Switch Board Cleaning Tips : घराची स्वच्छता किती वेळाही केली तरी पुन्हा पुन्हा करावीच लागते. कारण केवळ एकदा स्वच्छता करून चालत नाही. काही महिन्याआधीच दिवाळी होऊन गेली. तेव्हा घरातील स्विच बोर्ड आपण घासून चकाचक केलं असेलच. पण ते पुन्हा आता आधीसारखं काळं, मळकट झालं असेल. त्यावर धूळ-माती चिकटून बसली असेल. इलेक्ट्रिक बोर्डवरील धूळ-माती काढणं तसं फारच किचकट आणि कंटाळवाणं काम असतं. पण ते स्वच्छ तर करावेच लागतील, कारण रोज आपण लाइट, फॅन लावण्यासाठी त्यांचा वापर करतो. त्यावरील बॅक्टेरिया आपल्या हाताला लागतात. तसेच ते चांगलेही दिसत नाही. अशात हे स्विच बोर्ड पुन्हा नव्यासारखे चकाचक करण्यासाठी आम्ही काही सोपे उपाय सांगणार आहोत.
लिक्विड डिटर्जेंट आणि गरम पाणी
हलक्या कोमट पाण्यात थोडं भांडी घासायचं लिक्विड मिक्स करा. या पाण्यात कपडा थोडा ओला करा आणि स्विच बोर्ड घासा. पण कापड जास्त भिजवू नका.
रबर इरेजर
स्विच बोर्डववरील बोटांचे काळे डाग काढण्यासाठी रबर इरेजरचा सुद्धा आपण वापर करू शकता. हा फारच सोपा आणि सुरक्षित उपाय आहे. याने बोर्ड, बटनांवरील काळे डाग सहज दूर होतील.
बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस
जर स्विच बोर्डवरचे डाग जुने आणि चिव्वट असतील, तर बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस किंवा व्हाईट व्हिनेगर एकत्र करून वापरा. दोन्ही घटक मिसळून एक घट्ट पेस्ट तयार करा. टूथब्रशच्या मदतीने स्विच बोर्डवर ही पेस्ट घासा. 10–15 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर कोरड्या कापडाने पुसून स्वच्छ करा. डाग गायब होतील आणि बोर्ड नव्यासारखा दिसेल.
टूथपेस्ट
टूथपेस्ट केवळ दातच नाही तर स्विच बोर्डही स्वच्छ करते. थोडीशी टूथपेस्ट एका कापडावर घ्या आणि बोर्डवर लावा. थोडा वेळ हलक्या हाताने घासा. मग स्वच्छ आणि कोरड्या कापडाने पुसून टाका. बोर्ड लगेचच स्वच्छ आणि उजळ दिसेल.
नेल पेंट रिमूव्हर
जर तुम्हाला स्विच बोर्ड अगदी नवीनसारखे दिसावे असे वाटत असेल, तर नेल पेंट रिमूव्हर उत्तम उपाय आहे. एका कापसाच्या बोळ्याला किंवा मऊ कापडाला नेल पेंट रिमूव्हर लावा. आता हलक्या हाताने स्विच बोर्डवर घासा. काही वेळातच बोर्डवरील काळे डाग निघून जाऊन बोर्ड स्वच्छ आणि चमकदार दिसू लागेल. फक्त काळजी घ्या की, रिमूव्हर वापरताना बोर्डचा वीजपुरवठा बंद करा.
हँड सॅनिटायझर
हँड सॅनिटायझरमध्ये असलेला अल्कोहोल घाण आणि डाग काढण्यात मदत करतो. एका कापसाच्या बोळ्याला किंवा मऊ कपड्याला सॅनिटायझर लावा. बोर्डवर हलक्या हाताने घासा. काही मिनिटांतच स्विच बोर्ड स्वच्छ आणि चमकदार होईल.
काय काळजी घ्याल?
स्वच्छता करताना वीजपुरवठा बंद ठेवा.
जास्त पाणी वापरू नका, कारण त्यामुळे शॉर्टसर्किट होऊ शकते.
स्वच्छतेनंतर बोर्ड पूर्ण कोरडा झाल्यावरच वीजपुरवठा सुरू करा.
