Join us

अतूट प्रेम! पत्नीचा जीव वाचवण्यासाठी पतीची धडपड; रोज ३० किमी अंतरावरुन ऑक्सिजन सिलिंडर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 14:15 IST

आजारी पत्नीचा जीव वाचवण्यासाठी पती दररोज तब्बल ३० किलोमीटर दूर जात आहे. ऑक्सिजन सिलिंडर आणण्यासाठी तो धडपड करत आहे.

प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. अशीच एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. आपल्या आजारी पत्नीचा जीव वाचवण्यासाठी पती दररोज तब्बल ३० किलोमीटर दूर जात आहे. ऑक्सिजन सिलिंडर आणण्यासाठी तो धडपड करत आहे. विजय मंडल असं या व्यक्तीचं नाव असून त्याचं आपल्या पत्नीवर खूप प्रेम आहे. तिच्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. 

विजय मंडल यांची पत्नी आजारी असून त्या अंथरूणाला खिळल्या आहेत. २०२० मध्ये विजय यांच्या पत्नी अनिता देवी यांना कोरोना झाला, त्यानंतर त्यांना फुफ्फुसांचा संसर्ग झाला. मायागंज हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. पण डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलं की अनिता देवी यांचा जीव वाचवण्यासाठी नेहमीच ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता आहे. विजय मंडल यांनी मुलीच्या लग्नासाठी काही पैसे वाचवले होते. पण पत्नीच्या आजारपणामुळे ते सर्व पैसे संपले. 

जेव्हा सर्वच आशा संपल्या आणि रुग्णालयातील खर्च देखील वाढत गेला. तेव्हा त्यांनी आपल्या घराचच रुग्णालयात रुपांतर करायचं ठरवलं. पत्नीसाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. अनिता देवी गेल्या काही वर्षांपासून ऑक्सिजन सिलिंडरवर आहेत. पाच वर्षांपासून त्या इंटरस्टिशियल लंग्ज डिसीजशी (ILD) झुंज देत आहेत, ज्यामुळे त्यांना अतिरिक्त ऑक्सिजनशिवाय श्वास घेणं कठीण झालं आहे.

ऑक्सिजन सिलिंडर आणण्यासाठी विजय हे त्यांच्या गावापासून भागलपूरपर्यंत दिवसातून तीन वेळा ३० किलोमीटर दूर जातात. जेणेकरून पत्नीचा जीव वाचवता येईल. त्यांचं प्रेम, दृढनिश्चय आणि कधीही हार न मानण्याची जिद्द यातून दिसून येत आहे. बिहारच्या ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना विविध समस्यांना तोंड द्यावं लागत असल्याचं या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे. तसेच तिथे मूलभूत आरोग्यसेवा नाहीत. 

टॅग्स :सोशल व्हायरल