न निर्माण होतात. तर कधी गंमत वाटते की हा कसा असा अजब योगायोग? तर तसंच काहीसं घडलंय कॅलिफोर्नियात. ती बातमी जगभर व्हायरल झाली. फातिमा मॅदरिगल या महिलेला जुळी बाळं होणार होती. ३१ डिसेंबरच्या रात्री जेव्हा सारं जग सेलिब्रेशन करत होतं तेव्हा फातिमा लेबर रुममध्ये होती. ११ वाजून ४५ मिनिटांनी तिला मुलगी झाली. आणि ठीक बारा वाजता मुलगा. म्हणजे ही बाळं जुळी असूनही एकाची जन्मतारीख २०२१ तर दुसऱ्याची २०२२. दोन वेगवेगळ्या दिवशी ही बाळं आपला वाढदिवस साजरा करतील. त्यांच्या आईने माध्यमांना दिलेली प्रतिक्रियाही फोटोसह व्हायरल झाली की, ही गंमतच आहे की माझी जुळी बाळं कायम वेगवेगळ्या दिवशी आपला वाढदिवस साजरा करतील!

(Image : Google)

पण ही गंमत पहिल्यांदाच घडलेली नाही. जगात असे अजब किस्से घडतात. ही बाळं तरी एकाच शतकातल्या दोन वेगळ्या वर्षांत जन्माला आली, जुळी असून आपला वाढदिवस वेगळ्या दिवशी साजरा करतील.

(Image : Google)

पण १९९९ मध्ये जन्माला आलेले दोन भावंड मात्र जुळी असूनही दोन वेगळ्या शतकात जन्माला आली आहेत. त्यांच्या जन्मतारखा, वर्ष, आणि शतकही वेगळं आहे. जॉडर्न आणि जेली वालडेन या दोन भावंडांची ही गोष्ट. ते मिलेनिअम किड्स म्हणून अत्यंत गाजले होते. जॉर्डन ही गोष्ट सांगतो. ३१ डिसेंबर १९९९ ची ही गोष्ट, इंडियानाोलीसची. त्यांच्या आईला प्रसवकळा सुरु होत्या मात्र सिझेरिअन करावं लागणार हे स्पष्ट दिसत होतं. डॉक्टरांनी येऊन त्या जोडप्याला विचारलं की आता मध्यरात्र आहे तुमची बाळं या शतकात जन्माला यावीत की पुढच्या हे ठरवा. अर्धा तास आहे आपल्याकडे. त्यावर जॉर्डनच्या बाबांनी सांगितलं की एक या शतकात एक पुढच्या असं नाही का करता येणार? ते मिश्किल होते. त्यांनी ठरवल्याप्रमाणे एक बाळ ३१ डिसेंबर १९९९ ला तर दुसरं त्याच मध्यरात्री काही मिनिटांनी १ जानेवारी २००० रोजी जन्माला आलं. त्याकाळी ही बातमी फुटली.मिलेनिअम किड्स  म्हणून त्यांचे फोटो -व्हिडिओ प्रसिध्द झाले. माध्यमात त्यांच्या पालकांच्या मुलाखती प्रसिध्द झाल्या. ही बाळं आता विशीची झाली..

(Image : Google)

पण सोपं नव्हता हा प्रवास. त्यांच्या जन्मानंतर १४ महिन्यांनीच त्यांचे वडील गेले. त्यांना डायबिटिजची काही गुंतागुत होऊन त्यात ते दगावले. जॉर्डन सांगतो, आममच्या जन्मानंतरचे त्यांचे व्हिडिओ हीच आता आमच्याकडे त्यांची आठवण आहे. त्यांनी आम्हाला सेलिब्रेशनचे दोन दिवस जन्मभरासाठी दिले आहेत. जगणं असं भरभरुन असावं हेच त्यांनी सांगितलं.जगात अशी जुळी भावंडं अजूनही असतील.. जगणं असं सिनेमा-कादंबऱ्यांपेक्षाही वेगळं असतं.

टॅग्स :सामाजिकरिलेशनशिप